कॅलेंडर

नोव्हेंबर शेवटाला आला कि वेध लागतात कॅलेंडरचे, आणि मग हातात येते नवे कॅलेंडर. कधी छान चित्रासाठी घेतलेले तर कधी त्यातील अधिक माहितीसाठी. कॅलेंडर हाती आले कि काही गोष्टी पटकन बघितल्या जातात. वाढदिवस कोणत्यावारी येतोय? गणपती केव्हा आहेत? दिवाळीत भाकड तिथी आलीय का? जोडून सुट्ट्या किती आल्यात? ह्यातले काहीच न बघणारा विरळाच.

काही कॅलेंडरच्या मागील भाग वाचनीय असतो मग निवांत पणे तो वाचणे हे ओघानेच आले. शनिवार, रविवारची वर्तमानपत्राची पुरवणी वाचल्याचे फीलिंग येते त्याने. पाककृती, भविष्य ते रेल्वे टाईमटेबल वाट्टेल ते सापडते त्यात. महिना संपल्यावर, पान उलटल्यावर त्या पानांचे विविध उपयोग सुरु होतात. लहानपणी पुस्तकांना कव्हर घालायला आणि मोठे आकडे असले कि ते कापून रोल नंबर तयार करायला हि पाने मी आणि माझ्या आसपासचे वय असणाऱ्या बऱ्याच जणांनी वापरली असणार नक्की. काही कॅलेंडर फार देखणी असायची. एकच मोठे चित्र आणि फाडून टाकायच्या महिन्याच्या पट्ट्या. कधी कधी त्या तारखांच्या पण असत. रोज ती तारीख फाडायला काय गम्मत यायची. बहुतेकवेळा किराणावला असले कॅलेंडर द्यायचा आणि हमखास त्यात जाडपुठ्यावर छापलेली कमळात उभी असलेली लक्ष्मी असायची, हातातून नाणे पडणारी. निरमाची कॅलेंडर्स आठवत असतील तर कृष्णमय असायची, सुंदर बघत राहावीत अशी. मला आजही त्यातील कुरुक्षेत्रावरील विश्वरूप दर्शन आठवते. निसर्गचित्रे असणारी बऱ्याचदा इंग्रजी तारखांची असत आणि चित्रपण परदेशीच वाटे. बँकांची, दुकानांची एकना अनेक. सगळ्यांचा तो जाहिरात करण्याचा सोप्पा आणि आवडता मार्ग असे. टेबलावर ठेवायची, काचेखालची, स्पायरल बाइंडिंगवाली, पाकिटात ठेवायची कितीतरी प्रकार. डिसेंबर जानेवारीत खरेदी करणाऱ्याला आणि नेहमीच्या गिर्हाईकांना हमखास कॅलेंडर मिळेच.

आता खिळा ठोकून कॅलेंडर लावायचे दिवस संपल्यात जमा झालेत. चतुर्थीचा चंद्रोदय, गौरीगणपती, नवरात्र, दिवाळी बघायला कॅलेंडरची आठवण येते. अशा गोष्टी छापणारे कॅलेंडर वाले पण हुशार आहेत. त्यांचे ऍप पण आलेत. पूर्वी घरोघरी असणारे दाते, टिळक पंचांग यांच्या पाठच्या भागावर केव्हाच सामावले गेले. फोनवर तारखा घड्याळ बघायची सवय लागल्यापासून एखादे कॅलेंडरच पुरेसे होऊ लागले.

अशी कॅलेंडर वर्ष संपल्यावर वाचायला मज्जा येई. छापील लिखाणाबरोबर भरपूर हस्तलिखित मजकूर सापडे त्यात. जास्त कमी केलेले दुधाचे हिशेब, बाईचे खाडे, कुणाकुणाला केलेली आणि घेतलेली आमंत्रणे. शिंप्याकडून कपडे मिळण्याच्या तारखा, श्राद्ध पक्ष असंख्य नोंदी. तारीख लिहून उरलेला चौकोन त्यासाठीच जणू सोडलेला. Weekly planner, shopping list, reminders अशा सगळ्या गरजा एका ठिकाणी भागत.

तरीही school holidays बघायला इंग्रजी लोकल कॅलेंडर लागते तसेच हे सगळे सणवार बघायला 'भिंतीवरी कॅलेंडर असावे' लागतेच. म्हणूनच वर्षाच्या अखेरीस कॅलेंडर खरेदी होतेच होते आणि जुन्या नोंदी कागदावरून मनात जपत नव्या नोंदी  मनातून कागदावर करण्याची मनाची तयारीही सुरु होते.

श्रुतकिर्ती 

१८/१२/२०२०


Comments

  1. Yes, calendar!!! एक दशकापूर्वी पर्यंत सर्वाच्याच जीवनातील अविभाज्य घटक. मी पण भरपूर जमा करायचे शाळेत असताना. पुढे Art School मध्ये गेल्यावर ह्यातील गुळगुळीत घोटीव paper ची calendars ज्यांचा पाठचा surface कोरा असायचा, त्यावर drawing, ink work खूप सुंदर दिसायचे. काही काही calendars वर "Quotable Quotes" असायची. एकदम inspirational. बर्‍याच प्रकारचा उपयोग व्हायचा.
    श्रुती, तुझ्या लेखाने जुन्या आठवणी डोळ्यासमोरून तरळल्या. छान वाटलं. ♥

    ReplyDelete
  2. Khupach Chan. Feeling nostalgic. Lahan pani Kay Kay vedepana karayacho aathawun Hasu aale. Pan shewati ramya te din, ramya tya aathawani. Sundar lihilays

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान