Expecting the Unexpected!

 शुक्रवार संध्याकाळ, खूप थंडी पडलीय आणि नेटफ्लिक्सवर सस्पेन्स मूवी चालू होता. सुरवात तर एकदम भारी झाली, काय चालूय याचा थांगपत्ता लागत न्हवता. आमच्या तिघांचेही तर्क कुतर्क चालू होते. मधेच काहीतरी घडले आणि सगळे कोडे उलगडल्यासारखे वाटले. पुढची दहा मिनिटे step by step मिस्टरी सोडवण्यात गेली आणि मग... 

 मग काय सिनेमा बघण्यातला रसच गेला. एकेकाने काढता पाय घेतला. जोवर शेवट कळात न्हवता तोवरच मज्जा होती. बऱ्याच गोष्टींचे असे होते नाही कां? एकतर्फी मॅच कधी बघावीच वाटत नाही. भले आपण जिंकणार्याच्या बाजूचे असलो तरी. अटीतटीने, शेवटच्या क्षणापर्यंत हारजितीचे पारडे वरखाली करणारी मॅचच लक्षात राहते. निवडणूकांचे निकालही exit poll प्रमाणेच आले तर चर्चेतही येत नाहीत. न्युज न टिकता ब्रेकिंग न्यूज मोठी होण्याचे कारणही हेच असावे बहुतेक. कहानी में ट्विस्ट नसेल तर काय मजा असेच झालेय. वॅनिला, स्ट्रॉबेरी आईस्क्रिमचे नाव काढताच जिभेवर चव जाणवते आणि मग तोचतोचपणा घालवायला चिली आईस्क्रिम, पुरणपोळी आईस्क्रिम हे असे मेंदूला आणि जिभेला गोंधळात टाकणारे फ्लेवर ट्राय केले जातात. 

थोडक्यात काय अपेक्षित न घडल्याचा आनंद जास्त आनंददायक असतो. सरप्राईझ गिफ्ट, उगाचच झालेले कौतुक, अचानक आलेले आवडते पाहुणे, पटकन मिळालेला इन्कम टॅक्स रिफंड, टम्म फुगलेली भाकरी, हि यादी न संपणारी आहे. या गोष्टींची इच्छा तर असते पण त्या घडतील याची खात्री नसते. म्हणूनच आनंद थोडा कणभर जास्तच वाढतो. सगळेच ठरवल्याप्रमाणे प्रोग्रॅम्ड घडले तर त्यात नावीन्य काय? पुढे काय घडणार याची उत्सुकता काय? माणसाला कायम नव्याचा शोध असतो, अज्ञाताची आस असते म्हणून तर तो कोलंबस पृथ्वी प्रदक्षिणेला निघतो. सदैव प्रयत्न असतो काहीतरी एक्सपेक्टशनच्या पलीकडचे करण्याचा . 

अनेक गोष्टी मात्र ठरवल्याप्रमाणेच असव्याश्या वाटतात. त्यात अनपेक्षित काही घडण्याचा विचारही आपल्याला करवत नाही आणि त्या तश्या घडू नयेत म्हणून प्रयत्नही जीवापाड करतो आपण. कुटुंब,करिअर,तब्येती फार काय ट्रॅफिक आणि हवामान यांच्या बद्दलच्या अपेक्षा चुकव्यात असे चुकूनही वाटत नाही. 

चाकोरीत घडणाऱ्या घटनांचे क्रम बदलायची तयारी, इच्छा काहीच नसते, कधी कधी ते क्रम बदलण्याचे धाडसही नसते.  

मेंदूने जणू कप्पेच केलेत, त्याला पक्के माहित आहे कधी शेवट आपल्याला माहित असलेलाच हवाय आणि कधी तो माहित नसावा असे वाटतेय. पण मन मात्र वेगळे असते सगळे माहित असूनही दिवास्वप्ने पहाते. रस्ता पाठ असतानाही हळूच चुकवते. माहित असणारा शेवटही बदलून बघूया असा विचार करते. मनापासून expect करत राहते unexpected घडण्याची! या मनाच्या करामतीवर विश्वास टाकायचा आणि निर्धास्त राहायचे, मग हमखास मज्जा येते रोजच्या जगण्याची while expecting the unexpected!



- श्रुतकीर्ती 

-२१/०५/२०२१


Comments

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान