को जागर्ति?

अनेक दिवसांनी आम्ही चार पाच मैत्रिणी एकीकडे जमलो होतो. जेवण झाल्यावर गप्पा मारताना चला झोपूया उद्या मला लवकर निघायचंय, मला ट्रेन आहे,  ट्रॅफिक लागला कि मला एकाच्या जागी दोन तास लागतात. हे सगळे म्हणतानाही गप्पा काही थांबत न्हवत्या. घड्याळाचा काटा पाणी,कॉफी ,गप्पा  अशा चक्रात गोल गोल फिरत होता. पहाट झाली आणि थोडे पडूया म्हणत सगळ्या झोपल्या. सकाळी थोडीशीच झोप झालेल्या पण खूप फ्रेश चौघी आपापल्या घरी परतल्या  घरी येताना माझ्या मनात घोळत राहिल्या रात्रीच्या आठवणी आणि मनात आले का जागलो इतक्या?रात्रीच का रंगल्या या गप्पा?

 रात्री मारलेल्या गप्पांची जादू मनावर टिकून राहते. रात्रीची शांतता,कामांमधून मिळालेली उसंत,कशाचीच नसलेली घाई या सगळ्याचा परिणाम म्हणून कि काय जागरणाला उत येत असावा वाटते. 

मुळात गप्पा मारायला सुरवात झाली कि स्थळकाळाचे भान विसरणे हेच त्यातील यश आहे. चार जवळची माणसे आणि जिव्हाळ्याचा विषय. आणखी हवे तरी काय? निरर्थक,निरुद्देश गप्पानीच जगण्यातील मजा टिकून राहते. अशा रात्र रात्र जागूनच गप्पातून काहीतरी नवनिर्मितीही होते. Sharing is Caring हे लहानपणापासून माहित असूनही त्यासाठी ती माणसे आणि ती वेळ जुळून यावे लागते. प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगण्यासारखी नक्कीच नसते, प्रत्येक मैफिलीचे श्रोते वेगळे तसे गाणेही वेगळेच असते. हा शेरिंगचा विश्वास नसेल तर गप्पा रंगतच नाहीत. स्मॉल टॉक्सने रात्र काय जागवणार?सांगणारा विश्वासाने सांगतोय तर त्याचा आदर न करता ऐकणाऱ्याशी वारंवार संवाद होऊच शकत नाही. 

गप्पा मारता येणे हि जर कला असेल तरी गप्पा ऐकता येणे हि त्याहून मोठी कला आहे. ऐकणारा, मधेच टेकू देणारा नसेल तर बोलणाऱ्याला तरी काय मजा?सांगायला,ऐकायला जिवाभावाची चार माणसे असणे यासारखे दुसरे भाग्य नाही. मनात आले तर फोन करून पाच मिनिटे कोणत्याही कारणाशिवाय बोलतायेण्यासारखी मित्र/मैत्रीण असेल तर अजून काय हवे? 

गप्पानां अजेंडा असून  चालत नाही. ठरवून,प्लॅन करून त्या गप्पा राहत नाहीत. नंतर त्यांचे मीटिंग मिनिट्स हि काढायचे नसतात. सरत गेलेल्या क्षणांच्या आठवणी बंद पापण्यांआड सारून तिथेच जपायच्या असतात. कधीतरी पुन्हा डोळे उघडून ते क्षण परत जगायचे पण एकट्यानेच, मनापासून कुणीतरी सांगितलेले वाटायचे नाही. स्वार्थीपणाने जपून ठेवायचे. हे नियम पाळले कि पुन्हा पुन्हा हि संधी मिळतच  राहते. यातूनच नाती टिकतात आणि वाढतात. 

हे सगळे मैत्र जुळून यायला रात्रीपेक्षा चांगली वेळ ती कोणती? चंद्र,चांदण्या,शांतता हे असले तर घडणारी जादू जवळची माणसे, मिणमिणता दिवा आणि दूर ओरडणारे कुत्रे यांच्या साथीने पण रंगतच आणतात. हे सगळे जादुई वातावरण,मनातले सांगण्याची आणि ऐकण्याची इच्छा, नाते जागते राहायला अधिक काय पाहिजे? मग वर्षात एक काय असंख्य कोजागिरी साजऱ्या करता येतात. त्या देवी लक्ष्मीलाही हे रात्रीचे महत्व माहित असणार म्हणूच तर विचारत असते ती को जागर्ति? को जागर्ति?

                        



                                     म्हणोनि संवादाचा सुवावो ढळे। तरी हृदयाकाश सारस्वते वोळे।

                                      आणि श्रोता दुश्चिता तरी वितुळे| मांडला रसू ।। 

                                                                                       संत ज्ञानेश्वर माउली. 





श्रुतकिर्ती 

२९/१/२०२१

Comments

  1. मला आवडलेले वाक्य - - "सांगायला, ऐकायला जिवाभावाची चार माणसे असणे यासारखे दुसरे भाग्य नाही." - - दिवसाच्या सुरुवातीला आपण खूप भाग्यवान आहोत, ह्याची जाणीव झाली. आता "Have a wonderful day", हे म्हणायची गरजच नाही. ☺️
    त्या Dnyaneshwari च्या ओवीशी सांगड सुद्धा छान घातलीस. माऊलींची ओवी प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे स्पर्श करते याचा हा दाखला. 😇.
    ~ कल्याणी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान