चष्मा

 

कालपासून पाऊस रिमझिम रिमझिम पडतोच आहे, थोडे उघडल्यावर बाहेर पडलेतर पाच वाजताच आभाळ दाटून आंधारले होते. पावसाचे पाणी पडलेल्या चष्म्यातून ढग अजूनच राखाडी दिसत होते. रोजचाच तो समुद्रकिनारा पण आज ढगाळलेला, पाणी गढूळलेले आणि रोजची गर्दीही (तशी एरवीही ती तुरळकच असते.) न्हवती. एक सर येऊन गेली आणि आभाळ मोकळे झाले. दिवस मावळू लागल्याने तसाही प्रकाश कमीच झाला होता. अचानक मला चष्म्यावरच्या पाण्याच्या थेंबांची जाणीव झाली ते पुसले आणि माझ्या दृष्टीवरचे मळभही क्षणात दूर झाले. बुडणाऱ्या सूर्याने राखाडी ढगांची किनार सोनेरी केली होती. उथळ जागेत समुद्राचा तळ नितळ पाण्यातून दिसू लागला, लांबवर चालणारी दोन-चार डोकीही दिसली. माझ्याही पावलांना गती आली… एका छोट्याशा कृतीने माझाच रोजचा चष्मा स्वच्छ पुसल्याने ,तेच दृश्य एकदम सुस्पष्ट झाले. बारकावे दिसले आणि विचारही बदलले.

मनात आले या दोन काचांनी गेली अनेक वर्षे किती प्रामाणिक साथ दिलीय. आता तर मी चष्म्याशिवाय माझा विचारच करू शकत नाही इतका तो माझा अविभाज्य भाग झालाय. सवयीने नाकाला चष्म्याचे ओझे नाही जाणवत आता. चष्म्याची चेहऱ्याला आणि माझ्या चष्म्यासकटच्या चेहऱ्याची मला स्वतःला इतकी सवय झालीय कि चष्मा लावलेला न्हवता म्हणून स्वप्न हि स्पष्ट दिसले नसेल असे कधी कधी उगीचच वाटते. एक चष्मा छान असला कि बाकी accessories चा विचारही बाजूला पडत जातो. पण हा झाला वस्तूतला चष्मा, डोळ्यावर लावायचा. बऱ्याचदा मनावरही चष्मा चढवावा वाटतो म्हणजे मनाचीही दृष्टी स्वच्छ होईल, अंधुक पुसट दिसणाऱ्या अनेक घटनांचे,माणसांचे कंगोरे सुस्पष्ट दिसतील आणि विचारांना clarity ,शार्पनेस येईल. चष्मा काढून बघितले कि वेगळा दृष्टिकोन येतो हे म्हणणाऱ्याला बहुदा चष्माच नसावा, खरा दृष्टिकोन तर चष्मा चढवल्यावरच येतो.

या चष्म्याने त्रासही बरेच दिले. पूर्वी काच असायची चष्म्याला,ती अचानक निखळणे,पडून फुटणे, वाचताना झोप लागून पार वाकडातिकडा चष्मा सकाळी सापडणे,एक ना दहा. फ्रेम निवडणे एखादा मौल्यवान दागिना निवडण्याइतकेच अवघड काम असते. नवी चप्पल चावते तसे चष्मेही कानामागे,नाकावर चावतात. चार दिवसाने रुळले कि चेहऱ्याचा भाग बनून जातात. Bifocal वाल्यांची अजून तर्हा न्यारी, ऍडजस्ट होईपर्यंत पार डोकेदुखी पण एकदा जमले कि नंबर बदले पर्यंत काळजीच नाही. चष्म्यावर फ्लॅश उडून कितीतरी चांगले फोटोही उगाचच बाद होत असतातच. तसा विचार केला तर माझ्याबरोबर माझे चष्मेही बदलले. कधी नाजूक मेटलची फ्रेम तर कधी rimless,कधी fashion statement च्या नावाखाली त्यावर खडे आले तर कधी ब्रँड बदलले. कधी चॉकोलेट वडी एवढा तर कधी अर्धा चेहराच झाकण्याएवढा मोठा. मी चष्मे बदलले आणि चष्म्यांनी माझे दिसणे! एक मात्र कायम राहिले, स्वच्छ नितळ दृष्टिकोनासाठी रोज चष्म्याला पुसत राहणे!



                                                                                    - श्रुतकिर्ती 

                                                                     -१९/०२/२०२१


Comments

  1. ज्यांना चष्मा कायम लावावा लागतो, विशेषतः अगदी लहान पणापासून, त्यांच्याबद्दल सहानुभूती नेहमीच वाटायची पण आज वेगळाच कळवळा वाटतोय. कितीतरी व्यवधाने जास्त सांभाळावी लागतात.
    श्रुती, आज तुझ्या चष्म्याने, तू माझी दृष्टी अजून कनवाळू केलीस. __/\__ : CK

    ReplyDelete
    Replies
    1. चष्मा असण्याचा अभिमान नाही पण सुदैवाने चष्म्याचे न्युन कधी वाटले नाही... तो मित्रच आहे पण हे शेवटी चष्मा असणार्याचे मत आहे .. समोरून बघणार्याला वेगळे वाटूच शकते💞

      Delete
  2. मस्त श्रुती छान लिहिलं आहेस. आजच्या ह्या एव्हर चेंजिंग जगात प्रत्येकाकडे,स्वतःचा फोकस तारतम्याला अड्जस्ट करणारा चष्मा हवाच.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you,vision ॲडजेस्ट करणारा😊

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान