मैत्रीण

 

खुप दिवसांनी आम्हा चार पाच मैत्रिणींचे भेटायचे ठरले. तुला जमेल का, मला जमेल का करत एकदाचे ठरले. भेटून महिना दीड महिनाच जेमतेम झालेला पण सगळ्यांना भेटून गप्पा मारायच्या होत्या. त्या तर तशाही फोनवर मारतच होतो की, zoom वर एकमेकींना पाहतही होतोच. मग काय होते भेटायचे एवढे? ठरले आणि सगळ्या तयारीला लागल्या. आमच्यातली एक लोणचे queen आहे. तिने तिच्या नव्या लोणच्याच्या बरण्या भरल्या. एकीची चटणी फेमस आहे तिला ऑर्डरी गेल्या. कुणी कुणाला कुठल्या झाडाच्या बिया फांद्या द्यायच्या त्याचे मेसेज झाले. जेवायला काय यावर एकमोट्ठे चर्चासत्र घडले आणि फायनली सगळ्या भेटल्या. गप्पागोष्टी, हसणेखिदळणे, खाणेपिणे सगळ्यानंतर निघताना खाऊचे डबे भरले गेले. वस्तू दिल्याघेतल्या आणि जाताना नेलेल्या पिशव्या रिकाम्या न होता अजूनच फुगून घरी परतल्या.

काय मिळाले आम्हाला त्या चटण्या लोणच्याच्या बरण्यातून? सगळ्या तर घरी रोज तेच करत होतो. त्या बिया Bunnings मध्ये मिळत होत्याच की. मग का धडपडलो त्या साठी? जेवायचे ठरवतानाही मी हे करून आणू का? पेक्षाही हे आणशील का तुझ्या हातचे या वर भर होता. घरातले सगळे करून, कामाच्या वेळा सांभाळून कधी सगळे बाजूला ठेवून मोठाला drive करून तर कधी दोन दोन train बदलून भेटण्यासारखे काय होते यात? तशा तर रोजच होतो कि संपर्कात.

याचे उत्तर शोधायला गेले कि अगदी कट टू सीन टू! येते मनात. पुण्याला जायचे ठरवले कि मैत्रिणींना कळवले जाते, मग सुरु होतात भेटायचे प्लॅन्स. सगळ्या वेगवेगळ्या गावात. पण येतात प्रवास करून. कुणातरी एकीकडे सामान टाकले कि हळूच बॅगेतून खाऊवाटप सुरु होतो. छोटीशी गिफ्ट, छोटीशी वस्तू, थोडासा खाऊ. असुदे ग म्हणत म्हणत बरेच काही एकमेकींच्या बॅगेत भरतात. आठवणींनी मन आणि खाऊने पिशवी जाड करून टाकतात.

आई, बहिणी, नणंदा, जावा, आत्या, मावश्या अश्या सगळ्याजणींकडे जाताना आणि येतांना अशाच असंख्य आठवणी आपण नेत असतो आणि आणतही असतो. सगळ्यांकडे सगळेकाही असतानाही खुपसा आनंद मिळतो त्या छोट्याश्या बरणीतून, त्या छोट्याश्या पुडीतून. तुला बरे लक्षात मला हे आवडते यातून होणार आनंद,समाधान काहीही झाले तरी विकत घेता येणार तर नाहीच पण व्हाट्सअँप च्या मेसेज मधुनंही पाठवता येणार नाहीच. त्यासाठी समोरासमोर आलंच पाहिजे. तेवढा शरीराने आणि मनाने प्रवासही केलाच पाहिजे.

तसे तर त्यासाठी तेवढी मैत्रीही केली पाहिजे, केल्यावर ती जपलीही पाहिजे. मैत्रिणीच्या आवडीनिवडी आधी मुद्दाम तर नंतर आपणहून लक्षात राहतील याकडे लक्ष पुरवले पाहिजेच पण हे मुळीच आवडत नाही,पटत नाही हे हि जाणवले पाहिजेच. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद मिळवता आणि वाटता आला पाहिजे. तसेच अडचणीत, दुःखात सहभागी होण्याबरोबरच सहभागी करूनही घेता आले पाहिजे.

Physical अंतर तर पडत जाणारच पण मनातले वाढले नाहीतर Physical वर मात करायला बरेच पर्याय आहेतच की. फक्त मनातले वाढूनये याचे प्रयत्न सदैव करत राहिलेच पाहिजे. हे सगळे मनात आले आणि मग जाणवले, हे सगळे करायला मुळात मैत्रिणी असायला तर हव्यात. दरवेळी काही त्या लहानपणापासून असतीलच असे नाही. कधीही कोणत्याही वळणावर भेटतीलच, सापडतीलच फक्त आपल्यालाही मैत्रीण होता आले पाहिजेच की!

                    


 

- श्रुतकिर्ती

 

६/४/२०२१

Comments

  1. अर्रे वाह!! खूप सुरेख मांडले आहेस. Universality of Sisterhood. मातृभूमी पासून, नातेवाईकांपासून एवढ्या दूर आहोत, की मैत्रिणींची सोबत हेच माहेरपण वाटायला लागते. ❤️😍 ~ CK

    ReplyDelete
    Replies
    1. Sisterhood without expectations 💞 best relation.

      Delete
  2. खूप छान .. मोकळीक , हक्क आणि नाविन्याचे ऋणानुबंध अलगद उलघडणार नातं ...

    ReplyDelete
  3. खुप सुंदर 👍👌
    चला मग ह्यावर्षीच लोणची देवाणघेवाण राहिलीय की श्रुती ..कधी भेटूया ??😁😘

    ReplyDelete
    Replies
    1. तुझ्या लोणच्यासाठी कधीही कुठेही यायला तयार आहेच मी.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान