पूर्णब्रह्म

 

फूड शोज बघणे हा माझा आवडता विरंगुळा आहे. ते नुसत्या रेसिपी सांगणारे, एक चमचा हे, एक चमचा ते वाले नाही तर इतरही बरेच काही न सांगताच सांगणारे.

संजीव कपूरचा झी टीव्ही वरचा 'खाना खजाना' जेव्हा सुरु झाला तेव्हा त्याचे रिपीट टेलिकास्ट सुद्धा मनलावून मीच नाहीतर अनेकांनी बघितलेत. अतिशय गोड शुद्ध हिंदी बोलणाऱ्या संजीव कपूरच्या रेसिपीपेक्षा कितीतरी नवे इंग्रेडिएंट्सत्यांची हिंदी इंग्रजी नावे, वापरली जाणारी क्रोकरी, कटलरी कायम लक्षात राहिली. मग Karen Anand यांनी पुण्यात एक 'गुड फूड मॅगझीन' काढलेले, मी आणि ताईने त्याचे दोन वर्षाचे subscription घेतलेले. खजिनाच मिळाला त्यात, कधी न पाहिलेले, ऐकलेले पदार्थ, असंख्य प्रकारचे चीज, ब्रेड, exotic फळे आणि भाज्या,फोर्क स्पून नाईफ वापरण्याच्या तर्हा; अनोखे जग होते ते. Remember it was १९९६! तेव्हा हे सगळॆ नवीन, नवखेच होते. मग मिळतच गेले असे बरेच बघायला,वाचायला.

शांघायच्या खाद्यसंस्कृतीतल्या वैविध्याने तर सर्वार्थाने डोळे उघडले. जिवंत प्राणी, पक्षी, भाज्या,फळे शेजारी शेजारी बघून बघून हे कोणाचे तरी अन्न आहे त्याला नाके मुरडू नयेत हे फार पटकन शिकता आले. आपण खाणार नसलो तरी अगदी छोटया छोट्या फूडस्टॉलवरची पदार्थातली रंगसंगती, कलाकुसर आणि त्यासाठी घेतली जाणारी अपार मेहनत आणि त्याने भरणारी लोकांची पोटे त्या अन्नाला नावे ठेवू देतच न्हवती.

 SBS  Foods तर मेजवानीच असते. असंख्य documentaries अन्नाचीच न्हवे तर संस्कृतीची खूप चांगली ओळख करून देत गेल्या. हळूहळू जेमि ऑलिव्हर, नायजेला, कायली काँग घरचेच होऊन गेले. Adelaide ला गेल्यावर Barossa Valley ला जाऊन Maggie's Farm ला भेट द्यायची हे ट्रिप प्लॅन होतानाच पक्के ठरले आणि सुदैवाने स्वतः Maggie Beer किचनमध्ये दिसल्यावर त्यांच्या नॉर्मल "How  are you?" चे उत्तर देखील पटकन सुचले न्हवते.

या सगळ्यातही भारतावरच्या कार्यक्रमात street food आणि बऱ्याचदा गचाळ ठिकाणे दाखविली गेली कि थोडासा राग येतोच. Rick Stein या ब्रिटिश पत्रकाराच्या फूड वोयाज बघण्यासारख्या असतात. राहणीमान, लोकांच्या सवयी, देशाची परिस्थिती यावर नकळत बरेच भाष्य असते. त्यांच्या Rick Stein's India च्या एका भागात हैद्राबादीमुघलाई पदार्थ complex आहेत म्हटल्यावर शेफने 'आमची पॅलेट्स, आमच्या संस्कृतीसारखीच इव्हॉल्व्हड, डेव्हलप्ड आहेत' हे सांगताच "Why do you need so many spices for everyday cooking?" या प्रश्नाचे उत्तर गवसले होते.

औन्सपौंडग्रॅमवाट्याचमचे अशी असंख्य मापे, विविध उपकरणेअगदी केमिस्टरी लॅबमध्ये घडताहेत असे वाटाव्या आश्या emulsification,  spherification सारख्या प्रोसेस; सध्या लाटण्या पासून ते sous vide ला लागणारी घरगुती ते कमर्शिअल उपकरणे, विरजण लावण्यापासून salting, fermenting पर्यंतच्या साध्या स्किल लागणाऱ्या कृती. काय नाहीय त्या जगात? गोड पदार्थांचे तर जगच वेगळे. फ्रेंच delicacies आणि patisseries ची नावे घेतांना जीभ आढेवेढे घ्यायला लागते.

या सगळ्यात ते करणाऱ्या, प्रेमाने खाऊ घालणाऱ्यांचे चेहरे आणि त्यावर असणारे समाधान शेवटी कायम मनात रेंगाळत राहते. हे सगळे कार्यक्रम पाहणे, वाचणे, फूड ब्लॉग्स follow करणे याचा निदान एकतरी फायदा नक्कीच आहे, एखाद्या कुडकुडणाऱ्या थंडीच्या दिवशी पटकन आमटीभात करते च्या बरोबरीने थांब पमकिन सूप करते हे तोंडात यायला लागलेय. तरीही नवाजुना कोणताही पदार्थ करताना अन्नपूर्णेच्या कृपेने आज पोट आणि मन दोन्ही तृप्त आहे याची कृतज्ञता विसरणे अशक्यच.


                                                                    जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म 

                                                                      उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्मI 

                                                                                                                                            - श्रुतकिर्ती

                                                                        १९/०३/२०२१ 

                                                                           

Comments

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान