शब्दबंबाळ

 

दिवाळीच्या आसपास दिवाळी अंकांचे वेध लागायला लागतात. काहीतरी वेगळे, नवीन वाचायला मिळावे म्हणून कोणते अंक घ्यायचे याचा विचार मनात सुरू होतो.  सध्या तरी ऑनलाईन वर भागवावे लागतेय. तसाच एक अंक सापडला. वाचता वाचता एक लेख वेगळाच वाटला. विषय काहीतरी मनाची जडणघडण, समाज आणि बरंच इतर काही होता. लिहिला मस्तच होता पण पाचच मिनिटात त्या शब्दांच्या जाळ्यात हरवून जायला झाले. बरेच शब्द परिचयाचे नव्हते, मुख्य म्हणजे अगदी छान मराठीत होते आणि तिथेच ते बुचकाळ्यात टाकत होते.

रोजच्या वापरात त्यातल्या कितीतरी शब्दांना रिप्लेसमेंट करणारे इंग्रजी शब्द वापरल्याने हे शब्द लवकर समजतच नव्हते. दोष अर्थातच वाचणाऱ्याचा, म्हणजे माझा होता पण शिक्का मात्र ‘काय अवघड लेख आहे ‘ असा मारला गेला.

शब्दांच्या मदतीशिवाय अर्थ कळत नाही पण शब्द उमजेनात तर करणार काय ज्या त्या क्षेत्राची स्वतंत्र परिभाषा असते. त्यातील स्वतंत्र शॉर्ट फॉर्म असतात. बाहेरच्या ला ते समजणे अवघड पण म्हणून त्यांचा  वापर चुकीचा तर ठरत नाही ना. Jargon’s वापर कामासाठी करणे आणि छाप पाडण्यासाठी करणे यात फरक आहेच. पुन्हा पुस्तकी भाषा आणि बोलीभाषा यातही फरक आहे. आपलीच मातृभाषा परकी वाटू लागेल इतकी विविधता मराठीतही आहे. ज्ञानेश्वरी हातात घेतल्यावर यांमधील शब्द लोकांना सोप्या भाषेत गीतेचा अर्थ सांगायला वापरलेत हे प्रथम पटेचना, सोपे शब्दच अर्थ कळायला अवघड होते. त्यातील शब्दांचे अर्थ फुटनोट मध्ये असतात. त्यावरून  संदर्भ लागायचा. मग हा काय शब्दछळ  म्हणायचं का? मुळीच नाही . काळाप्रमाणे भाषा बदलली आणि ती वापरणारे ही बदलले म्हणून सोपे अवघड ही बदलले.

वर्षानुवर्ष कार्यालयीन आणि व्यवहाराची भाषा इंग्रजी असूनही समोरच्याच्या स्लॅंग समजून घेताना क्षणभर विचार करावा लागतोच.

काही लेखक  आणि त्यांचे लेखन गुढ वाटते कारण शब्दांचा वापर. साधेसरळ लिहिणे आणि अलंकारिक यात फरक आहेच. ग्रेस, जी. ए. कुलकर्णी एकदा वाचून उमजतच नाहीत. एका एका वाक्यावर, एकेका शब्दावर ठेचकाळत,  थांबत, विचार करतच गाडी पुढे जाते. पण त्या त्या प्रसंगाचे भावनांचे वर्णन करण्यासाठी तेच शब्द चपखल असतात. काहीवेळा सोपे साधे शब्द टाळायची ही गरज असते. भरजरी विशेषणे न वापरता इतिहास रचायचाच कसा? बखर, पोवाडे वाचतानांस्फुरण चढायला शब्द ही तसेच हवे तिथे मग मवाळ, साधेपणाचे कामच नव्हे.

तरीही काही वेळा गाडी शब्दातच अडकते, अर्थ पोहोचवण्याचे ते साधन, माध्यम आहेत हे विसरुन त्यातच बुध्दी फिरत राहते. मग घडतो  नुसता शब्दछळ, शब्दांचा चकवा आणि लिखाण होते शब्दबंबाळ. शब्दांच्या जाळ्यात अडकून अर्था पर्यंत पोहोचतच नाही आपण. मोजून मापून , तोलून शब्द वापरताना मुक्तछंदातही काही अर्थ सापडतो आणि तोच तर शब्दांचा उद्देश असतो.

हे सगळे खरे पण त्या दिवाळी अंकातील लेखाचे करू काय?  लेखाला शब्दबंबाळ ठरवण्याआधी माझाच शब्द संग्रह समृद्ध व्हावा असाच प्रयत्न सदैव चालू राहिला पाहिजे तरच मग तुकोबांचे शब्द नुसते मेंदूलाच नाही तर मनालाही पटतील,

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ।

शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ।।1।।

शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन ।

शब्द वाटू धन जन लोका ।।2।।

तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव ।

शब्देंचि गौरव पूजा करू ।।3।।



- श्रुतकिर्ती

०३/१२/२०२१

Comments

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान