Selective Memory.

 

घरातून निघताना केलेली ग्रोसरी लिस्ट चुकून घरीच राहीली, पण परत आल्यावर पाहिले तर प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आणली गेली होती. पटकन स्वतःच्या बुद्धीला,स्मरणशक्तीला शाबासकी दिली आणि पाच मिनिटात भ्रमाचा भोपळा फुटला. कशाचा तरी दोन दिवसांपूर्वीच बदललेला पासवर्ड जाम आठवत नव्हता दोन्हीही मीच होते, दिवसही तोच होता, मेंदू ही तोच; पण लक्षात काही राहिलं.काही नाही.अशा कितीतरी गोष्टी नकळत पक्क्या लक्षात राहतात पण कितीतरी लक्षात ठेवूया ठेवूया म्हणूनही विसरल्या जातात.

कॉलेजमध्ये असताना, टीव्ही पुढे बसून जर्नल्स लिहिणे हा माझा आवडता उद्योग होता. झी सिनेमा वर बच्चन चे सिनेमे आणि असंख्य गाणी लागायची. फिजिक्स, स्टॅटिस्टिक्स जर्नल मध्ये काय लिहिले ते आज मुळीच आठवत नाही पण आजही ती नाईन्टीज मधली गाणी, काही तर टुकार म्हणावी अशीच असलेली शब्दनशब्द डोक्यात बसलीत. एक डायलॉग ऐकला की, पुढचा आठवावा इतके ते सिनेमे देखील लक्षात राहिलेत.

काहीवेळा एखादी घटना, प्रसंग, पार डिटेल मध्ये आठवतो. त्यावेळी आजूबाजूला असणारी माणसे, त्यांचे कपडे, घरदार सगळ्या सकट!  पण कधीकधी त्याच लोकांना समोर बघूनही त्यांची साधी नावे सुद्धा आठवत नाहीत. बहुतेक आपल्याला आवडते ते लक्षात राहत असावे. रस्त्यांचे ही असेच काहीसे. कितीतरी जण रस्त्यांची नावे एक्झिट चे नंबर सगळे अगदी डोक्यात जीपीएस असल्यासारखे सांगतात. मला त्या रस्त्यावर गेल्यावर ठिकाण सापडते, पण खुणा मात्र त्याच्यासमोर कुठे झाडच होते कुठे त्या घराचा रंगच वेगळा होता, तिथे आमके ढमके दुकान होते असल्या असतात. दणादण क्लिष्ट वाटणारी औषधांची नावे सांगणार्यांबद्दलही असाच आदर वाटत राहतो. मी याबाबत आजही रंग आकार इतक्या बेसिक क्लासिफिकेशन वरच आहे. फोन नंबर लक्षात ठेवणे आता कालबाह्य झाले आहे पण मला खात्री आहे बहुतेकांना,  दूरसंचार निगम वाला लँडलाईन नंबर, एसटीडी कोड सगळे लक्षात असेल.

 पासवर्ड लक्षात ठेवणे हा एक मोठा उपक्रम असतो आणि हमखास  तो विसरायला होतो. चौथीत शिकलेला चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला झोपेतून उठल्यावर ही आठवतो पण फेसबुकचा पासवर्ड घरात चार जणांना सांगून ठेवावा लागतो.

शंभर वेळा स्वतःला बजावूनही विस्मरण झाले की स्वतःचाच राग येतो. पण काही गोष्टी विसरल्या याचा आनंदही खूप असतो त्यात काय एवढे लक्षात ठेवायचे विसरून जा. असे जेव्हा सगळे सांगतात तेव्हा मेंदू मन लावून ते लक्षात ठेवतो, वारंवार हे माझ्या लक्षात आहे याची आठवणही करून देतो. विसरण्याचे वरदान नसते तर डोक्याचे डम्पिंग बिन झाले असते. वाटेल ते साठून राहिले असते. विसरायला जमते म्हणून असंख्य नाती टिकली आहेत. हे लक्षात ठेवण्याच्या कामाचे नाही हे मेंदूला कोण सांगते ते माहीत नाही पण त्याने हे डिलीट बटण वारंवार दाबल्याने जगण्यातली मजा टिकून राहिली आहे. मेंदूला पक्के माहित आहे त्याला काय लक्षात ठेवायचे आणि काय विसरायचे. आपणच त्याच्या कामात अडथळा निर्माण करतो. त्याला हे विसर ते लक्षात ठेव असले हुकूम सोडतो. परिणाम दरवेळी चांगलाच होतो असे नाही. म्हणून तर त्याला त्याचे काम नीट करू द्यायला आठवणीच अशा निर्माण करायला हव्यात ज्यांना विसरायची गरज असणार नाही आणि समजा विसरल्या तरी जगबुडी ही होणार नाही.

ओव्हर्थिंकिंग होऊ नये म्हणून, मनाने वाईट वाटून घेऊ नये म्हणून, मनाला त्रास होऊ नये, मनातला राग, दुःख ओठांवर येऊ नये म्हणून; आपण मेंदूला इन्स्ट्रक्शन्स वारंवार द्यायला लागतो. तो यंत्रवत त्याची कामे करतोही. आपण त्यावर ओझे टाकत जातो आणि मग एक दिवस जे विसरायची गरज आहे ते सोडून तो भलतेच विसरायला लागतो.मोठा घोळ घालून बसतो. पण  काय करणार, उशीर होतो. हे घडते तोवर आपण त्याच्या सिलेक्टीव्ह मेमरी चे महत्त्वही पार विसरून गेलेले असतो.


विसरता येत नाही असे नसतेच काही

मनाला सांदणारी नवी मिळतेच शाई!

चुकांना टाळताना किती केली हुशारी

नवे दिसताच कोणी पुन्हा चुकतेच काही!

अरूण म्हात्रे


-श्रुतकिर्ती

२५/०६/२०२१

Comments

  1. खरंय! विसरणे हे साहजिक आहे, आणि लक्षात राहणे पण साहजिकच.
    "Forgetfulness helps Forgiveness", So I think it is a blessing when it comes to RELATIONSHIPS. (Not so much for passwords 🥺)
    परंतु English च्या "forgetful" या शब्दापेक्षा मला आपल्या मराठीतला, "विसरभोळेपणा" हा शब्द जास्त आवडतो. It feels nice in a way. 😌 ~ CK

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान