वेल

 

हवेत गारवा जाणवायला लागलाय आणि बागेत पानांचा कचरा साठायला लागलाय. मग ती पाने गोळा करणे, फांद्या कापणे, कुठेतरी उकराउकरी करणे, खतपाणी घालणे अशी पन्नास कामे वीकेंडला आवासून समोर उभी राहतात. झाडांना पाणी घालायला गेले आणि एका छोट्याश्या वेलाला धुमारे फुटलेले दिसले. मनात आले आता ह्याला टेकू द्यावा लागणार, दोरी बांधून खांबावर, भिंतीवर चढवावा लागणार. थोडक्यात त्याला आधार द्यावा लागणार तरच तो वाढणार, फुलणार. त्याचे खोड नाजूक, म्हणून वाढ होण्यासाठी ते कोणाची तरी मदत घेणार. आणि तो खांब, ती दोरी त्याला आधार देता देता आपल्याच दिशेला घेऊन जाणार आपल्याला पाहिजे तिकडे वळवणार.

वेलाला वाटतेय मला मोठे व्हायचेय, वर चढायचेय म्हणून मी आधार घेतला, दोरीला वाटतेय मला या वेलीला जिथे न्यायचेय तिथे नेण्यासाठी मी हात धरला. नक्की घडले काय?

वेलीला आधार मिळतो, वेल वाढते, दोरी,काठीच्या आधाराने मोठी होत जाते. होता होता एक दिवस आधाराची गरजच लागणार नाही इतकी बळकट होते. पण ती आधाराला सोडत नाहीच तर बाजूलाच फुटलेल्या नव्या अंकुराचा, दोरीच्या,काठीच्या मदतीने स्वतःच नवा आधार बनत जाते. त्यांना आपल्या दिशेने नेत जाते.

आपल्यावरही हा प्रसंग येतोच. आधाराशिवाय पुढे जाणे शक्य नसते, एकट्याच्या सामर्थ्यावर प्रवास पूर्ण होण्यासारखा नसतो. पण 'Ask for the help when needed' हे माहित असूनही 'मदत' हा शब्द उच्चारताना जीभ अडखळते कां? आज आपण आधार घेतला तरच उद्या आधार बनू शकू हे जणू विसरूनच जातो आपण.

काय आडवे येते हे करण्यात? बुद्धी, विचार, अहंकार, स्वाभिमान,स्वतःबद्दलचा कधी कधी फाजील वाटावा असा आत्मविश्वास आणि कधी आधार मिळेलच याची नसणारी खात्री. त्या काठीने,दोरीने देखील शेवटपर्यंत अगदी गरज संपली तरी साथ दिलेली असते. माणसाच्या बाबतीत हे घडलंच याची शाश्वतीही नसते. पण म्हणून संधी शोधायचीच नाही हे करणेही चुकीचेच कि.

वेलाचे काय झाले असते दोरी, काठी नसती तर? अगदी मेळा नसता पण खुरटला असता. फुले फळे आली नसती असे नाही पण बहरला नसता. वेलाने मदत मागितली पण दोरीला, काठीलाही काम मिळाले. दोघांचाही काहीतरी फायदाच झाला.

हे घडले कशामुळे? वेलाला गरज लागली, माळ्याला जाणवली आणि काठीने/दोरीने ती पूर्ण केली. रिझल्ट म्हणून एक सुदृढ फळेफुले देणार वेल  तयार झाला. वेलाच्या आयुष्यातले नमूद केलेलं काम नुसतेच पूर्ण नाहीतर यशस्वी रित्या पूर्ण झाले. एक जरी साखळी नसती तर हो सगळी प्रोसेसच अपूर्ण राहिली असती. सगळ्यचीच स्वप्ने,इच्छा आकांशा अर्धवट राहिल्या असत्या. कधीकधी मनात असूनही मदत न मागितल्याने, शक्य असून न केल्याने आणि कधी कधी तर फक्त माळ्यासारखे दोन जणांना एकत्र न आणल्याने आपलीही बरीच स्वप्ने अर्धवट राहतातच कि. मग करायचं काय उठसूट नाहीतरी योग्य वेळी मदत मागण्यात आणि करण्यात गैर काय? मग आपणही स्वतःला या अश्याच साखळीचा भाग मानूया कि, कधी वेळ,कधी माळी तर कधी चक्क दोरी/काठी होवुयाकी!




जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का?

आपण ज्याला आधार मानतो

तो खरोखर आधार असतो का?


गंमत म्हणजे, आपल्या खांद्यावरही 

कुणाची मान विसावू पाहते

अखेर आधार ह्या शब्दाचाच आपण आधार घेत असतो का?

जगण्यासाठी आधाराची इतकी गरज असते का?


सुधीर मोघे ( 'पक्षांचे ठसे')




-श्रुतकिर्ती 

११/०६/२०२१


 

Comments

  1. श्रुती, छान मेळ घातलास सगळ्यांचा. आपण जे काही कर्म करत असतो त्यात १०० टक्के presence of mind असेल, एकरूपता असेल तर ते कर्म "पूर्ण" होत असावे नाही?! It's like living the moment. 🤔 ~ CK

    ReplyDelete
    Replies
    1. Yes it’s like living in the moment, taking help or helping others shouldn’t be that complicated 🙏

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान