Learning to unlearn.

 

गेला अक्खा आठवडाच मजेशीर होता. सोमवारी मी काहीजणांबरोबर भगवदगीता वाचत होते, वाचता वाचता मधेच फेमस, ' यदा यदा ही धर्मस्य...' वाला श्लोक आला. आणि नीट तालासुरात गीता वाचणारा माझा मेंदू बी. आर. चोप्रांच्या सुप्रसिद्ध ट्यून ला कधी ट्यून झाला ते कळलेच नाही. कधी काळी लहानपणी डोक्यात फिट झालेली ती चाल विसरता आलीच न्हवती. मेंदूने नवी चाल शिकून सुद्धा.

इतकी छोटीशी गोष्ट सुद्धा मेंदूला unlearn करायला जमत न्हवती, त्या चालीशी असलेले कनेक्शन विसरता येत न्हवते; काहीतरी आठवणी जोडलेल्या होत्या त्याच्याशी म्हणून असेल का कदाचित? त्याच दिवशी अफगाणिस्तानच्या बातम्या येऊ लागल्या. विडिओ पाहायला मिळाले. स्वतःचे घर दार, चालू असलेले आयुष्य एका क्षणात सोडून, जमेल तसे स्वतःच्या देशाच्या बाहेर जायला निघालेले शेकडो लोक दिसले. त्यांना त्यांचा वर्तमानकाळ सोडून जायचे होते. भूतकाळातल्या बर्याचश्या आठवणी पुढे येणाऱ्या भविष्यकाळाचा विचार करून पुसून टाकायच्या होत्या. कसे जमणार होते त्यांना? पूर्ण पुसता येत नसतातच पण निदान तात्पुरत्या तरी बाजूला सारायच्या होत्या. काहींना ते जमेलही पण तात्पुरते, कधी तरी कशाने तरी पुन्हा हे मनात येणारच होते. आपल्यासारख्या पाच मिनिटे बातम्यात बघितलेल्यांच्याही. मला तर एक छानशी आठवण तात्पुरती विसरता येत न्हवती हे तर किती अवघड?

ह्या अश्या नकोश्या वाटणाऱ्या आठवणी, दृश्य, मनाच्या पडद्यामागे टाकायची तर त्या मेंदूला काहीतरी लक्षात ठेवण्यासारखे नवे द्यायला पण पाहिजे कि. Unlearn कर सांगताना त्याला नवीन learning material द्यायलाच पाहिजे. रिकामी जागा सोडणार कशी? जितकी त्रासदायक आठवण तितकीच पॉवरफुल रिप्लेसमेंट लागणार.

जगरहाटीचे चक्र खूप समतोल आहे. नुसत्या त्रासदायक घटनांनी ते फिरत नाही. दुसऱ्याच दिवशी सकाळी, पोलंडची भालाफेक करणारी रौप्यपदक विजेती मारिया आन्द्रेतजिक सगळीकडे बातम्यांमध्ये झळकली. एका छोट्याश्या पोलिश मुलाच्या उपचारांसाठी निधी जमवायला तिने तिच्या महत्प्रयासाने कमावलेल्या रौप्यपदकाचा चक्क लिलाव केला. आणि त्यावर कडी म्हणजे एका सुपरमार्केट चेन ने ते विकत घेऊन पैसे तर दिलेच वर तिला ते मेडल सन्मानपूर्वक परतही केले: पुन्हा कधी अशी वेळ आली तर उपयोगी पडावे म्हणून.

या घटनेतल्या प्रत्येकाचा रोल महत्वाचा, आणि प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखे होते. कालच काहीतरी डिलीट करायला सांगितलेल्या मेंदूला नवा अभ्यास मिळाला होता.

भोवतालात छान छान घडत नसते सारखे, पण वाईटाचे ढगच झाकोळत नसतात. वाईटाला तोडीसतोड किंबहुना वरचढ काहीतरी नक्कीच घडते. फक्त शोधायला पाहिजे, सापडले कि त्याचे कौतुक करत लक्षातही ठेवायला पाहिजेच. वेळप्रसंगी नकोत्या आठवणी रिप्लेस करायला!

 

- श्रुतकिर्ती

२०/०८/२०२१



उषःकाल होता होता 

काळरात्र झाली 

अरे पुन्हाआयुष्यांच्या पेटवा मशाली

                   सुरेश भट

Comments

  1. श्रुती, हे वाचून जाणवले, की घटना घडत असतात, त्याचे processing आपल्या मनात होते. त्यावर positive spin / spell कसा ठेवावा, हीच खरी साधना.... तपश्चर्या!!
    ~ CK

    ReplyDelete
    Replies
    1. खुप अवघड, पण काहीवेळा पटकन साधूनही जाते खरे .

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान