गुरुतत्वाच्या शोधात

 

आज गुरुपौर्णिमा,सगळीकडे गुरुभक्तीचे,गुरुपुजेचे वारे वाहत आहेत. मानवीरूपातले, अज्ञातशक्तीच्या स्वरूपातले, निसर्गातले, पंचमहाभूतांच्या रुपातले असे अनेक गुरु आपण मानतो, पुजतो आणि मनापासून त्यांना follow करतो. यातल्या प्रत्येक गुरुस्वरूपातून काहीतरी शिकण्यासाठी, त्यापासून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपली धडपड चालू असते. 'गुरुवीण कोण दाखवील वाट' हे म्हणत प्रत्येक जण वेगळ्यास्वरूपातील गुरु आणि आपापली वेगळी वाट चोखाळत असतो.

मग आपले गुरु कोण? कसे कळते, कधी भेटणार?  सगळ्यातुनच जर आपण शिकत असतो, तर ठराविक व्यक्ती, घटना, तत्व यांना का गुरु मानतो? काय सांगते आपल्याला त्यांना गुरु मानायला? आणि शिष्याची भूमिका घ्यायला? ज्या व्यक्तीच्या, विचारांच्या सान्निध्यात मनःशांती मिळते ते आपले गुरु. कदाचित वेळोवेळी,परिस्थितीने व्यक्ती विविध असू शकतीलच. अस्तित्व वेगवेगळे,माध्यम वेगवेगळे कारण त्या क्षणी त्यात असते गुरुतत्व आपल्याला मार्गदर्शन करणारे. सर्वत्र व्यापून असणारे हे गुरुतत्व. विविध रूपात सामोरे येणारे.शिष्यत्व स्वीकारायची तयारी असली कि सर्वत्र सापडणारे.

आपल्या स्वतःतही असणारे, पण आपल्याला न सापडलेले. 'कोहम' चा शोध म्हणजे आत्मरूप शोधणे म्हणजे स्वतःतले हे गुरुतत्व शोधणे न्हवे कां?लहानपणापासून रूढार्थाने शिक्षण मिळताना कुणाकडून तरी शिकायचे, मार्गदर्शन मिळवायचे हेच माहित झालेल्या आपल्याला हे स्वतःत शोधायचे, शिकायचे कसे किंवा कधी?प्रत्येक गुरु हा समर्थच असतो तयारी तर शिष्याचीच असावी लागते. तयारी घेणार्याचीच कमी पडते, इथे तर आपल्यातलाच गुरु आपल्यातलाच शिष्य.

निसर्गातला प्रत्येक घटक स्वतःला सतत modify करत असतो, स्वतःच स्वतःत evolution घडवत असतो. काय हरकत आहे आपणही हे करून बघायला? देहधारी आपल्याला त्या गुरुतत्वापर्यंत पोचायला गुरुतत्व धारण करणाऱ्या देहरूपी गुरूंची या साठी आवश्यकता असतेच. मानवी रुपातले आपले गुरु आपल्याला, मी एक साधन, निमित्त आहे, तुम्हाला तुमच्या आत्मतत्वापर्यंत पोचवायला हे कायम सांगत आलेत मग त्या साधनाचा हात धरून काय हरकत साधक  व्हायला? स्वतःला शोधून स्वतःतच जाणीवपूर्वक बदल करायला? सगळ्यात आधी आपल्यात गुरुतत्व आहे हे मान्यतर करूया मग त्याची गाठ घालून द्यायला भूतलावरचे गुरु आहेतच की.

हे शोधणे, मान्यकरणे  मात्र अवघड काम. सध्याच्या जगात finger tip वर सगळे उपलब्ध असताना काय आणि कुठे शोधायचे हे माहित नसताना कसा मिळणार निकाल? 'कोहम'चे उत्तर 'सोहं' मिळायला आधी त्यातला अहं तरी कळला पाहिजे, ओळखला पाहिजेच की. सद्गुरू आपल्याला कायम हेच करायला प्रेरित करत असतात पण ते न कळाता सवरता आपण फक्त त्यांच्या शब्दांकडे बघत बसतो आणि त्यातच अडकून बसतो. कृती टाळतच राहतो. बौद्धिक विचारांच्या जंगलातून बाहेर पडायला गुरुकृपा लागते पण त्या साठी जगातली प्रत्येक गोष्ट गुरुस्थानी मानावीही लागते. गुरु अंतर्यामी आहेतच आणि बाहेरही. अंतर्यामी असलेले गुरुतत्व जागृत झाले कि ते मनाला त्याच्या उगमस्थानाकडे वळवते  आणि न विचारताच बरेच काही उलगडते.

ख्वाबिदाच्या असण्याचा purpose सुद्धा हा सगळा शोधाचा प्रवास करणे आणि तो तटस्थपणे पाहणे हाच तर होता. मग आजची गुरुपौर्णिमा याच स्वतःतल्या गुरुतत्वाच्या शोधात गुरुंच्याच आशीर्वादाने!

 

-श्रुतकिर्ती

२३/०७/२०२१

मज हृदयीं सद्‌गुरु । जेणें तारिलों हा संसारपूरु । म्हणौनि विशेषें अत्यादरु । विवेकावरी ॥

सार्थ ज्ञानेश्वरी 




 

Comments

  1. As always powerful introspection

    ReplyDelete
  2. ! गुरुतत्त्व !
    सर्वव्यापी, कायमस्वरूपी, सात्विक, सरल, शुद्ध, अमृतमय, तेजोमय, कृपाळू, आत्मिक तत्त्व.
    श्रुती, Congratulations for finding that ख्वबिदा within you. ~ CK

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान