घड्याळाचा काटा उलटा फिरत नाही तसाच वजनाचा पण बऱ्याचदा. एकदा निघाला की निघालाच. सुरवात जरासे गाल गुबगुबीत होण्याने होते खरी, पण हळूहळू चांगले बाळसे धरते. मग सुरु होते मनाची आणि जीवाची कसरत. काय काय करावे तेवढे थोडे. शेकडो diets, हजारो exerciseसतराशे साठ lifestyle आणि गल्लीबोळात जिम. रोज काटा जरासा मागे जरासा पुढे पण तेवढाच. अगदी भिंगाखाली बघितले तरच फरक दाखविणारा.

 
    चार जण (मुद्दाम जणी हा शब्दप्रयोग टाळलाय वजन कुठलाही भेदभाव करीत नाही.) भेटले कि हवापाणी, ट्रॅफिक नंतर एखादा बारीक झालेला/झालेली सगळ्यांना सापडते आणि मग टिप्स ची देवाणघेवाण, खात्रीलायक उपाय, guaranteed डाएट हे सगळे चवीचवीने चघळले जाते. घरी येऊन उरलेल्या वजनदार लोकांचे ठाम निश्चय होतात. जोशात सुरवात होते आणि दहातले आठ पुढच्या भेटीत अजून वजनदार झालेले सापडतात. नव्या वर्षाच्या सुरवातीला हा अनेकांचा पहिला गोल असतो. पण छान छान खाद्यपदार्थ, ते खाण्याच्या अमाप संधी, cheat days ची वाढणारी संख्या,कठोर परिश्रमांचा येणार कंटाळा हा गोल हळूच शेवटी ढकलतो आणि आपण शेवटी एकतीस डिसेंबरला गोलच राहतो.
 

    सगळेच असे असतात असे नाही. काही अपवादात्मक उदाहरणे स्वतःला बदलतात, जाणीवपूर्वक छोट्या छोट्या गोष्टींनी ग्रॅम ग्रॅम करत किलो उतरतात. फिटनेस परत येतो, धापा कमी लागतात, जुने कपडे बसू लागतात आणि घात होतो. जरा इकडेतिकडे झाले कि वजन झपाट्याने कधी गेलेच न्हवते एवढ्या सुपरसॉनिक गतीने परत येते. येताना अंमळ वाढूनच येते. पुन्हा दीक्षित, दिवेकर आठवतातजिम मेम्बरशिप रिन्यू होतात आणि वजनाचा यो यो गमे चालूच राहतो.जॉगिंग, वॉकिंग, योग एक ना भराभर सगळे मदतनीस हजार असतात पण जिम ऐवजीबाहेरचा पाणीपुरीवाला जास्त जवळचा असतो. 'Diet food need not be boring.' हे वाचूनही आपले आवडते जंक फूड कसे healthy आहे हे मनाला समजावण्यातच आपण कायम यशस्वी होतो. आजचा एकच दिवस आठवड्यात महिन्यात पटकन रूपांतरित होतो.

 

    वाढते वजन हा एक चेष्टेचा विनोदाचा भाग होऊन जातो. त्याचे वाढणे, जास्त असणे हि जाणीवच बोथट होत जाते. मी असाच/अशीच आहे असे स्वतःला खोटे समजावणे सुरु होते. 'My body my choice.' वाला खोटा attitude येतो. काय मिळते यातून? समस्या सुटताच नाही फक्त कोंबडे झाकून ठेवले जाते.

 

    पण एखादा दिवस खरंच उजाडतो. शंभर वॅटचा प्रकाश लक्खकन पडतो आणि त्या वाढलेल्या वजनाचा उबग येतो. मनाचा ठाम निश्चय होतो. फॅड डाएट ची जागा दीर्घकाळशक्य असणारे बदल घेतात. नेहमी आडवे येणारे अडथळे पार होतात. जुन्या सवयी मोडून नव्या सवयी लागतात. उतरलेले वजन परत यायचे नाव काढत नाही आणि आपल्याला आपल्यातला नवा बदल आवडायला लागतो.


    मग वाटते, या प्रवासात वजनाचे obsession जाऊन फिटनेस कडे लक्ष वाढो. वाढवायचे का कमी करायचे या पेक्षा निरोगी राहण्याची धडपड चालू राहो, आणि मगच आपली हि वजनाची वजनदार पण इटुकली पिटुकली गोष्ट सरो आणि वजन कमी करणाऱ्याचे पोट ना जेवताच भरो!




- श्रुतकिर्ती 

२२/०१/२०२१

Comments

  1. श्रुती, this made me laugh 😂.

    हळु हळू life experiences आल्यावर आपण जसे give in / give up!?! करत जातो, त्यातील Most common, universal area where people compromise on is "वजन" 🙄.
    You took me on the whole familiar 🙄 journey through your words and landed on a "familiar" place. 😀. ~ कल्याणी

    ReplyDelete
    Replies
    1. Good that it made you laugh! What journey is worth without a good laugh 😊

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान