त्याला तयारी पाहिजे!

 

सध्या रोजच्या बातम्या पहिल्या,ऐकल्या, वाचल्या कि कुठेतरी संकट, अडचणी आजूबाजूला वावरताहेत याची जाणीव होते. मग ते वादळ असो, बुशफायर असो, किंवा  गेल्या वर्ष दीडवर्षातला जीवघेणा अनुभव असो.

पण संकटाशिवाय  जगण्याला मजा ती काय? एकदम self-help पुस्तकातला किंवा motivational quotes मधला dialogue वाटतो ना वाचायला. पण येणारच आहेत हि छोटीमोठी वादळे हे माहित असतेच कि रोज सकाळ झाल्यावर. नव्याने दिवसाची सुरवात केल्यावर, फरक एवढाच कधी वाघोबा म्हणावे लागते तर कधी वाघ्या. मग विचार करताना मनात आले; आपल्या प्रत्येकाचा संकटाला फार काय छोट्यामोठ्या अडचणीला तोंड देण्याचा, react होण्याचा algorithm वेगवेगळा असतो. पद्धत वेगळी असते. कधी रणछोडदास बनणे पसंत करतो तर कधी आ बैल मुझे मार! तर कधी calculated risk. अडचण वेगळी, परिस्थिती वेगळी, माणूस वेगळा, प्रतिक्रिया वेगळी.

'आई' 'बाबा' असे मोठे भोकाड पसरण्यात दादा, ताई, मित्रमैत्रिणी अशी भर पडत पडत एक दिवस आपण एकटेच या सगळ्याला सामोरे जायला तयार होतो, आणि मग नंतर कुणाच्या तरी अशाच हाकेला ओ देण्याचा प्रवास सुरु होतो.

आस्तिकांना श्रद्धा, विश्वास, तर आज्ञेयवाद्यांची तर्कबुद्धी त्यांना त्या त्या वेळी तरून जायला मदत करतेच. कधी विचारांच्या, कधी माणसांच्या तर कधी मनाच्या ठाम निश्चयाच्या आधारे प्रसंग पार पडतो. बऱ्याचदा येणार येणार माहित असणारे संकट दिसतच नाही. घडेल तेव्हा बघू असा विचार येतोच कि मनात पण अनुभवानंतर आणि थोड्याफार टक्क्याटोणप्यांनंतर be prepared वाली सवय लागतेच. एकदा अडचण मान्य केली कि दोन पर्याय पुढे येतात, flee or fight. हे ठरवणे फार अवघड जाते. प्रत्यक्ष श्रीकृष्ण पाठीशी असतानाही अर्जुनाला गीतेचे अठरा अध्याय लागले लढायचा निर्णय पक्का करायला, मनाची द्विधा बाजूला सारायला मग तुमची माझी काय कथा?या निर्णयात बर्याचवेळी जिंकूनही काय फायदा किंवा हरुनही फारसे नुकसान नाही हे फॅक्टर महत्वाचे ठरतात. कधी कधी पळून जाऊन, न तोंड देऊन जर शांतता मिळणार असेल तर लढून दारुगोळा कशाला वाया घालवा. पण काही वेळा प्रश्न अस्मितेचा, तत्वाचा, स्वाभिमानाचा असतो. शेवट भलेही मनासारखा होणार नसला तरी लढणे गरजेचे असते मग कुमक जमावावीच लागते. धारातीर्थी पडण्याआधी तलवार सगळ्यादिशांनी जोरदार फिरवायचीच असते. ते समाधान वेगळेच असते. कधी कधी धोरणी पणाने वागावे लागते. हरतांनाही कमीत कमी नुकसान होईल असेच लढावे लागते. काही लढाया न थकता अखंड लढाव्या लागतात. रोज नव्याने उत्साह आणावा लागतो तर काही मन घट्ट करून संपवाव्या लागतात, लढण्याचा उत्साह थोपवून. काही सेनापतीच्या अधिपत्याखाली लढायच्या तर काही सेनापती बनून.

वादळांना तोंड देणे हे आपल्या हिमतीवर, मिळणाऱ्या पाठिंब्यावर, उपलब्ध resources वर जसे अवलंबून असते तसेच किंबहुना त्यापेक्षा जास्त अवलंबून असते मानसिक जडणघडणीवर, मनाच्या उभारीवर, स्वतःवर असणाऱ्या ठाम विश्वासावर. हे असले कि पाठीवर हात ठेवणारा, हातात हात धरणारा, योग्य वेळी योग्य ते शस्त्र पुरविणारा मिळतोच. अडचण, संकट आले त्यापेक्षाही जास्त गतीने पळून जाते मग.

मनात आले,एकदा खरंच मागे वळून पाहावे आपल्यात फरक पडला का अडचणींना, संकटाना तोंड देताना वयाबरोबर, अनुभवाबरोबर?

बदलला का आपला algorithm प्रत्येक प्रसंगानंतर? जमले का त्या संकटाला सामोरे जाताना मनाचा तळ न ढवळता, गढूळपणा न येता फार उलथापालथ न होऊ देता त्याच्याकडे पहात ये परत मी आहेच तयार असे म्हणायला?

स्थितप्रज्ञाची लक्षणे अंगी बाणायला जरी भरपूर वेळ असला तरी, जमले का मनाचा damage control करायला? त्या क्षणी जे योग्य वाटतेय ते करून त्यातून मोकळे व्हायला? पुनःपुनः निर्णयाला revisit न करायला? त्या क्षणात न अडकता त्रयस्थ बनून परिस्थितीकडे बघायला?

यातल्या एका जरी प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देता आले तर रूढार्थाने जिंकलो किंवा हरलो फरक काय पडतोय!

 

 

 


 

पाण्यामध्ये पडलास ना?

पाणी कसेही असो

आता टळेना पोहणे

त्याला तयारी पाहिजे.

  - विंदा करंदीकर

 

- श्रुतकिर्ती

- २८/०५/२०२१

 

Comments

  1. श्रुतकीर्ति, छान आढावा घेतलास. त्याबद्दल अभिनंदन. मनाचा damage control करणे जमले पाहिजे नाही! सातत्याने! मग तो साधासुधा upset असो वा major damage!!!
    असं कुठेतरी ऐकले आहे की, "Honour lies in Quickness and Speed of the recovery". तुझा लेख वाचून हे आठवले.
    Lots of love ~ CK

    ReplyDelete
    Replies
    1. Damage होणे हातात नसते बरेचदा पण control तरी जमायला पाहीजेत😊 agree with quickness of recovery too.💞

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान