चहा

आज आपण खरा चहा पिऊया का?” या वाक्याने शनिवारची सकाळ उजाडली आणि पाचच मिनिटात उकळणाऱ्या चहाचा सुगंध घरभर पसरला. आता प्रश्न पडेल कि खरा चहा हा काय प्रकार? 

तर खरा म्हणजे आपला नेहमीचा भारतीय उकळलेला, साखर घातलेला, झाकण ठेवून मुरात ठेवलेला,माफक दुधाचा चहा. एरव्ही सत्राशेसाठ flavour चे, थंड, गरम, दूधविरहित, डीपडीपचे, व्हेंडिंग मशीनचे असे सगळे झाले कि आठवण येते अमृततुल्य कटेल चहाची. मला खात्री आहे आपल्या सगळ्यांच्या असंख्य आठवणी असणार त्याच्याशी जोडलेल्या.

ज्या त्या पदार्थात कांदा, लसूण, टोमॅटो, टाकल्यासारखे रोज चहात आले, गवतीचहा, वेलदोडा, मसाला टाकला कि त्या वाफाळणाऱ्या चहावर अन्याय होतो. हा सगळा मेकअप एखाद्या special पावसाळी, धुक्याच्या दिवशी. घरी कोणी आले कि पाच मिनिटात आधण ठेवल्याचा आवाज आला कि त्या घरातल्या लोकांशी मनातून आपोआप नाते जुळते. चहा ला या एकदा मधली आपुलकी अस्सल चहाबाजलाच कळते. नाजूक नक्षीच्या कपातून काय किंवा काचेच्या ग्लासातून काय वेळेला चहा मिळाला कि बाकीच्या गोष्टी नगण्य ठरतात. मी आणि माझी एक मैत्रीण चहा टाक आलेच म्हणून चहाला भेटायचो आणि कप वाळेपर्यंत गप्पा मारत बसायचो. कालपरत्वे आधणाचं अंतर दुरावले पण तरीही फोनकरायच्या आधी चहा टाक हे नचूकता सांगतोच. पुणे ब्रिस्बेन घड्याळाच्या फरकातही आई नऊचा चहा घेत असताना फोन करूया असे मनात येतेच.

चहाचे जन्मस्थान आणि चहाला सांस्कृतिक महत्व असणारे चीन, जपान हे दोन्ही देश चहासाठी माझ्या जवळचे असले तरी दमल्याभागल्या वेळी लागतो तो चहा आपलाच. उकळून स्ट्रॉंग केलेला. कॉफीशी आणि ती पिणाऱ्यांशी माझे सख्य आहेच पण या दोन्हीत तुलना अशक्यच. Chai Latte च्या नावाखाली जगभर जे प्यायला मिळते त्याचेही कौतुक करणे मला जरा जडच जाते. डाळीचे पीठ आणि तेल व तळल्याचा चर्रर्र आवाज याने मन जसे वासामागे चक्कर मारून येते तसेच चहाचे आहे. रविवारी जेवून वर्तमानपत्र वाचत झोपलेल्या दमलेल्या जीवांना हळूच जागे करण्याचे, रात्री अभ्यास करणार्यांना खडबडून जागे करण्याचे कसब याच एका चहात आहे. चाय पे चर्चा, चहाच्या पेल्यातली वादळं, हाय टी, कॅन्टीनमधला, टपरीवरचा, ब्रेकमध्ये घाईघाईत प्यायलेला, छोट्याशा रेल्वे स्टेशनवर भल्या पहाटे प्यायलेला आणि अगदी नाजूक पोर्सलीनच्या कपाताला पांचट ढोमणभर चहा. सगळीच रुपं त्या त्या वेळी आनंद, वैताग, रिलीफ अश्या कितीतरी भावना जागवणारी. दवाखान्यात भेटायला नेलेला थरमॉस मधला चहा ते पिकनिक मध्ये पोर्टेबल गॅस वर केलेला चहा. एकाच पदार्थाशी किती वेगवेगळ्या प्रकारे जोडले गेलेलो असतो आपण.

अमुक एक व्यक्ती चहा छान करते/करतो आणि एखाद्याचा चहा मुळीच नको. हि समीकरणे पक्की असतात डोक्यात. दिवसभर ग्रीनटी च्या बाटल्याच्या बाटल्या रिचवणारे आपल्या शेजारच्या देशातलेही मजेशीर वाटायचे जोवर तो चहा आपल्यालाही तितकाच आवडायला लागत नाही तोवरच. जपानी टी सेरेमनी मधली ती इवलुशी भांडी, तो चहा घुसळण्याचा ब्रश... चहापेक्षा या सगळ्यांचीच मज्जा मोठी. आसाम असो कि दार्जिलिंग, सिलोन कि इंग्लिश ब्रेकफास्ट, ओच्या का कोच्या, नाहीतर लक्ष्मी रोड वरचा फॅमिली मिक्श्चर... कितीही विविध नावे असली तरी "चहा पिणार?" या प्रश्नानंतर चहा पिणाऱ्या सगळ्यांच्या मनात उमटणाऱ्या भावनामात्र एकसारख्याच असणार हे नक्की!


Photo Credit: Google Images

- श्रुतकीर्ती 

०४/१२/२०२०

x

Comments

  1. Nehemiche vishay pan kiti sunder lihites g tu... udyacha chaha ajun refreshing lagnar😃

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Dhanashree, येतेच तुझा refreshing चहा प्यायला.

      Delete
  2. श्रुती, कधी येतेस चहा प्यायला? 😜 😁 ♥️

    ReplyDelete
    Replies
    1. कल्याणी तु तर कॅाफीवाली😁

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान