सावल्या, मनातल्या.

 

हिवाळ्याचे दिवस, अंधार फार पटकन पडतो. काल घरी येता येता थोडा उशीर झाला. दार उघडले तर घर काळोखात बुडालेले. काही सांगण्याबोलण्या आधी प्रतिक्षिप्त क्रियेसारखे दिव्याचे बटण दाबले गेले. पाय धुवून देवापाशी दिवा लावला आणि त्याची नक्षीदार सावली देवघराच्या भिंतीवर पडली. त्या मंद प्रकाशात मघाची काळोखाची काजळी क्षणार्धात दूर झाली. त्या क्षणात नुसता घरातलाच न्हवे तर मनातला काळोख दूर झाला, तो दूर करणारी अज्ञात शक्ती आपल्या आसपास कोणत्या ना कोणत्या रूपात असतेच याची प्रकर्षाने जाणीव झाली. हा मनातला काळोख दूर करणाऱ्या समया लावणाऱ्या अनेक हातांची आठवण मनात गर्दी करू लागली.

यातल्या अनेक हातांना तर कधी सांगितलेही न्हवते त्यांनी किती क्षण उजळवले होते. आशा वेळी हे मन मोठा स्ट्रगल करते कसे, कधी, काय बोलू ठरतच नाही. मग काय करायचे? हे सगळे विचार नुसते साठवूनच ठेवायचे? ते व्यक्त कसे करायचे? सदैव भटकणाऱ्या या विचारांची मालकी घ्यायची तरी कशी? बोलता नाही आले म्हणून त्यांना नाकारणाऱ्या, स्वतःचेच विचार कबूल न  करण्या इतके कमकुवतही ते मन नसते. मग एकच मार्ग असतो व्यक्त होण्याचा. लिहणे ... पांढर्यावर काळे करण्याचा.

कृतज्ञता, प्रेम,आदर व्यक्त करताना आवाज हरवलेले ते मन दोन दिशांना ओढले जाते. एकात मनात आले आलेल्या अव्यक्ताला उपमा, अलंकारांनी सजवून समोर मांडायचे, पण त्यात त्या मनाच्या भावना आणि आणि समजून घेणाऱ्याच्या, अर्थ लावणाऱ्याच्या भावना यात तफावत झाली तर? सांगायचे एक आणि सांगितले गेले दुसरेच तर? मग दुसरी दिशा सोपी वाटते. ज्यात मन आपणच तयार केलेल्या रस्त्यावर दूर दूर जात राहते. जिथे मनाला वाटलेले कुणाला सांगायची गरजच नसते. स्वतःला कळलेले सांगण्याऐवजी लिहून ठेवायचे असते, फक्त स्वतःसाठीच. मनातले भाव व्यक्त करण्याची मनाची निकड लिहायला भाग पाडते. मनात बरेच काही घडत असताना भटकणारे विचार एकत्र करण्यासाठी ते मन लिहीत असते. मनाला येईल तसे... न थांबता.

एकदाचे लिहून संपते. आनंद, दुःख, राग लोभ सगळे मांडून होते. लिहलेले परत वाचून बघण्याचीही गरज संपते. रेल्वे प्लॅटफॉर्मवर बसून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या बघणाऱ्या, रिकाम्या प्रवाश्याइतके त्रयस्थ वाटायला लागते.

विचार थांबतात, तसा  दिव्याचा उबदार उजेड भोवती जाणवायला लागतो. प्रत्यक्ष कधीही त्या समई लावणाऱ्या हातांपर्यंत न पोचणारे धन्यवाद, मनातून ज्याच्यात्याच्या पर्यंत पोहचवले असतात. आता सांगण्याची, लिहण्याची मनाची गरजही संपलेली असते. कधी तरी थोड्याकाळापुरत्या मनावर झाकोळणाऱ्या सावल्या पुन्हा गडद होण्याआधीच प्रकाशाची जादूची कांडी फिरवणाऱ्या सगळ्या हातांची जाणिव मनात ठेवून पुढच्या वेळी घर आणि मन काळोखात बुडून जाण्याआधीच दिवा लावला जातो, स्वतःसाठीही आणि आपल्या परिघातल्या सगळ्यांच्या मनातल्या सावल्यांसाठी.




जैसी दीपकळिका धाकुटी।परी बहु तेजातें प्रकटी। तैसी सद्बुधी हे थेकुटी।म्हणो नये।।(२३९)

                                                                                                                                                      - ज्ञानेश्वरी

 

 

- श्रुतकिर्ती

०२/०७/२०२१

 

Comments

  1. श्रुती, तुझ्या या लेखाने, प्रत्येक वाचकाच्या मनात पाठीशी असलेल्या आशिर्वादांची जाणीव व्हावी, इतके हे शब्द प्रामाणिक आहेत. ~ CK

    ReplyDelete
    Replies
    1. शब्द प्रामाणिक असणे या पेक्षा मोठे काय💞

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान