चल रे भोपळ्या टुणूक टुणूक

 

धीतरी कचऱ्यातून पडलेल्या बिया तून एक छोटासा वेल आला.पाने कशा सारखी वाटतात, याच्या चर्चेमध्ये भोपळ्याला बहुमत मिळाले. आणि डोळ्यासमोर आली, टुणुक टुणुक उड्या मारत भोपळ्यात बसून जाणारी म्हातारी. हुशार, चतुर आणि  आश्वासनाच्या बळावर संकटांना थोपवणारी. आमिष दाखवून त्यांना टाळणारी. वेळ मारून नेणारी. मुलीच्या घरी जायच्या ओढीने,  संकटे पार करणारी. का सांगतात असली तात्पर्य असणाऱ्या रूपककथा? त्याही अगदी लहानपणी. ताटातली भाजी ओळखण्याच्या आधी हा गोष्टीतला भोपळा माहीत होतो लहान मुलांना. तेव्हा त्या म्हातारीशी वाघ कसा बोलला? ती भोपळ्यात कशी बसली?  असले आचरट प्रश्न ही पडत नाहीत. गुण्यागोविंदाने गोष्ट ऐकत पिढ्यान पिढ्या झोपी जातात.  हळूहळू या कथांतून मन मेंदू बाहेर पडतो.  जग कळायला लागतं. अशाच कोणत्या तरी कारणाने, या गोष्टी वेगळ्या अर्थाने , रूपाने, समोर उभ्या राहतात. नकळत तेव्हा न कळलेला अर्थ आज उमजायला लागतो.  म्हातारी सारखे आपणही कितीदा तरी वागतो,  हे आठवते आणि हसूही येते. चार दिवसांनी परत येते या आशेवर, आपणही म्हातारी सारखे किती जणांना आणि किती कामांना टांगून ठेवले आहे आणि चार दिवसांनी वेळ आल्यावर धूम पळ काढला आहे.  हे जाणवते फाइट ॲार फ्लाईट मध्ये, फ्लाईट वर भर असला की अशी भोपळ्यातली म्हातारी मदतीला येते. काहीतरी प्रसंगावधान दाखवून वेळ साजरीकरणार्यांची ही आदर्श असावी असेच वाटते. बरे तिला संकटे ही भेटतात रांगेत, एकापाठोपाठ एक. परिक्षा बघणारी. ती चतुराईने हातावर तुरी देऊन पळ काढते आणि संकटाला कळतही नाही,  तिने आपल्यावर मात केली आहे हे.  सेल्फ हेल्पवाल्या पुस्तकांमधील आयडियल केस आहे ही म्हातारी. कोणताही त्रास न होता अलगद बाहेर पडते सगळ्यातून. पण मग वाटले मी जर  वाघोबा कोल्होबा असते या गोष्टीतला तर? फसवले की मला म्हातारी ने. फसवले गेल्यावर त्या शक्तिशाली प्राण्यांना विश्वास ठेवल्याचे वाईट वाटले असेल ना? पण गोष्टीत असे प्रश्न विचारायचे नसतात. त्यातल्या नायक-नायिकेच्या बाजूनेच सगळे बरोबर असते. वाघोबा कोल्होबा दुष्ट असतात, म्हातारीला खाणारे. जरी तो त्यांचा पोट भरण्याचा राजरोस मार्ग असला, स्वधर्म  असला तरी. मग ही गोष्ट चुकीची होती का? पॉलिटिकली करेक्ट होती का?

ज्या दिशेने गोष्टीकडे बघून ती आपली बाजू. शेवटी म्हातारी आणि तिची लेक  दोन्ही खुश. वाघोबा आणि कोल्होबा दोघेही फसवले  गेले आणि बहुतेक शहाणे झाले. परत जंगलात भोपळा आला तर ते गप्पा मारण्यात वेळ नाही घालवणार. त्या भोपळ्याचे काय? गोल गरगरीत भोपळ्याचे काय, तर तो नुसताच गेला पुढच्या गोष्टीत टुणुक टुणुक उड्या मारत…

 


- श्रुतकिर्ती

२४/०९/२१

Comments

  1. बालगोष्टी, बालकविता वास्तवाचे बांधिल नसतात. त्यातूनच आपण कदाचित "When there is a will, there is a way" / "Nothing is impossible" वगैरे positive attitude वाले फंडे शिकत असतो.
    श्रुती, नेहमीप्रमाणेच तुझ्या लेखाने पूर्वायुष्यातील आठवणींनधून एक हसतखेळत फेरफटका मारून आणला.
    I Love your thinking threads. आणि प्रत्येकवेळी त्याला साजेसे काळजीपूर्वक वेचलेले फोटो ~ Kalyani

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you for noticing the photos, would love to have one of your sketches too for Khwabida one day.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान