चकवा

अशाच एका ब्लॉगवर एक रहस्यकथा वाचायला मिळाली. कोकणच्या पार्श्वभूमीवर माणसांबरोबर भुताखेतांचा यथेच्छ वावर होता. एका भागात कथेचा नायक अमावास्येला का पौर्णिमेला जंगलात फिरत बसतो. रस्ता चुकतो आणि बरेच काही. तो वारंवार त्याच ठिकाणी येत होता, त्याला म्हणे चकवा म्हणतात. ते वाचले आणि सहज जाणवले; हा चकवा खरा का खोटा देव जाणे पण रोज शेकडो चकवे आपल्याला भुरळ घालतात आणि त्यातल्या कितीतरी चकव्यात आपण हमखास फसतोच.

आपला स्वभाव, मन, विचार ह्यांना इतक्या dimensions आहेत ना कि त्यांनी विणलेल्या जाळ्यात आपलाच पुढचा विचार कधी अडकेल आणि फिरत बसेल हे आपल्यालाच उमजत नाही. षडरीपूंची देणगी असलेल्या माणसाच्या मनाला चकवा, भुरळ पडणार नाहीत तरच नवल. एखाद्या सकाळी सकाळी सुब्बालक्ष्मींचे 'कौसल्या सुप्रजा रामा' डोक्यात घोळत राहते तर अगदी दुसऱ्याच दिवशी रेडिओवर लागलेले 'टन टणाटण टणटण टारा' दिवसभर वैताग आणत राहते. मनाची रेकॉर्ड अडकायला काहीही पुरते. मनात आलेला चांगला विचार कामाच्या गर्दीत बाजूला पडतो पण शंका, वाईट विचार फिरून फिरून घोळत राहतात. मनात आलेलं एखाद्यावेळी बोलायला, सांगायला नाही जमत, मग खेळ सुरु होतो चकव्याचा. तेच मत तोच विचार तिथेच फिरवत राहतो आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नसतो. भुताच्या गोष्टीत चकव्यातून बाहेर पडायला कोणीतरी त्रयस्थ भेटावं लागतो, कुठेतरी ठेचकाळावे लागते तसेच विचारांच्या चकव्याला भेदायला वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळायला लागतो.

विचारांचा चकवा चांगला वाईट काहीच नसतो. चांगले वाईट असते ते त्याचे outcome. एखादा शास्त्रज्ञ विचारांच्या चकव्यात अडकूनच नवा शोध लावण्यात यशस्वी होतो. वारंवार येणारे अपयश त्याला नव्या मार्गाने जायलाच प्रवृत्त करतात. चकव्याची एक हद्द असते असे म्हणतात. त्या हद्दीबाहेर त्याची सत्ता नाही चालत, हे विचारांना पण लागू करावे. शंकाकुशंकाराग ,लोभ, मानापमान यांना त्यांच्या एका हद्दीतच ठेवावे. त्या कुंपणाबाहेर असावे एक निर्मळ, नितळ मन. कधीतरी चकव्याने त्या कुंपणात शिरलोच तर असावे कुणीतरी हात देऊन पल्याडच्या जगात न्यायला, चकवा भेदायला, विचारांच्या आभासी मर्यादा तोडायला; सारखे सारखे या चकव्यात सापडायला लागलो तर कणखर होऊन त्याचा चांगलाच पक्का बंदोबस्त करायला. मग हा बागुलबुवा किती घाबरवू शकेल?

दिवास्वप्नात रमणे हा देखील चकवाच न्हवे का पण थोडासा लोभसवाणा. अरण्यऋषी मारुती चिंतामपल्लींच्या आत्मकथनाचे नाव आहे 'चकवाचांदण' कारण घुबडाला चकवाचांदण म्हणतात. रानात रात्री घुबडाने घुत्कार केला कि दिशा हरवते आणि शुक्राची चांदणी दिसली कि दिशा सापडते म्हणून हे आत्मकथन 'चकवाचांदण'. किती सुंदर कल्पना.

रोजच्या जगण्यातही प्रत्येक रात्र चांदणी कुठे असते? कधी कधी अंधारून येतेच. मग सापडावे चकव्यात, पडावी रानभूल पण त्यात शिरण्याआधीच मनाला खात्री असावी न्हवे त्याला पटवूनच द्यावे; यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहेच. शुक्राची चांदणी उगवणाराच आहे आणि रानभूल संपणारच आहे. मगच त्या चकव्यात शिरायला, तो भेदायला मजा आहे आणि मगच 'जिंदगी गुलज़ार हैI

मन गरगरते आवर्त

मन रानभूल, मन चकवा

मन काळोखाची गुंफा,

मन तेजाचे राऊळ

- सुधीर मोघे.

-श्रुतकिर्ती

-०५/०३/२०२१

Comments

  1. ह्म्म!! तो चकवा असतो तर!
    विचारांचा तो चकवा तर खूप परिचयाचा आहे. सर्वांना ती शुक्राची चांदणी सतत दृष्टीपथात राहो हीच प्रार्थना __/\__

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरयं, ही चांदणी सतत दिसावी हाच प्रयत्न असावा.

      Delete
  2. ह्म्म!! तो चकवा असतो तर!
    विचारांचा तो चकवा तर खूप परिचयाचा आहे. सर्वांना ती शुक्राची चांदणी सतत दृष्टीपथात राहो हीच प्रार्थना __/\__
    CK

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान