वाढदिवस

 

या आठवड्यात ख्वाबिदा सुरू होवून एक वर्ष होतय. थोडक्यात ख्वाबिदाचा वाढदिवस आहे. जन्मदिवस नाही, कारण हे मनात येणारे विचार तेही random, haphazard… त्यांचा जन्म कधी झाला हे रूढार्थाने कळूच शकत नाही. पण हो वाढदिवस मात्र आहेच. आधी ते फक्त मनात असत, मग गेल्या वर्षभरात कागदावर आले.Random असले तरी कागदावर उमटतांना त्यांच्यांत काहीतरी सुसंगती यायचीच. मेंदू लिंक सोडत नाही कितीही फिरले तरी. कागदावरुन ते अनेकांच्या डोळ्याखालून गेले. कधी त्या विचारांनी हसवले, कधी माझ्या डोळ्यांची कड त्यावेळी पाणावली असणार याची जाणिव करून दिली. कधी आवडले, तर कधी हे काय काहीतरीच असेही वाटले असणार. पण दोन मिनिटे हे काय? असा विचार नक्कीच मनात आला असणार. विचारांनी विचार करायला लावावे यातच मज्जा आहे.

ख्वाबिदाचा उद्देशच स्वत्वाचा शोध घेणे. प्रत्येक विचारच्या कृतीच्या मागचा प्रवास बघणे, तोही शक्यतो तटस्थपणे, चुक बरोबर, रागलोभ बाजूला ठेवून. हाच होता आणि हाच आहे.

विचारांना स्वप्नं बघायची सवय लागली की ती सवय सुटतच नाही. त्या प्रवासाला शेवट नाही. मजा प्रवासातच. त्यामुळे मन, मेंदू, विचार सगळे आहेत तोवर ख्वबिदा असणारच. पण…

पण इथेच तर ग्यानबाची मेख आहे. प्रवास आहे तर त्यात स्टेशन्स लागणार. एक वर्ष हा असाच एक थांबा आहे त्यातला. विचारानां पुन्हा विचार करायला लावणारा. वाढदिवसाला त्यात काहीतरी वाढ करायला लावणारा.पहिल्यादिवशी व्यक्त झालेल्या प्रश्नांची उत्तरे जरी मिळाली नसली तरी ती कोणत्या रस्त्यावर चालल्याने मिळतील हे तरी कळलेच. या वर्षाने ख्वाबिदाला त्या रस्त्यावर आणून सोडले.आता पुढच्या वर्षात या रस्त्यावर चालले पाहीजे. कोहं-सोहं ची उत्तरे मिळावायला अनेक वाटा असतात. एकच पकडून सतत प्रवास चालूच ठेवला पाहीजे. प्रवासाला तयारी आलीच. हा तर मोठा पल्ला. तो गाठायला तयारीही मोठी. जबाबदारीही मोठी म्हणून त्या तयारीसाठी लागणारा वेळ आज मागतेय. दर शुक्रवारी माझ्याबरोबरीने आज काय? याची उत्सुकता बाळगणार्या सगळ्या सहप्रवाश्यांकडे एक विश्रामाची वेळ मागतेय. परत नक्कीच येणार, पण या रस्त्यावर पुढे कसे चालायचे या विचारासकट.

Being in the arbitrary thoughts has made me Khwabida, but now staying focused in these arbitrary thoughts will make me Khwabida!

विचारांना थांबवायचे नाही, दिशा द्यायची नाही जातील तिथे जावू द्यायचे पण मनाने स्वत:ची जागा सोडायची नाही त्यांचे निरिक्षण करायचे, परिक्षण नाही.यानेच मन रिकामे होत जाईल. Detachment का काय ती शिकता येईल. मग स्वत्वचा पत्ता सापडलाच.मग ख्वाबिदाचा मुळ उद्देश अधिक जवळ येईल. प्रवासाला आणखीन मजा येईल. वाढदिवशी एवढी वाढ झाली तरी पुरे. पण हे करण्यासाठी थोडे थांबते. जीपीएस सेट करते. आणि पुन्हा येतेच. तोवर,

मनात, विचारात ख्वबिदा ठेवूच.

 

-श्रुतकिर्ती

०८/१०/२०२१



माळीये जेऊते नेले। तेऊते निवांतची गेले।

तया पाणिया ऐसें केले। होआवें गा।

- सार्थ ज्ञानेश्वरी

अ.१२ ओवी १२०

Comments

  1. ओह्ह ओह म्हणजे आता आमचा satarday मॉर्निंग टी विथ ख्वाबिदा बंद होतोय तर.

    किती भर्रकन गेल ग एक वर्ष. प्रत्येक शनिवारी एक वेगळा विचार किंवा असं म्हणणं जास्त योग्य ठरेल कि विचार सर्वांच्याच मनात येतात ते विचार पण ते इतके सुंदर रित्या मांडणं खूपच कठीण, ते तू सहज पणे करतेस . तुझे ब्लॉग लेखन आम्हाला बोट धरून विचारानं मधील फरक ,वेगळ्या जागा दाखवत मस्त फिरवून आणत . शांत पणे वाहणारा धबधबा. विचार खूप असतात धबधब्या सारखे तुझ्या ख्वाबिदे कडे पण ते वाचकाकडे शांतपणे पोहोचवले जातात.

    विश्रांती सर्वानाच हवी त्यामुळे पुढच्या कामात फ्रेशनेस येतो,नावीन्य येत . ख्वाबिदा मॅडम, थांबा जरूर पण एक लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या नकळत तयार केलेले तुमचे अनेक फ्रेंड्स तुमची वाट बघत आहेत. तुम्हीच म्हणता ना पुनरागमनायच! तर भेटु लवकरच नव्या फॉर्म मध्ये वाट पाहतोय आम्ही :)

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you DRG,माझाही Saturday Sunday तुमच्या प्रतिक्रिया वाचण्यात छान जायचा.
      शांतपणे वाहणारा धबधबा ही idea भारीय…
      याच पाण्याचा खळखळाट कमी होवून शांत प्रवाह व्हावा याच इच्छेने break घेतलाय .. keeping fingers crossed 🤞

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान