संवाद

 

काल रात्री एक forward आलेला, एक लोकसंगीत गाणारी गायिका अतिशय सुंदर आवाजात काहीतरी गात होती. गंभीर सूर, पार्श्वभूमीला एकच वाद्य आणि कुठेतरी डोंगराच्या कड्यावर बसून एकटीच स्वतःत हरवून ती गात होती. जेमतेम पाच मिनिटांचा विडिओ पण सगळ्याचा विसर पडला. स्थळकाळाचे भान हरपणे म्हणजे काय ते हेच असते का? असाही प्रश्न पडला. ती काय गात होती त्यातले एक अक्षरही कळले न्हवते. भाषा ओळखीची अजिबातच न्हवती. आशयाची सुताराम कल्पना न्हवती. ऐकणारी त्यावेळी मी एकटीच होते त्यामुळे मी माझ्या मनानेच अर्थ लावला पण चार जण असते तर प्रत्येकाचा वेगळा अर्थ समोर आला असता हे नक्की. म्हणावे तर ती स्वतःसाठी गात होती, स्वतःत हरवून आपल्याशीच बोलत होती पण तिच्याही आणि माझ्याही नकळत ती माझ्याशी संवाद साधत होती. ज्यात न्हवती कोणतीच समान भाषा, न्हवता समान विषयाचा पार्श्वभूमीचा धागा. पण काहीतरी सांगितले जात होते. काहीतरी उमजत, उकलत, उलगडत होते. शब्दावाचून भावना कळणे हे ऐकून माहित होतेच, इथे शब्द होते, सूर होता, भावनाही होतीच पण तिची आणि माझी भाषा वेगवेगळी असूनही एक संवाद होता आणि तो नक्कीच सुसंवाद होता.

संवादाला भाषा, भावना,शब्द हे सगळेच किंवा यातले एकतरी लागते हे खरे. पण संवादाचे असतात दोन भाग. सांगणारा-ऐकणारा, देणारा आणि घेणारा इतके असले तरी पुरते. भाषा, भावना, सूर, विचार हे मागून येतातच संवादाची इच्छा असली कि. नुसते हे सगळे असतानाहि अनेकांशी कुठे घडतो संवाद इच्छाशक्तीशिवाय. आपल्याशीच बोलतो आपण अनेकदा पण त्यातही एक सांगणारे आणि एक ऐकणारे मन असतेच की. बोलायला आवडते आपल्याला. मला गप्पा मारायला, बोलायला आवडतेच; तो माझा विकनेस नसून स्ट्रेंथ आहे हे वाटतेही पण कधी? जेव्हा ते बोलणे संवाद होते तेव्हाच. त्यात सांगणारा-ऐकणारा, भाव-भावना, विचार सगळेच दोन वेगळे असतात. गप्पा मारायला संवाद साधायला  समोर माणूस असायची तरी काय गरज? जेमतेम दोन-चार शब्द बोलता येणारी लहानमुले खेळण्यांशी खेळतात तेव्हा वेगळंच संवाद होतो त्यांच्यात. झाडाफुलात रमणारा बोलतोच की प्रत्येक पानाफुलाशी. निगुतीने स्वयंपाक करणाऱ्याची भांडी, चित्रकाराचे रंग, गायकाचे तंबोरे बोलतातच की त्यांच्याशी. घरच्या मनी भुभुशीही बोलतोच की मनातले सगळे. थोडक्यात काय वाद न होणाऱ्या प्रत्येकाशी आपण बोलतो. ख्वाबिदा तरी काय? विचारांचा एकमेकात गुंतत संवादच आहे की. कधी मन तर कधी मेंदू एकमेकांना प्रश्न विचारतात आणि उत्तरेही देतात. कधी नुसतेच काहीतरी आठवत बसतात.

कोरे, निर्विकार मनच बहुदा संवाद साधत नसेल. त्यात विचारच नसतील, भावनाच नसतील तर त्याला वाद काय आणि सुसंवाद काय सगळे सारखेच. बाकी जोवर जीवात जीव आहे तोवर मेंदू/मन कामात आणि संवादात मग्न असणारच. मग कधी तो अर्थपूर्ण तर कधी निरर्थक.

मग या अष्टोप्रहर कार्यरत असणाऱ्या चेतनाशक्तीला वाया घालवून चालेलच कसे? हे लक्षात आल्यावर संवादातला एक भाग मी (माझा मेंदू/मन) असेल तर दुसरा भागही अर्थपूर्ण असण्याची जबाबदारीही माझीच. संवादाच्या एका बाजूने चांगले असण्याची जबाबदारी जशी माझी तशी दुसऱ्या बाजूकडून चांगलेच मिळवण्याचीही जबाबदारीही फक्त माझीच!

-श्रुतकिर्ती

३०/०७/२०२१



 

म्हणौनि संवादाचा सुवावो ढळे ।

तऱ्ही हृदयाकाश सारस्वते वोळे ।

आणि श्रोता दुश्चिता तरी वितुळे ।

मांडला रसु ।।

सार्थ ज्ञानेश्वरी.

Comments

  1. कोणालाही बोलता येणे हा नैसर्गिक वाचाशक्ती चा अविष्कार असे मानले, आणि मन-बुद्धीच्या सुसंवादातून जे प्रामाणिकपणे बोलले जाईल आणि ज्याच्या पाठीशी "हृदयाकाशे सारस्वते" चा आशिर्वाद असेल तर ते अनमोल, अमूल्य असणार याबद्दल शंकाच नाही. त्यातूनही आता ख्वबिदाचे विचार लेखणीने मुद्रीत होत आहेत.
    हे श्रुतकीर्ति, तुझ्या नावाप्रमाणे ख्वबिदाला कीर्ती लाभो. ♥️🙏 ~ Ck

    ReplyDelete
    Replies
    1. 💜🙏अशाच सदिच्छा कायम लाभोत.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान