सवय

'मागून तिसऱ्या लाल झाकणाच्या बरणीत बघ' किंवा 'दुसऱ्या ड्रॉवरच्या डाव्या कोपऱ्यात वरून दुसरा' हे असे direction सांगणारे संवाद बऱ्याचदा आमच्या घरात चालू असतात. आणि मग माझ्या डोळ्याला चष्म्यात लेसर स्कॅन बसवलाय का हे चेक होते. हा सवयीचा परिणाम का दुष्परिणाम कोण जाणे. त्याच वस्तू तीच ठिकाणे,वारंवार ठेवणारा तोच हात सगळे सवयीने होऊन जाते.

सवयीने सगळे सोपे होते. हातांना डोळे फुटतात असे वाटते. एक comfort zone निर्माण होतो. एका डब्याची जागा बदलली तरी वैतागणारे अनेक जण असतात आणि रोज उठून वस्तूंच्या जागा बदलणारे पण. सवयीच्या वस्तू, सवयीचे रस्ते, जागा, काम आणि मुख्य म्हणजे सवयीची माणसे. खूप वेळा माणसांची, त्यांच्या वागण्याबोलण्याची न्हवे असण्याचीच इतकी सवय होते कि त्यांची जाणीव होणेच बंद होते. मग सवयीनेच त्यांचे महत्वहि कमी होते. साखरेचा डब्बा रोज तिथेच आहे हे माहित असल्यावर त्याचे असणे जाणवणे थांबते तसे. पण अचानक गोष्टी जागा बदलतात. रस्ता चुकतो, काम बदलते आणि कधी कधी माणसेही दूर होतात. आपण चाचपडतो, धडपडतो, नाराज होतो पण मग हळूहळू त्याचीही सवय लागते. नवीन वस्तू, गोष्टी, घटना, रस्ते आपले वाटायला लागतात. माणसे नसण्याचीही सवय लागते. जुन्या सवयी बदलणे अवघड पण अशक्य तर नसतेच कधी कधी जाणूनबुजून हे बदल घडवावे लागतात. मानसिक स्वास्थ्य टिकवायचे तर हे बदल करावे आणि पचवावेही लागतात.

सवयी चांगल्याच पण त्या कधी कधी बांधून टाकतात. Monotonous करतात. Comfort zone मधून बाहेर येणे अवघड आणि त्या बाहेरही जग आहे याची जाणीव बोथट करतात. डबक्यातल्या पाण्यावर शेवाळे धरावे तसे होऊन जाते. हे खरे असले तरी सवयीनेच आयुष्यात स्थैर्य हि येते, शांतता पण लाभते कारण routine लागते. काही सवयी  मुद्दाम लावाव्या लागतात तर काही मुद्दाम बदलाव्या लागतात. तीच ती आणि तशीच कृती वारंवार करून मेंदूला जणू condition केले जाते आणि मग वंगण लावलेल्या यंत्रासारखा तो योग्य रीतीने काम करतो. हात पाय एक कृती करत असताना मन वेगळे काम करू शकते ते त्याला लागलेल्या सवयीनेच. विविध गोष्टी अवधान ठेवून करण्याचे अनुसंधान सवयीनेच साधते.

नुसत्या सवयीने कामे केली कि घाण्याचा बैल व्हायला वेळ नाही लागत. माणूस म्हणून जन्माला आल्यावर जगण्याच्या प्रत्येक क्षणात नाहीतर काही मोजक्या क्षणात तरी उस्फूर्तता, काहीतरी वेगळे करण्याचा विचार मनात न आला तर जगण्याचा फायदा काय? सगळ्यांनीच सवयीच्या चक्रात अडकून घेतले तर नवे काही घडणार कधी आणि कसे. प्रत्येक घटनेकडे बघण्याचे कुतूहल शिल्लक आहे तोवर माणसाचे मन जिवंत आहे. सवयी कायम साथ देतात पण त्यांच्या आधिन झालो कि उध्वस्तही करतात म्हणून सवयी आपल्या का आपण सवयीचे हा एक fine balance साधला कि जगण्याचे मशीन ना कुरकुरता चालेल बहुदा.

 


Take me, train me, be firm with me,

and I will place the world at your feet.

Be easy with me and I will destroy you.

Who am I?

I am a Habit.

(Anonymous riddle)

- श्रुतकिर्ती

०५/०२/२०२१

Comments

  1. श्रुती, तुझे लिखाण वाचायची सवय लागली आहे. 😃
    दर आठवड्याला असा कोणतातरी स्वगत साधणारा विचार डोक्यात शिरतो. आणि मन arbitrary करून टाकतेस, it is indeed an enjoyable experience. Till next time... ❤️ Kalyani.

    ReplyDelete
  2. Hope this सवय is good 😊💞

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान