शिंपला

 मी आणि माझ्या दोन मैत्रिणी समुद्राकाठी चालत होतो. सुदैवाने आम्ही तीन आणि तो अक्खा किनारा, या व्यतिरिक्त कोणीच न्हवते. अचानक माझी नजर एका उघडलेल्या शिंपल्याच्या पेटीकडे गेली. आवासून उघडा पण तरीही दुसऱ्या भागाशी जोडला असलेला शिंपला उन, पाणी, वाळू, यात चमकत होता.

न रहावून मी तो उचलला आणि झिप बॅग मध्ये लॉक केला. आणि मग त्या शिंपल्याने मन जणू अनलॉक केले, तिघीनांही नादच लागला. शंख, शिंपले, गोगलगाई, खेकड्यांची घरे, समुद्रीफेसाचे दगड बघता बघता स्थळ काळ वेळेचे भान हरवून बसलो... हे म्हणणे किती सोपे आहे कि भान हरपले पण खरंच तसे होते कां? नक्कीच आम्ही रोजच्या धकाधकीतून, व्यापातून बाहेर पडलो होतो. समुद्र, लाटा, वाळू, झाडे, दगड अन धोंडे सगळ्यात रमलो होतो. गप्पांमध्येही रोजच्या उरलो न्हवतो. पण मेंदूचा एक कप्पा रोजचीच कामे करत होता. Ferry च्या वेळेकडे घड्याळाचे लक्ष होते, ठराविक अंतरापासून परत फिरायचे हि टिकटिक डोक्यात वाजत होती. चांगली जागा सापडली कि बसून थोडे खाऊया याची जाणीव पोटातली गुरगुर करून देत होतीच. तरीही हे आमच्या वागण्या बोलण्यात कुठंच न्हवते. तिथे उरल्या होत्या शंख शिंपले गोळा करणाऱ्या शाळकरी मुली. मग असे दोन पातळींवर हे घडत कसे होते?

मान्य, मानसशास्त्राकडे याची खूप छान उत्तरे असतील. मला त्यासाठी ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यांसाठी, ती कशी वाचावी यासाठी लिहलेल्या ओव्यांमध्ये माझे उत्तर सापडले. ते म्हणतात शब्दांशिवाय गीतेतील तत्वांची चर्चा करावी, इंद्रियांच्या (sensory organs) नकळत अर्थाचे आकलन करावे. वक्त्याने बोलण्यापूर्वीच त्याचे श्रोत्याला ज्ञान व्हावे. आमच्या मनाची स्थिती हीच होती. निसर्ग, तो शिंपला, तो क्षण, नेणिवेच्या पातळीवर जे सांगत होता त्यासाठी भानावर असायची गरज न्हवती, मेंदू आपले काम करत असतानाही मनाला त्या क्षणात न राहणे जमले होते. त्या शिंपल्याकडे पाहिल्यावर कायम जमणार होते.

 

या शिंपल्याने जाणीव आणि नेणिवेची घट्ट बंद असलेली मनाची पेटी अलगद उघडली होती. आता मनाला एकच काम होते. हि नेणिवेची पातळी विस्तृत करण्याचे. असे छोटे छोटे क्षण वेचत जाण्याचे. मनाचा आनंद बाह्य जगतातील अनुभवांवर न अवलंबून ठेवता त्यामुळे निर्माण होणाऱ्या या नेणिवांशी जोडण्याचे. ख्वाबिदाचे  सोs हम, कोs हम चे प्रश्न यानेच सुटतील हे नक्की!

- श्रुतकिर्ती 

११/१२/२०२०



हे शब्देविण संवादिजे I इंद्रिया नेणता भोगिजे I

बोलाआदि  झोंबिजे I प्रमेयासी II

अ. १,ओ. ५८ (सार्थ ज्ञानेश्वरी)




Comments

  1. As always, very impressive Shruti!! शिंपला न्हाऊ माखू घालून एकदम देखणा दिसतोय. 😇❤️
    "शब्देविण संवादिजे" चा भावार्थ तुझ्या जाणीवेतून अवतरतोय. शब्दांचा जरी सहारा घेतला असला तरी संवाद साधला जातोय ते medium वेगळंय. Very blessed to witness this phenomenon with you. __/\__

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Kalyani, I felt privileged to be with you and Sonali on that beach sharing those blissful moments.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान