व्यंगचित्रे

 

पाच मे ला National Cartoonist Day झाला. असे काही असते हे माहीतच न्हवते मुळी

पण त्या दिवशी चिंटू त्याच्या मित्रांची स्केचेस काढतोय असे चित्र बघायला मिळाले आणि खूप काही आठवले. कार्टून बघायला, त्याचा आनंद घ्यायला लहान असायची गरज नसते हे सगळ्यात भारी. म्हणून तर कार्टून नेटवर्क, ABC किड्स ,पोगो असले बघून फार फार मज्जा येते. आजही शॉन द शीप बघताना हसू येतेच आणि टॉम अँड जेरी बघून सगळा कंटाळा जातो. किती तरी, नावे घ्यायला लागले तर वर्ड लिमिट क्रॉस होईल एवढे शो मला मनापासून आवडतात. पण हि झाली टीव्ही वर बघायची. सगळ्यात जवळची वाटतात ती व्यंगचित्रे पेपरातली आणि मासिकातली.

रोज महाराष्ट्र टाइम्स हातात पडला कि R. K. Laxman यांचे 'कसं बोललात' वाचायला मिळे. राजकारण,समाजकारण याची ओळख त्यातूनच तर झाली. ब्रश स्ट्रोक्स मध्ये किती अफाट ताकद असते ते त्यांच्या caricatures वरूनच कळले. त्या व्यंगचित्रात कोणता नेता आहे ते शोधून बाबांना सांगायचे हा आवडता उद्योग होता त्या काळातला. इंदिरा गांधींचे केस आणि साडी, गांधीजींचा चष्मा, जयललितांच्या साडीची केप आणि या सगळ्यावर वरताण प्रत्येक ठिकाणी असणारा कॉमन मॅन. नुसती रुद्राक्षाची माळ असलेला हात दाखवला कि हे बाळासाहेब ठाकरे आहेत हे वाचणाऱ्याला कळेल ह्याची खात्री त्या समर्थपणे काढलेल्या स्केचेस मध्ये असे. त्यातले विषय शब्द काळानुसार संदर्भातून गेले. पण चित्रे मनात कोरून बसली.

Illustrated Weekly चे हिंदी भाषांतर धर्मयुग; त्यात यायचे कार्टून कोना ढब्बूजी. आता या नावाव्यतिरिक्त त्यातले काहीही आठवत नाही पण चौथी पाचवीत असताना ते वाचायला फार गंमत वाटे.

एखाद्या देशात किती Freedom Of Expression आहे ते वर्तमानपत्रातल्या व्यंगचित्रावरून कळते असे म्हणतात. असंख्य महत्वाचे विषय आणि त्यावरची राजकीय, सामाजिक मते त्या काही रेघांमध्ये आणि मोजक्या शब्दात मांडणे हे कौशल्याचं आहे.

राजकीय नसलेली पण कार्टून्सच्या वळणावर जाणारी मारिओ मिरांडांची चित्रे किती मजेशीर असतात. त्यातली मांजर, एक श्रीमंत पण जाड बाई, टेल कोट वाला बटलर संदर्भ बदलला तरी प्रत्येक पैंटिंग मध्ये असत.

Peanuts, जिग्स अँड मॅगी, गारफिल्ड, डेनिस द मिनेस ह्या सगळ्या टाइम्स ऑफ इंडिया आणि इंडियन एक्सप्रेसच्या रविवारच्या पुरवणीत येणाऱ्या कॉमिक स्ट्रीप्सनी नुसते मनोरंजनच केले नाही तर भाषा सुधरविली. इंग्रजीतले छोटे छोटे बारकावे न कळत कधी कळले ते आजही कळत नाही.

डेनिस मधली मार्गारेट आणि मि. वूडहाउस नक्की इंग्लंड अमेरिकेत कुठेतरी राहतात असे वाटायचे इतके ते खरे होते.

मराठीतला चिंटू नुसता माझाच नाहीतर माझ्या मुलीचाही लहानपणीचा सोबती झाला. चिंटूचा सगळा संग्रह आजही वाचून आम्ही दोघी तेवढ्याच हसतो. बगळ्या, मिनी शेजारच्याच घरात आहेत असे रोज वाटते.

या सगळ्यांनी वाचतांनाची फक्त दोन मिनिटे मजेशीर केली असे नाहीतर मेंदूच्या कोणत्या तरी कोपऱ्यात बरेच काही साठवून ठेवले कधी तरी आठवण्यासाठी. आठवून हसू येण्यासाठी.

पण या सगळ्यात निंदा, नालस्ती, स्वार्थासाठी किंवा पातळी सोडलेली टिंगल टवाळी न्हवती म्हणून हे काळाच्या कसोटीवर उतरले बाकीचे वाहून गेले.

समर्थ रामदासांनी 'टवाळा आवडे विनोद' म्हटले आहे पण ते काही विनोद आवडणारे सगळे टवाळ असतात या संदर्भात न्हवे. त्यामुळे तूर्तास तरी कार्टून्स बघूया, मनापासून हसुया आणि आला दिवस आनंदात घालवूया!



- श्रुतकिर्ती

०७/०५/२०२१

Comments

  1. व्यंगचित्र!! कित्ती मज्जा यायची ते बघताना आणि त्यातला hidden message grasp करायचा प्रयत्न करताना. I remember R K L, his style of illustration was exceptionally precise and intelligent at all times..... Should try sketching at some point soon. ~ CK

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान