जरा उशीरच झाला!

 

काल शुक्रवार,ख्वाबिदा लिहिण्याचा वार.पण लिहून,ब्लॉगवर टाकता टाकता शनिवार उजाडला. कारण काहीही असो जरा उशीरच झाला.मनाशी हे म्हटले आणि दचकायलाच झाले. किती वेळा येते हे वाक्य मनात.तरीही मी दिलेल्या वेळा पाळणारी आहे.’फॅशनेबल लेट‘ जाण्यावरही माझा विश्वास नाही मग तरीही घड्याळाच्या काट्यांच्या उशिरा बरोबरच इतरही बरेच उशीर होतातच की.

आज करू,उद्या करू, म्हणून टाळलेले फोन हे तर अगदी परवलीचे उदाहरण आहे. थोड्यावेळाने मेसेज करू,म्हणता म्हणता खुशाली विचारायची राहूनच जाते आणि कधी कधी खूप उशीर झालेला असतो. दर शनिवारी/ रविवारी आईशी बोलले, की या आठवड्यात दोन-तीनदा बोलू म्हणता म्हणता, शुक्रवार रात्र उजाडते आणि फोन लावला कि, पहिले वाक्य येते, “उशीर झाला मला फोन करायला पण …” अमुक आणि ढमुक. मग येणारा स्वतःचाच राग, निष्काळजीपणाची भावना, एखाद आठवडा वेळेवर फोन करते आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या! माझी एक मैत्रीण तीन-चार दिवस हाय हॅलो नाही झाले की ‘ऑल गुड?’ विचारते. मला दोन दिवसांनी जाणवते; आता ही विचारणार, त्याआधी बोलूया. पण उशीरच होतो आणि तिचाच मेसेज येतो.

कधी कुणाचे तरी काहीतरी खटकलेले असते, योग्य भाषेत योग्य वेळी सांगायलाही हवे असते. पण वेळ निघून जाते आणि मग ते फक्त आपल्या डोक्याला त्रास होईल म्हणून सोडून द्यावे लागते. समोरच्याच्या गावीही नसते इतकी उलथापालथ केली आपल्या वागण्याने कोणाच्या तरी मनात.

 हे एक वेळ चालेल पण श्रेय द्यायच्या वेळी,कौतुकाच्या वेळी मात्र उशीर होऊ नये हे मनापासून वाटते.छान म्हणायला कशाला वेळ लावा? का शब्द शोधा?आता तर असंख्य इमोजी, जीआयएफ आहेत की मदतीला! त्यात तरी मला उशीरच झाला, बिलेटेड वाली वेळ येऊ नये.

पूर्वी म्हणत सोयर-सुतकाला योग्य वेळी जावे. उशीर करू नये. मला मात्र दुःखाच्या वेळी मदत होणार असेल तर मध्ये पडावे नाही तर ज्याला त्याला वेळ द्यावा, पण वेळ पडली तर आपण available आहोत हे माहीत करून द्यावे असे नेहमी वाटते. कदाचित यावर वेगळी मते असतीलही.

मेंदू आणि मन दोघांनाही बऱ्याच गोष्टी करायच्या असतात एक दुसऱ्याला थांबवतो. आणि मग उशीर होतो, वेळ नाहीये दुसरे ही महत्त्वाचे काहीतरी करायचे हे सांगणाऱ्या प्रॅक्टिकल मेंदूने मनाच्या कितीतरी छोट्या-छोट्या आनंदांना उशीर घडवलाय आणि भावनाप्रधान मनाने आता उशीर झाला म्हणून मेंदूच्या भराऱ्या थांबवल्यात .शेवटच्या क्षणी राहून गेल्याचे शल्य जपण्यापेक्षा, उशीर झालेला बरा .उशीर झाला जरा म्हणण्यापेक्षा, वेळ राहता मन आणि मेंदू दोघांचेही ऐकलेले सर्वोत्तम. फोन करायला मेसेज करायला उशीर झाला तर निदान सॉरी तरी साथ देते पण झाडांना खत पाणी घालायला, घरच्या मनी भुभुला जेवायला द्यायला, घराबाहेर पडायच्या आधी आनंदाने निरोप द्यायला -घ्यायला,दिवसाच्या शेवटला ;जी अज्ञात शक्ती उद्या सकाळ घडवणार आहे तिचे आभार मानायला उशीर झाला तर …

तर तक्रार कोणीच करणार नाही पण परिणाम मात्र लगेच जाणवतील कधी मनाला कधी मेंदूला!

 


 

 

  मोहरलेल्या बनात

माझ्याच व्यापात बुडालो मी

      ..... कितीक दूर गेले

मनात असूनही पूल बांधायचे

      तसेच राहून गेले

कर्तृत्वाने कुणी जीवन

      उत्सवासारखे केले

एकादे पत्र, एकादे फूल

      द्यायचे राहून गेले

 

      दत्ता हलसगीकर

 

 

-श्रुतकिर्ती

-१९/०६/२०२१

Comments

  1. म्हणुनच मी लग्गेच अभिप्राय देते 😁😇❤️ ~ CK

    ReplyDelete
    Replies
    1. आणि मला उशीर होतो😁😁

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान