यादी

 

"बडीशेप संपायला आलीय!" या डायलॉग वर "यादीत लिही" हा इन्स्टंट रिप्लाय आला. फ्रिजवर तीन-चार प्रकारच्या याद्या विविध रंगात ठाण मांडून बसल्या होत्या. बडीशेप तिच्या तिच्या यादीत गेली आणि मनात आले किती उपद्व्याप करतो आपण. वाणसामानाची, इतर खरेदीची,ठरवलेल्या कामांची, घेतलेल्या अपॉइन्टमेन्टची, मारुतीच्या शेपटासारखी  याद्यांची यादी वाढतच होती.

काम सोपे जावे म्हणून, हाताखालून गेले कि लक्षात राहते, दुसऱ्याला फार सूचना द्याव्या लागत नाहीत अशी असंख्य कारणे  देत मी याद्या करतच राहते. Being Organised या मेंदूच्या एका कप्प्याच्या गरजेसाठीही हे कधी कधी आवश्यक असते. काही वेळा याद्यांमध्ये स्वतःला बांधून घेणे सोपे जाते म्हणूनही असेल. प्लॅनरमध्ये to do list लिहणे, विविध हायलायटर्स वापरून, बाजूला चित्रे काढून रंगीबेरंगी याद्या तयार करायला, खरेतर मज्जा येते हे मुख्य कारण असावे. लहानपणीच्या किराणावाल्याच्या वहीचे ग्लोरिफाइड व्हर्जन हे.

कुठून आल्यात या याद्या? यादीचा इतिहास म्हटले की एक गमतीशीर चित्र डोळ्यापुढे येते. पौराणिक मालिका, चांदोबा, अमरचित्रकथा या सगळ्याचे कॉम्बिनेशन मिळून तयार झालेला चित्रगुप्त, ढगांमध्ये टेबल-खुर्ची टाकून बसलाय. आपल्या सगळ्यांच्या नावांच्या याद्यांच्या भेंडोळ्या घेऊन. त्यात सगळे नोंदवत. दृश्य मजेशीर असले तरी विचार करायला लावणारे होते. प्रत्येक विचाराची, कृतीची, वक्तव्याची, घटनेची कुठेतरी नोंद होत असते. कधी दृश्य तर कधी अदृश्य. कधी नोंदी साध्या काळ्यापांढर्या चुक-बरोबर यात मोडणाऱ्या. तर कधी विविध छटांनी सजलेल्या. काय बरोबर काय चूक याचा संभ्रम पडणाऱ्या. मनातल्या दिवास्वप्नात मीच चित्रगुप्त आणि माझ्याच नोंदी. हा विचार आला मात्र आणि नंतर दिवसभर प्रत्येक विचार, कृती, reaction कोणत्या यादीत जाईल हा क्लासिफिकेशनचा खेळ चालू झाला. माझ्या मनाला, मेंदूला योग्य वाटणाऱ्या कितीतरी नोंदी चित्रगुप्ताच्या नजरेतून वेगळ्याच रकान्यात जाऊ लागल्या. फक्त जरा त्रयस्थ होऊन बघितल्या कि वागण्याबोलण्यातल्या त्रुटी पटापट जाणवू लागल्या. हि यादी करणे महागात पडतेय असेही मनात आले. आपणच आपले सगळ्यात योग्य समीक्षक असतो हे झटक्यात पटले. स्वतःच्या चांगल्या वाईट वागण्याची स्वतःलाच कारणे देणे किती अवघड असते हे हि जाणवले.

मनातल्या प्रत्येक विचाराचा मागोवा घेणे कठीणच. पण निदान ढोबळमानाने मोठा परिणाम होणाऱ्या विचार, कृतींकडे तरी हे कोणत्या यादीत जाईल असा एक पॉज घेत पाहीले तर माझ्या अनेक नोंदी योग्य ठिकाणी जातील याचीही खात्री पटली. आता हा मुकुट, कंठे, माळा वाला ढगातला चित्रगुप्त कायमचा मनात ठेवून घ्यावा या विचारात आहे. मनातल्या चांगल्यावाईटाबरोबरच फ्रिज वरच्या यादीतल्या नोंदी करण्यासाठी!

 

-श्रुतकिर्ती

०६/०८/२०२१



Comments

  1. मनातला चित्रगुप्त! Noice!! 😇👌
    Introspection च करायचे आहे, तर वेगवेगळी आभूषणे घालून, छानशा सिंहासनावर बसून, ढंगात तरंगत करायला काय हरकत आहे? मन हलके होईल यात शंका नाही. ~ CK

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान