लोणचे

 

फायनली उन्हाळा आलाय. पाऊस घेऊन आलाय. कोणतीही वस्तू,प्रसंग, ठिकाण एकटे कधी येतच नाहीत. आठवणी हातात हात घालून येतातच. उन्हाळा आणि सुट्टी, आंबे, पत्ते, प्रवास या सगळ्या नोस्टॅल्जियातून  बाहेर येणे अवघडच.

 त्याच आठवणींच्या खजिन्यात एक मोठी बरणी असते, चिनी मातीची. कापडाचा दादरा बांधलेली. कधी साखरांब्याची तर कधी लोणच्याची. आजची माझी लोणच्याची होती. तीही कैरीच्या. करकरीत फोडी, लाल, पिवळ्या , पांढऱ्या मसाल्याची अंघोळ केल्यावर जशा दिसतात ते शब्दात सांगणे फार अवघड. मनातल्या मनात एक फोड जिभेवर ठेवली की सगळे शब्द तोंडाला सुटलेल्या पाण्याबरोबर गिळुन टाकायचे. कैरी बरोबर आणखीन किती प्रकारची लोणची असतात. सगळीच चटकदार पण मुख्य मान कैरी चाच. त्यामुळे उन्हाळ्या बरोबर पावसाच्या एक दोन सरींबरोबर ती आठवण न येणे अवघडच, आणि त्या आठवणी चे करायचे काय? त्यांचे लोणचे घालू शकत नाहीना. त्या मनात इतक्या मुरल्या आहेत की, कैरी दिसली रे दिसली की पाय भाजीवाल्याकडे वळतातच.

 त्यानिमित्ताने आईला एक फोन होतो. मसाला करायचा का आयता आणायचा यावर एक चर्चासत्र. मग सोपा तर आहे हातासरशी करून टाकू या उसन्या आत्मविश्वासावर एकेक स्टेप पुढे जात छानशा काचेच्या बरणीत ते लोणचे कधी जाऊन बसते ते कळतही नाही. ताजा खार बाजूला काढून तो खावूनही होतो आणि बरणी कडे बघता बघता वर्तमानात हात चालवणारे मन पुन्हा भूतकाळात चक्कर मारायला निघते. आधीच्या आठवणी मध्ये बरणी होती, लोणचे होते, कैरी होती चवही बरीचशी सारखी होती. पण करणारी वेगळी. तेव्हा खातांना नुसती मजा होती. आता मात्र मिठाचा अंदाज, बरं लागतंय ना याची उत्सुकता.

 तोही अनुभवच हाही अनुभवच. समर्थ रामदासांनी दासबोधात एका ठिकाणी, माणूस अनुभवावाचून एक क्षणही राहू शकत नाही. अनुभवात अनंत ज्ञेयवस्तू शिरतात, त्यांची योग्यता ठरवून त्यातील सर्वोत्कृष्ट शोधणे म्हणजे परमार्थअसे लिहिले आहे.

आजच्या अनुभवात लोणचे, बरणी, कैरी, भीती, उत्सुकता, चवआनंद, उत्साह ,मेहनत असंख्य भाग होते. पण समर्थांचे लक्षात ठेवायचे, थोडेफार अंमलात आणायचे तर कशी ठरवू योग्यतेची उतरंड? मेंदूला क्रम ठरवताना त्रास होतो. मन मात्र पटकन उत्तर देते. दोन्ही वेळा लोणचे समोरच्याला खायला देऊन त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघणेच सर्वोत्तम होता. लहानपणी समोरच्याच्या चेहर्यावर पाहिला होता. आज स्वतः अनुभवला होता.

आता तो डोळे झाकून लक्षात राहणार होता. पुढच्या उन्हाळ्यात पुन्हा कैरी दिसली की लोणच्या बरोबरच या आनंदासाठी ही ती घ्यावी वाटणार होती. असंख्य ज्ञेयअनुभवातला एक भाग बनण्यासाठी.



-श्रुतकिर्ती

१०/१२/२०२१

Comments

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान