रोज संध्याकाळी फिरायला जाताना बऱ्याच घरांमधून स्वयंपाकाचे वास येत असतात. आपले जेवण घरी तयार असले तरी हा वास कोणत्या पदार्थाचा हा guessing game मेंदू खेळतच राहतो. काही काही पदार्थांचे,वस्तूंचे गंध मनातल्या असंख्य तारा छेडून जातात. नाकाला जाणवणारे हे वास मनाला वेगळ्याच जगात transport करतात. सकाळी सकाळी कॅफे समोरून नुसते चालत गेले तरी खडबडून जाग येते, पोटात कॉफी न जाता देखील. पहिल्या पावसाचा सुगंध प्रत्येकाला आवडतो. कवीला कविता सुचवतो तर तुम्हा आम्हाला वेध लावतो तेलात चुर्रर्र आवाज करत तळल्या जाणाऱ्या डाळीच्या पिठाचे. खरपूस भाजली गेलेली माती आणि त्यावर पडलेले पाण्याचे चार थेंब! त्यामागून मनात यायला लागतो तो रस्ताभर सडा पडलेल्या गगनजाईच्या फुलांचा सुवास. या सुवासांना जोड मिळते या पावसाळी वातावरणात येणाऱ्या सणावारातील फुले पानेउदबत्तीकपूर याच्याबरोबर येणाऱ्या नैवैद्यातल्या पदार्थांची. एकदा कोणताही सणवार नाहीच हे माहित असताना देखील आमच्या घरी जेवायला आलेल्या पाहुण्याला सत्यनारायण आठवलेला. कारण फक्त अळूवडी आणि उदबत्ती यांचा एकत्रित वास.

समुद्राच्या जवळ पोचायला लागलो हि जाणीव होतेच होते. समुद्रावरून येणारा खारट वारा,पाणी जवळ आल्याचे मेंदूला बरोब्बर सांगतो. Rainforest मध्ये येणार गंध दुसऱ्या कुठल्या जंगलाला नाहीच. चाफ्याचा वास दरवळला कि मन पटकन देवळात जाऊन येते.

निसर्गात जसे विविध वास लपलेले आहेत तसेच या आपण निर्मिलेल्या जगातही. पेट्रोलचा वासही सहन न होणारे आणि पेट्रोलपंपावर खोल श्वास घेणारे दोन्ही प्रकारचे लोक आजूबाजूला असतातच की. सकाळी सकाळी डिओ, परफ्युमची अंघोळ करून सगळी लिफ्ट सुगंधित करणारे महाभाग भेटताच. ठेवणीतल्या कपड्यांच्या कपाटाला येणार डांबराच्या गोळ्या, कसली कसली अत्तरं असा एकत्रित सुवास आठवणींचा खजिनाच उघडतो. कितीही वेळा धुतल्यानंतरही आईकडून मागून आणलेल्या साडीत लपलेला तिच्या मायेचा वास मनात कायम वसतीला असतो. भरदुपारी शेंगदाणे भाजूनही संध्याकाळी घरी येणार्यांना त्याचा शोध लागतोच. कोऱ्या पुस्तकाचा आणि नव्या रंगाचा गंधही दरवेळी नव्याने आवडत असतो.

चांगल्या वासांबरोबर कधीकधी नकोसे वाटणारे वासही आठवणीत राहतात. Chemistry लॅब मधला अमोनियाचा वास त्यातलाच एक. कचरा जाळणारे त्यात प्लास्टिक आणि टायर जाळतात तेव्हा त्या वासाने होणारी घुसमट असह्य असते. एखाद्याच्या हातातल्या फुलाने आनंद मिळतो तसेच सिगारेटने डोकेदुखी.

पावसाचा वास आनंद देतो पण त्याचा अतिरेक झाला कि पुरानंतरचा कुजका वास त्यात सर्वस्व हरवलेल्यांच्या मनातून कधीही जात नाही. नाझी होलोकास्ट नंतर Auschwitz च्या आसमंतात पसरलेला मानवी रक्तामांसाचा असह्य वास काही दिवसात गेला तरीही त्याच्याशी निगडित असलेल्यांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे राहिलाच.

आपल्याला वास आवडतात कि त्याच्याशी निगडित आठवणी? बहुदा आठवणीच. परिचित वास आले कि आठवणी जाग्या होतात तसेच अपरिचित वासाने कुतूहल. त्यामुळे वास नाकाबरोबर मेंदूलाही कामाला लावतात हे खरे. त्यामुळे नाकाच्या शेंड्यावर राग आहे हे हद्दपार करून नाकाच्या शेंड्यावर गंध आणि आठवणी आहेत हेच लक्षात ठेवलेले बरे. म्हणजे हे सगळे टाईप करताना गॅसवरचे काही करपले तर वास नक्कीच येईल.

- श्रुतकिर्ती 
  २५/१२/२०२०

Picture Courtesy: Google Images. 

Comments

  1. श्रुती, ख्वबिदा हे नाव सार्थक ठरणारा हा लेख. Arbitrary thoughts!!! 😃 👍कित्ती ठिकाणी फिरवून आणलंस! त्या वाक्प्रचारावरून 'नाक लांब असणे' हा पण वाक्प्रचार आठवला.... असो. 😁

    ReplyDelete
    Replies
    1. Liked that my arbitrary thoughts are enjoyable and remind you of something 😊

      Delete
  2. खूप आवडले शृती👌🏻👌🏻

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान