पुनरागमनायच!

 

गेला महिनाभर गौरीगणपती विचारात, मनात सगळीकडेच ठाण मांडून आहेत. छोट्याशा आयुष्यात दर वर्षी इतके महत्त्व का आहे त्यांना?  यानिमित्ताने खूप प्रश्न पडतात. खरंच इतकी श्रद्धा आहे? का प्रथा-परंपरा, समारंभाची हौस? सवय लागली म्हणून? न केल्यावर चुकल्या चुकल्यासारखे वाटते म्हणून? मुर्तिपूजा हा अस्तिकतेचा पुरावा आहे म्हणून?  कारण तरी काय आटापिट्या मागचे? पाच दिवसाच्या सणासाठी, सगळ्या घरादाराला त्यात गुंतवण्याचे?

नेहमीसारखी गडबड,लगबग सगळ्या सगट त्या गौराया आल्या, जेवल्या. संध्याकाळ आप्तेष्टांच्या सृहृदांच्या हास्याने भरून गेली. आणि रात्री समईत तेल घालताना शांततेत यातल्या सगळ्या नाही, पण बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे मिळाली.त्या शांत उजेडात अगदी खऱ्या भासल्या. माझ्या जवळच्या प्रत्येकी सारख्या. मुखवटे घडवणार्याची कमाल, असे जरी मेंदू मागून टोकत होता तरी मन मात्र आपल्या मनात जे आहे तेच डोळे बघतात. मनाला सांगतात  याची जाणीव करून देत होते.

 ज्येष्ठा कनिष्ठा माझ्या अवतीभवती वावरणाऱ्या, आयुष्यात येऊन गेलेल्या किती जणींची आठवण  क्षणात करून देऊन गेल्या. आणि मला माझे उत्तर मिळाले.त्यांचे इतके ‘ह्युमन’ असणेच मला वर्षानुवर्ष आनंदाने हे सगळे करायला भाग पाडत होते. त्यांचे येणे, आनंदाने छोटासा पाहुणचार घेणे, आणि त्यांनी अजुन राहावे वाटत असतानाच विसर्जन. आपल्याकडे येणार्‍या सगळ्याच आप्तेष्टांच्या बाबतीत होत असतेच की हे सगळे. त्यांच्या साड्या,दागिने,खाऊ सगळे देवाच्या रूपापेक्षा,जवळच्या नात्यातल्या कोणाही पाहूणीसारखेच जास्त वाटते.

त्या येणार म्हणून होणारी तयारी.त्या निमित्ताने झाली का तयारी याची प्रश्नोत्तरे. मांडायला मदत करशील का ची मैत्रिणींना गळ घालणे. तुमच्या सोयीने  या पण हळदी-कुंकवाला या हे मनापासून आमंत्रण. तितकेच प्रत्येकाचे,  नक्की येतो चे  रिप्लाय यात संवाद -आनंद, उत्साह पुरेपूर भरून असतो. मांडण्यातली  लगबग संपते, तोच पुरणावरणाचा घाटाचे टेन्शन आणि खात्री. पोटभर जेवणे होताच, संध्याकाळची लगबग. प्रसन्न वातावरणातील संपू नये वाटणारी संध्याकाळ. ती संपतानाच लागणारे विसर्जनाचे वेध आणि नंतरची शांत आवरा आवरी.

देवघ,र्म सोवळेओवळे, प्रथा या पलीकडचा प्रत्येकाचा असणारा यातला सहभाग यासगळ्याकडे जास्त खेचतो. आजूबाजूला आपलीशी वाटावी अशी माणसे का लागतात त्याची जाणीव करून देतो. हक्काने मागचे आवरू लागणारी ताई-माई,अनेक वर्षांच्या जपलेल्या  नात्यातूनच मिळते.थोडक्यात काय, तर माझ्या लेखी हा सण माझ्या आयुष्यात जी चार लोक आहेत त्यांच्या असण्याची, त्यांच्या आनंदाची,जाणीव करून देणारा आह. दरवर्षी हक्काने बोलवली जाणारी आणि येणारी माणसे,आपल्या आयुष्यात आहेत याची खात्री करून देणार आहे. आनंद वाटायला, सण साजरा करायला जिवंत माणसंच लागतात आणि ती आजूबाजूलाच आहेत याची कृतज्ञता वाटणारा आहे. माणसात देव आणि देवात माणूस हे बेमालूम मिश्रण जाणवून देणार आहे.

थोडेसे रोजच्यापेक्षा वेगळे केले की भरभरून आठवणी तयार होतात आणि त्या मध्यरात्रीच्या अंधारात मंद समईच्या उजेडा सारख्या वर्षभरातल्या मनातल्या कठीण काळोखाला उजळायला पुरेशा असतात याची जाणीव करून देतात.

 म्हणूनच दरवर्षी सारखे पुनरागमनायच!

-श्रुतकिर्ती

-१७/९/२०२१


 


 गवराई आली गवराय आली”

कोणत्या पायानं?”

हळदकुंकवाच्या”

गवराय आली गवराय आली”

कोणत्या पायानं ?”

हिऱ्या माणकांच्या..”

Comments

  1. श्रुती, तुझ्या गौराया खूप सुरेख आहेत. त्यांना साडी नेसून तयार केल्यावर क्षणार्धात कशी एक जेष्ठा आणि दुसरी कनिष्ठा दिसायला लागते हे एक अप्रूपच. दोघींचे सौंदर्य निरखून पहायला खूप मज्जा येते. ~ CK

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या मनात जे आहे तेच दिसते त्यांच्या रूपात… मनी वसे ते दृष्टी दिसे.😊
      सुंदर मनाला त्या सुंदर दिसणारच💞

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान