'वाजती पांयजणां’


काल बाकीबाब बोरकरांची पुण्यतिथी होती. या पूर्वी ती कधी माहितीही न्हवती. सोशल मीडियामुळे काल अनेक कवितांच्या रूपात ती सामोरी आली. त्यातूनच कळले, कि ती सदतिसावी पुण्यतिथी! म्हणजे मला कविता या शब्दाचा अर्थ कळायला लागला त्याच्या आसपासच ते गेले. त्यावेळी अर्थातच बोरकर या शब्दाचे गारुड मनावर न्हवतेच मग आज इतक्या वर्षांनी त्यांनी स्वानंदासाठी लिहलेल्या कविता माझ्या मनात गर्दी का करत होत्या? बरं त्या नुसत्याच आठवत न्हवत्या; 'वाजती पैंजणा' वाचताना दूरदर्शनच्या कृपेने पाहिलेल्या विडिओ मधले शाल पांघरलेले बोरकर आणि त्या शब्द-सुरांवर डोलणारे पुलं. त्याबरोबरच कानात ऐकू येणारा, अगदी स्पष्ट ऐकू येणारा पुलंचा तीच कविता म्हणणारा आवाज सगळेच कसे मी समोर बसून ऐकल्यासारखे.

आणि मग दिवसभर चळच लागला, मनातल्या प्रत्येक आनंदाचा उद्गम शोधण्याचा. दिवा लावताना कधी न्हवे तो 'एडिसन' आठवला. घराचे दार उघडताना बाकी सगळ्यांपेक्षा 'राईट बंधू' नसते तर? हा विचार चमकून गेला. हे टाईप करताना 'चार्ल्स बॅबेज'चा भला मोठा खोलीभर आकाराचा संगणक दिसला. या सगळ्यांनी कुठे माझा विचार करून हे शोध लावले होते हे. ते त्यांच्या मनात आले, मेंदूला सुचले, उमजले ते करत होते. त्यांना त्यातून आनंद, समाधान मिळत गेले. साईड इफेक्ट म्हणून मला एवढे सुखी आयुष्य मिळाले. शेकडो हजारों वर्षांपासून ते अगदी या क्षणापर्यंत, जगभर कोणी ना कोणी, कुठे ना कुठे त्याचे आवडते-नावडते काम मनलावून किंवा पाट्या टाकायच्या म्हणूनही करत असते. त्या क्षणाला त्याचे परिणाम बरेचदा दिसतही नाहीत. काही द्रष्टयांनी परिणामांचा विचार करून मुद्दाम कृती केल्या पण बाकीचे मात्र विचार न करता करत गेले आणि परिणाम पुढच्या प्रत्येक क्षणावर झाले, अनेकांच्या- असंख्यांच्या.

यात  माझाही काही रोल असेलच ना? महत्वाचा नसेना का पण जन्माला आलोय म्हणजे बरा वाईट इम्पॅक्ट कोणावर ना कोणावर, कशावर ना कशावर होणारच. जाणूनबुजून किंवा अजाणता.

या जाणिवेने एक सेकंद धडकीच भरली. कुठे दिवसभर मनात आलेली मोठी यादी आणि कुठे आपण. पण त्यांच्या सारखा नसला तरी आपल्या कर्मांचा परिणाम होणारच मग तो कुणाला त्रासदायक न व्हावा म्हणजे मिळवले. चांगले( म्हणजे तरी नक्की काय ते नाही माहित...)परिणाम जरी घडवता नाही आले तरी निदान डिस्ट्रक्टिव्ह तरी असू नयेत. मी वापरलेली छोटीशी प्लॅस्टिकची पिशवी जर हजारो वर्ष टिकणार आहे, तीही वाईट परिणाम घडवत तर माझ्या वागण्याचे कृतीचे बरेवाईट परिणाम होतीलच होतील.

मग करायचे काय? वापरायचा मेंदू; कमीत कमी त्रासदायक, जास्तीत जास्त सुखदायक आठवणी तयार करायसाठी लावायचा क्वालिटी चेक. तोलून घ्यायचे प्रत्येक कृतीला सचोटीच्या काट्यावर. मग माझ्यासारख्याच कोणाच्यातरी कानात कधीतरी नक्कीच 'वाजतील पांयजणां!'

 

स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा

तृप्ति नको मज मुक्‍ती नको पण येथील हर्ष नि शोक हवा

- बा.भ.बोरकर

 

 Pic. Credit: https://aloneinuniverse.com/wp-content/uploads/2011/03/dd92571b1c826611554588b94c9d70c0-d31lpgc.jpg

 

- श्रुतकिर्ती

-०९/०७/२०२१

 

Comments

  1. जन्माला आलोय म्हणजे त्यामागे जगनियंत्याचा काहीतरी उद्देश आहे हे नक्कीच - हा आत्मसंवाद खूप आवडला.
    त्यात मनुष्याचा जन्म म्हणजे केवढे सौभाग्य आणि मागच्या जन्मांची तपश्चर्या! खरंच सकारात्मक आयुष्य लाभो, ही तुझ्या बरोबर माझीही प्रार्थना 🙏 ~ CK

    ReplyDelete
    Replies
    1. सकारात्मक आयुष्य💞 आपल्या मनात मनापासून आलेय म्हणजे होणार नक्की🙏

      Delete
  2. मग करायचे काय? वापरायचा मेंदू; कमीत कमी त्रासदायक, जास्तीत जास्त सुखदायक आठवणी तयार करायसाठी लावायचा क्वालिटी चेक. तोलून घ्यायचे प्रत्येक कृतीला सचोटीच्या काट्यावर.= powerful wisdom

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान