गणपती '२१

 

गौरी गणपती जवळ आले की नॉर्मलीविचारात तोच विषय घोळत असतो. त्यामुळे ख्वाबिदाचा विचार करतानाही प्रयत्नपूर्वक सुद्धा दुसरे काही सुचुच  शकले नाही. आस्तिकता- नास्तिकता, मूर्तिपूजा, प्रथा-परंपरा,सोवळे -ओवळे या सगळ्या बद्दलचे कोणतेही विचार, धारणा असल्या तरी गणपती आपलासा वाटतो.हातात ब्रश घेणाऱ्या प्रत्येकाने तो रेखाटला आहे. सगळ्या संतांनी त्याला प्रथम वंदनाचा मान देऊन काव्य रचले. बहुदा आपली विचारसरणी तयार व्हायच्या आधीच हा सण आपल्याला एकतर आवडायला किंवा नावडायला लागतो. आजूबाजूला इतके वातावरण तयारच असते, की त्यातून बाहेर पडणे शक्य नसते. मग त्या बद्दल प्रेम किंवा निर्विकारपणा नाहीतर टोकाचा राग काहीतरी तर येणारच. पण हे वातावरण आनंद देतेउत्साह देते एवढे मात्र खरे.प्रत्येक वेळी आठवणीत वेगळे काहीतरी लक्षात राहणारे निघते.कधी जमलेले तर फसलेले मोदक. कधी सजावट  तर कधी गणपतीची मिरवणूक. काहीना काही आठवण्यासारखे असतेच वेगळ्या वेगळ्या वर्षी वेगवेगळ्या मनस्थिती प्रमाणे लक्षात राहणारी वेगवेगळी आठवण.हे वेगळे वेगळे म्हणताना आठवले, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी ची सुरुवात गणेश वंदनेने केली. आणि आपल्या प्रासादिक मधुर भाषेत उपमा अलंकार यांनी अगदी सुबक श्री गणेश डोळ्यापुढे उभा केलाय. तसेच रामदासस्वामींनी दासबोधात  गणेश स्तवन केले. इथे उपमा अलंकार आहेतच पण सगळे भारदस्त.शब्दात सांगता येणार नाही ,पण काहीतरी प्रचंड बलवान रूप डोळ्यासमोर आणणारे वर्णन. मग जाणवले या दोघांचाही तो प्रथम वंदनीय देव. वर्णन मात्र स्वभावाप्रमाणे,काळाच्या गरजेप्रमाणे परिस्थितीप्रमाणे. आणि मग प्रत्येकाच्या आठवणींच्या विविधतेचे कारणच जणूसापडले. एकच गणपतीतेच दहा दिवस. घरातल्या प्रत्येकाला वेगवेगळे भासले असतील. नाव काढले की डोळ्यापुढे उभा राहणारा क्षण वेगवेगळा असेल. पण आठवणी मात्र प्रत्येकाकडेच असतील .

दरवर्षी गणपतीत जुन्या-नव्या बऱ्याच गोष्टी आठवतात तसेच आजही. पण प्रवासाच्या मर्यादेने बराच काळ न भेटलेल्या जवळच्यांच्या आठवणी या सगळ्या आनंदातही प्रकर्षाने जाणवल्या.

या वर्षीही मोदकाचे सारण ही तेच, पिठी देखील तीच,दरवर्षीप्रमाणे त्याचा  वास ही थोड्याफार फरकाने तसाच  कारण करणारीही मीच. पण आठवण मात्र आली आईच्या हातच्या मोदकाची. दरवर्षी गौरी-गणपती साग्रसंगीत पार पडल्यावर आईला भेटले कि ती  फ्रीजमधले सारण काढून चार मोदक करणार.खास राखून ठेवलेले सारण, मुरलेल्या केशराचा वास आणि तो गुबगुबीत मोदक. कशालाच त्याची सर नाही.

गणपतीला देव मानले की त्याने काय दिले त्याला काय मागितले हे कॅल्क्युलेशन मांडले जाते, जे  generally सगळ्यांच देवांच्या बाबतीत असते.गोंडस मूर्तीला पाहुणा मानले  कि तो आनंद देतो. भल्यामोठ्या सार्वजनिक मूर्ती उत्साह ,चैतन्य, आपण किती सोशल ऍनिमल आहोत हे जाणवून देतात . आजच्या गणपतीतले मोदक  मात्र, कितीही वय वाढले तरी, कुठेही रहात असलो तरी मनातल्या आठवणींना वयाचा अंतराचा प्रवास करता येतो आणि त्यातून मनसोक्त आनंद मिळवता येतो हेच जाणवून देत राहिले.

-श्रुतकिर्ती

१०/०९/२०२१



ऐसा सर्वांगे सुंदरू।सकळ विद्यांचा आगरू।त्यासी माझा नमस्कारू।साष्टांग भावे।।

समर्थ रामदास

Comments

  1. गणपतीच्या आठवणी तर सर्वांच्या असतातंच. भारताबाहेर देखील, घरी गणपतीची स्थापना न करताही गौरी गणपतींचे दिवस एवढे धामधूमीत जातात, याचे नवल, अप्रूप, आनंद तर असतोच, त्याचबरोबर एक कृतज्ञताही!!!, माझ्या सर्व मैत्रिणींच्या आपुलकी आणि प्रेमासाठी. 🙏 😇 ♥ ~ CK

    ReplyDelete
    Replies
    1. खरय, हा सण घरी असो नसो साजरा होतोच होतो.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान