मन वढाय वढाय

 

भीती या शब्दांचीच कधी कधी भीती वाटायला लागते. भीती, एन्झायटी या शब्दांकडे बाहेरून त्रयस्थ म्हणून बघणे आणि स्वत: त्यातून जाणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. डोळ्यात टचकन पाणी येणाऱ्याला इमोशनल म्हणून हिणवणे, भित्र्यभागूबाईची उपमा देणे फार कॉमन आहे. स्वतः त्या ठिकाणी नसताना सल्ला देणेही फारच सोपे आहे नाही. कां पण हे सगळे वाटले आज?

चार-पाच आठवड्यांपूर्वी ठरले कि एक ठराविक वीकेंड एकीकडे. सकाळी लवकर जमून परतण्याची घाई न असण्याचा. भेटण्याच्या ओढीने तयाऱ्या सुरु झाल्या. उत्साहाच्या भरात एका अगदी छोटयागोष्टीकडे माझे जरा दुर्लक्षच झाले. मैत्रिणीच्या घराचा पोस्टल ऍड्रेस आता बदललाय. जिपीएस शिवाय तिच्या घरी जायला यायला आत्ता कुठे जमायला लागले आणि ताईंनी घरच बदलले. झाले! डाव्या उजव्याचा घोळ घालणारी मी गूगल काकूंनी टर्न लेफ्ट म्हटले कि तीन लेन बदलत बरोबर उजवीकडे टर्न घेते. त्यामुळे हे लक्षात आल्यावर आदल्यादिवशी पासून मोर्चे बांधणी सुरु झाली. तीनचार महत्वाची वळणे बघून ठेवली. मनाला जे होईल ते होईल वगैरे समजावत दुसरा दिवस उजाडला. आणि गूगल मॅप्स ला गम्मत करायचा मूड आला. आणखीनच भलता रस्ता तिने पकडला. सकाळच्या भर थंडीतही मला घाम फुटला, पण सांगणार कुणाला? लेफ्ट, राईट करत एक्झिट काउन्ट करत तासाभराने तिच्या दारी पोचले आणि हुश्श झाले.

माणसाचा स्वभाव मजेशीर. पोचल्यावर दोन मिनिटात इतक्यावेळची तारांबळ दोन मिनिटात विसरली गेली आणि दिवस आनंदात गेला. सूर्य कलायला लागला, सावल्या मोठ्या झाल्या तसे घराचे वेध लागू लागले. पुन्हा सकाळच्या भावना परतून आल्या. दिवसभरातले हास्यविनोद बाजूला पडून भीती नसली तरी  'बापरे' वाली जाणीव झाली. निघावे तर लागणारच होते. घर वाट पाहत होते. पण जादूची कांडी फिरावी आणि झटकन रस्ता संपवा असे लहानमुलांसारखे रस्ताभर वाटत होते. संपायच्या वेळी तो सम्पलाही. घर आले. प्रवास दोन्ही वेळा सुखरूपच झाला होता. पाचच मिनिटात पुन्हा प्रवासातला ताण विरून दिवसभरातला आनंद मन भरून साठला होते.

पण नेहमीप्रमाणेच रात्री, मी पुढच्या वेळी बसने, ट्रेनने जाणार. माझ्याबरोबर कोणीतरी या. ती जिपीएस काकू माझी शत्रू आहे. मुद्दाम लांबून नेते. हि असंख्य वेळा म्हटलेली वाक्य पुन्हा म्हटली आणि पुन्हा कधी भेटायचे या साठी कॅलेंडर उघडले.

या सगळ्या मनाच्या प्रवासाला काय म्हणू? मला मानसशास्त्रीय टर्मिनॉलॉजि माहित नाही पण माझ्याच भावनांच्या असंख्य छटांची ओळख हे प्रसंग नव्याने मला करून देतात. भीती वाटणे गैर नाही. ती वाटणारच मनुष्य स्वभावच तो, पण त्याही पलीकडे त्यावर मात करण्यासाठी काहीतरी ठोस कारण हवे. त्यातून बाहेर पाडण्यासाठी कशाची तरी ओढ हवी. काल ती होती. दोन्ही वेळा. मैत्री आणि घर या दोन्ही भावनांनी तात्पुरती का होईना हि भावना दूर केली. माझेच  मन  एकाच क्षणी कमकुवत आणि कणखर दोन्ही आसू शकते याची सुखद जाणीवहि  करून दिली!



-श्रुतकिर्ती

२९/०८/२०२१




देवा, कसं देलं मन

आसं नहीं दुनियांत !

आसा कसा रे यवगी

काय तुझी करामत !


बहिणाबाई चौधरी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान