कृतज्ञ

 

माझ्याकडे माझ्या बाबांचे एक आवडते पुस्तक आहे. 'ख्वाबिदा' ची सुरवात जे चाळताना झाली तेच. ऋग्वेदातल्या सुंदर ऋचांचा अत्यंत सुंदर इंग्रजीत गेय अर्थ आणि त्याला समर्पक निसर्गातले चित्र. कॉम्बिनेशन खूप गुंगवून टाकते.

आज त्यातली एक ऋचा वाचली, विचार कसेही भटकतात याबद्दलची. कोणाला कधी काय वाटेल आणि कोण कधी कसे वागेल. थोडीशी गंमतशीर होती. पण शेवट मात्र एकदम गंभीर...

For the sake of spirit , O mind, Let go of all these wondering thoughts!

विचार केला तर ख्वाबिदा म्हणजे Wandering thoughtsच मग तेच सोडून दिले तर अस्तित्वच उरणार नाही. कधीतरी नक्कीच पण आज नाही. पण मग आज या विचारांना निदान भटकू द्यायचे नाही. त्यांना कोडी घालून सोडवत बसायची हि नाहीत. मग करायचे तरी काय त्यांनी? तर फक्त असायचे कृतज्ञ !कशासाठी?

आजच्या दिवसासाठी, या पूर्वीच्या जगलेल्या प्रत्येक क्षणासाठी. तो प्रत्येकक्षण जसा होता त्याच्या तशाच असण्यासाठी. आपल्या भोवतीच्या छोट्याशा वर्तुळातल्या प्रत्येक माणसाच्या असण्या आणि नसण्यासाठी. त्यांनी दिलेल्या अनुभवांसाठी. या अनुभवांना, माणसांना बरेवाईट, भलेबुरे म्हणून डागाळू नये याचे ज्ञान करून देणाऱ्या प्रत्येक गुरुसाठी.

मुळातच कृतज्ञता व्यक्त करावी हे भान, हि बुद्धी शाबूत असण्यासाठी. कृतज्ञ असणेम्हणजे उतराई होणे न्हवे, तर ते ओझे आनंदाने जन्मभरासाठी खांद्यावर व्हायची तयारी असणे आणि त्याला ओझे न म्हणणेच. कधीकधी काही उपकार कधी फेडूच नयेत. त्यांच्या ऋणातच राहावे जन्मभर तसेच. कृतज्ञ असणे म्हणजे तरी नक्की काय असणे, हे शब्दांपेक्षा मनाला, डोळ्यातल्या पाण्याला आणि भरून आलेल्या कंठाला पहिल्यांदा जाणवते. मग शब्द रूप घेतात ते न होताच हि भावना अमूर्त राहावी यातच याचे सारे श्रेय आहे. त्या भावना तितक्याच कोमलतरल सच्च्या असतील तर शब्दांची ठिगळे लावा तरी कशाला? त्यांना शब्दबंबाळ करून जंजाळात अडकवा तरी कां? पण कृतज्ञता व्यक्त तर व्हायलाच हवी. ज्याचे श्रेय त्याला द्यायलाच हवे. मग करावे तरी काय? आपण त्या व्यक्तीची, त्या विचारांची जागा घेण्याचा प्रयत्न करावा, कृतज्ञ होत असतानाच कोणाच्या तरी मनात हीच भावना निर्माण होईल असे वागायला शिकायला हवे. देणार्याकडून घेत असतानाच एक दिवस ते तरल मन, ती सारासार विचार करणारी बुद्धी, तो निरपेक्ष विचार घ्यावा आणि गाठोड्यात जपून न  ठेवता मिळेल त्याला वाटून टाकावा;  त्यांच्याकडून आणखी कोणाला तरी मिळण्यासाठी. हे चक्र अव्याहतपणे चालू ठेवण्यासाठी एक साखळी नक्की बनावे. एवढे जरी करता आले तर मग त्याच मनाच्या कोपऱ्यात दडलेले विचार इकडे तिकडे भटकले काय पण अक्खी पृथ्वी प्रदक्षिणा करून आले तरी योग्य त्या रस्त्यावरच चालतील न्हवे कित्येक हात त्यांना कायम योग्य रस्त्यावरच ठेवतील याची खात्री राहिल.



 

प्रथमवयसि दत्तं तोयमल्पं स्मरन्तः

शिरसि निहितभारा नारिकेला नराणाम् ।

सलिलममृतकल्पं दद्युराजीवनान्तं

न हि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति ।।

 

Remembering the small amount of water which it was given in its early age, the coconut trees carry nectar like water on their head throughout their life. [In the same manner] good and noble people do not forget a favour done to them.

 

-श्रुतकिर्ती

१२/०३/२०२१

Comments

  1. खरंच श्रुती, कृतज्ञता हा एक मानवी गुण / human virtue असावा.
    तुझा लेख वाचून मला माझ्या वडिलांचे शब्द आठवले, "समाधानी वृत्ती ही cultivate करावी लागते". I think these two go hand in hand.
    As always, a nourishing writing! Loved it 😊 ♥ ~ CK

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान