न लिहलेले पत्र!

 


काल कशासाठीतरी एक जुने खोके बाहेर निघाले. मजेमजेशीर गोष्टी सापडल्या त्यात. कधीच्या काळचे एकच उरलेले कानातले, एक पावती, कुठलेतरी जुने पुराणे पेपर कटिंग आणि एक अंतर्देशीय पत्र! उघडून पहिले तर काहीच न लिहलेले. सतरा वर्षांपूर्वीची तारीख होती टाकलेली बाकी काहीच नाही. आठवूनही सुचेना नक्की कोणासाठी होते ते आणले? मग लिहिलेच कां न्हवते? आणि मग हे कोरे पत्र ठेवले तरी कशाला आहे जपून? मेंदूला ताण देऊन उपयोग न्हवता. या बाबतीत त्याने असहकार पुकारला होता. मनाला विचारले तर त्याने एवढेच सांगितले, असेल काहीतरी महत्वाचे,आठवेल कधीतरी.

आणि मग त्या निमित्ताने मनात इतकी पत्रे आठवू लागली कि, गेल्या काही वर्षात आपण पत्र लिहिलेच नाही हे आठवून उगीचच खंत वाटली. फोन शेकडो केले, मेसेजचा तर काउंटच नाही, पण पत्र कधी लिहले शेवटचे छानसा मायना लिहून, खाडाखोड न करता कोरीव अक्षर काढून? फार फार वर्षे झाली.

पार मागे वळून पाहताना चौथी पाचवीत असतांना मी आणि माझी मैत्रीण पंधरा पैशाच्या पोस्टकार्डावर चित्र काढून दिवाळीचे आणि वाढदिवसाचे ग्रीटिंग पाठवायचो गावातल्या गावात. ते पोस्टकार्ड आजही आहे माझ्याकडे, अर्थात मैत्रीण आणि मैत्रीही आहेच. मग आठवली भारदस्त मायन्याची घरी येणारी वडीलधाऱ्या नातेवाईकांची पत्रे. ते 'वडिलांचे सेवेसी शि.सा.न. वि.वि.' असले मायने पाहून तप उलटले आता. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला गेले कि बाबा रिझल्ट कळवायचे, २-४ दिवसांनी कळणाऱ्या त्या निकालाचे ना आईवडिलांना टेन्शन असायचे ना आम्हा तिघांना. काहीही मार्क पडले तरी आईस्क्रीम मिळायचेच त्यामुळे काळजी नसायचीच. शाळेत मात्र बरीच पत्र लिहावी लागली, पाच मार्कांसाठी. त्यांचे प्रकार आणि नमुने. विषय आणि मायने. ठराविक भाषा आणि त्याबरहुकूम पडणारे मार्क व शेरे. सगळेच मजेशीर. मराठी,इंग्रजी,हिंदी कोणी सुटले नाही त्यातून. त्यानंतर मात्र पत्र लिहण्याचे फारसे योग कधी आलेच नाहीत. घरी येणाऱ्या पत्रावरची तिकिटे जमणे, त्यांची देवाणघेवाण करणे हे मात्र आपण सगळ्यांनीच केलय.

खूप वर्षांनी भारताबाहेरून घरी पत्रे लिहताना आणि आलेली पत्रे वाचतांना पुन्हा पत्रांशी संपर्क आला.सणावारी, वाढदिवसांना आईचा खाऊ, ताई दादांच्या गिफ्ट्स आणि बाबांचे पत्र असलेला बॉक्स पोस्टमनने दिला कि काय काय मनात यायचे हे कधीच कोणत्या पात्रात लिहून सांगता येणार नाही. माझे बाबा आणि त्यांची नात यांचा त्यातही एक वेगळाच पत्रव्यवहार असे. ते तिला सुंदर पत्र लिहित अगदी सोपे तिला वाचता येईल असे आणि ती 'How are you?'वाले. रेघा नसलेल्या कागदावर सरळ रेषेतले,खाडाखोड नसलेले अनेक उत्तम आशीर्वाद असलेले पत्र आता येत नाही बाकी सगळे तसेच आहे. आता बऱ्याचदा ऑनलाईन गिफ्ट येतात त्यावर पत्ता नाव सगळेच प्रिंटेड असते मग लिहणार कोण आणि कोणाला?

त्या पत्राची  भाषा, मजकुरच नाहीतर पाकिटावरचा नाव पत्ता ते लिहण्याची पद्धत सगळे आपलेसे वाटे. मनापासून कोणीतरी आपल्यासाठी ते लिहलेय याची जाणीव करून देणारे असे. असेच काहीतरी कोणालातरी सांगावेसे वाटले असणार म्हणूनच आणलेले ते चिनी शिक्का असलेले ऐरमेल पत्र पण कधी लिहिलेच गेले नाही.

ते कोरे राहिले आणि आज इतक्या वर्षांनी मनातल्या इतक्या पत्रानां जागे करून गेले.फोने,मेसेज,videocallच्या सुविधांपुढे कोणाला तरी पत्र लिहणे किंवा पत्राची वाट बघणे कालबाह्य झालेय खरे पण हे कोरे पत्र मात्र आज मनातल्या मनात खूप जणांना पाठवता आले. कधीच न लिहता आलेला आणि न वाचता येणार मजकूर लिहून!

- श्रुतकिर्ती 

-१६/०७/२०२१




  

Comments

  1. पाहिल्या paragraph मधला स्व-संवाद आवडला. अंतर्मनातून उत्तरे मिळणे, हीच असावी Inner strength, असे वाटते. :)
    परदेशात असताना आपल्या माणसांची पत्रे येणे आणि त्यांना पत्रे पाठवणे, याने जी मने जुळलेली राहतात, त्याचा गोडवा अवर्णनीय.
    ~ CK

    ReplyDelete
    Replies
    1. प्रश्न जर आपल्या मनाला पडले तर उत्तरेही तेच देईल😊बाहेरून मिळणारी उत्तरे तात्पुरती वाटतात.
      Thank you 😊

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान