आठवण.

"मला आठवण कर जातांना हे घेवून जायची", "आठवणीने ने हं", "मला आठवण आहे न्यायची" हे संवाद दिवसभरातून पन्नासवेळा घडून ही मैत्रीण घरी गेल्यावर मी फ्रीज उघडला आणि कारली आवासून माझ्याकडे बघत होती. शेवटी आम्ही दोघीही विसरलोच. लक्षात काही राहीले नाही. आमच्या दोघींच्याही so called तल्लख मेमरी ने 'भरवशाचा म्हशीला टोणगा!' हे पुन्हा prove केलेच होते. दिवसभरातल्याच नव्हे तर मागच्या असंख्य वर्षातल्या आठवणी आम्ही तेवढ्या वेळात उगाळल्या होत्या पण लक्षात ठेवण्याची एक practical गोष्ट पार विसरलो.

आता हा ही क्षण आमच्या कायमचा आठवणींचा भाग झाला होता. 'मागच्या वेळेस विसरलो होतो' हे आम्ही नक्की लक्षात ठेवणार होतो. क्षणांच्या आठवणी अशाच होतात कां?

'मला आठवतय' असे म्हणतांना आपल्या बंद डोळ्यांपुढे एक इस्टमन कलर मुव्ही चालत असतो. भले बुरे साठवून ठेवलेले पडद्यावर आणत राहतो. रम्य आठवणी म्हणता म्हणता काही आठवणी पिच्छा सोडत नाहीत. वेताळासारख्या पुन्हा पुन्हा मानगुटीवर येऊन बसतात. लक्षात ठेवण्याचा भाग मेंदूचा आणि आठवण जपण्याचा भाग मनाचा अशी विभागणी असावी असे उगीचच मला वाटते. मेंदू रुक्ष कामे मन लावून करतो असा आपला समज. जरतारी किनखापी हळूवार आठवणी आणि तुर्कस्थानची राजधानी अंकारा हे त्या  शेजारच्या शेजारच्या grey cells मध्येच save होत असते ना! त्या लक्षात ठेवलेल्या information ला भावनांची झालर लावते मन आणि तयार होते आठवण. कितीतरी स्पर्श, रस, गंध आपल्या आठवणींच्या कुठल्या कप्प्यात दडले आहेत कोण जाणे. कोणत्या दृश्याने, वासाने, क्षणाने ते सुप्तावस्थेतून जागृतीत येतील हे ही कोडेच. आज वर्तमानात असणारा प्रत्येक क्षण उद्या आठवणच होणार फक्त त्याला जरतारी झालर लावून वारंवार आठवण्याच्या योग्यतेचा करायचा कां मेंदूत एक छोटे recycle bin असते त्यात टाकून कधीतरी भविष्यात बाहेर काढायचा; वेगळ्या रूपात का सरळ पटलावरून पुसून टाकायचा आठवणच होऊ देता हे ठरवायलाही तो मेंदूच शाबूत असावा लागणार. तो ते करतोही, काही वर्षानंतर आपल्या आठवणी धुसर होतात, माणसे विसरतात, मानापमान बोथट होतात. क्षणांना, आठवणींना त्यांचा due course run होऊ द्यावा नाही कां? त्या कसोटीतून टिकल्यातर टिकल्या नाहीतर तसेही आठवणार नाहीतच. स्वतःच्याच मेंदूवर गाढ विश्वास ठेवावा, त्याला काय लक्षात ठेवायचे हे पक्के माहीत असते. बिनकामाची माहिती तो कालांतराने कोपऱ्यात ढकलतोच फक्त तेवढा वेळ द्यावा लागतो. विसरण्याचा गुण तेवढ्यासाठीच तर मिळालाय आपल्याला.

फ्रिज मधली कारली आमच्या पोटाच्या फार उपयोगाची होती पण दिवसभरातल्या असंख्य क्षणांच्या होणाऱ्या आठवणी आमच्या मेंदूला पुढच्या खुप वर्षांसाठी साठवायच्या होत्या म्हणून तर त्याने ती जागा अडवू दिली नव्हती त्यांना! हा मेंदूचा निवडीची चाळणी लावण्याचा गुण लवकर मनाला पण मिळो आणि फक्त आणि फक्त प्रत्येक क्षणातले चांगले तेवढे जपण्याचे वरदान मिळो हीच एक इच्छा!

 

- श्रुतकिर्ती

०८/०१/२०२१



 

 

Comments

  1. मेंदू चा job आणि मनाचा job 👌😀. निवडीची चाळणी लावण्याची idea सुद्धा छान आहे. तुला कुठे मिळाली, तर जरूर सांग 😜❤️👍

    ReplyDelete
  2. मिळून शोधुया लवकर सापडेल😁💕

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान