वेव्हलेंग्थ

 

रेडिओचे नवीन स्टेशन कळले, दिवसभर गाणी वाजणारे. ओघानेच ते शोधायला AM/FM विचारले आणि त्याबरोबरच एक आकडा कळला. रेडिओ स्टेशनची वेव्हलेंग्थ दाखवणारा. माझ्या रेडिओचा काटा त्या फ्रिक्वेन्सीशी जुळला की मला गाणे ऐकायला मिळणार होते. नाही तर नुसती खरखर.  तसूभर इकडे किंवा तिकडे होवूनही फायदा असणारच नव्हता. वेव्हलेंग्थ जुळावी लागणार होती न पेक्षा जुळवावी लागणार होती.

मग काय मेंदुला खेळ मिळाला. अशा जुळलेल्या आणि खरखर अलेल्या wavelengths शोधायचा. नक्की काय शोधायचे होते? मनाची एक  जडणघडण माझ्या होती, तशीच ती समोरच्याच्याही होती. एक built-in मेंटल कॉन्स्टिट्यूशन होते. माझ्या मेंदूतल्या लहरींचे प्रतिबिंबच मी दुसरीकडे शोधत होते. 

नुसत्या माणसाच्याच मेंदूशी नाही तर, जगातल्या प्रत्येक वस्तूशी, प्राण्याशी, घटनेशी मी माझी वेव्हलेंग्थ तपासून पाहत होते. कधी ती जुळली मग छानच सूर जमले. तर कधी  क्रेस्ट आणि ट्रफ कानठळ्या बसवून गेले. काहीवेळा बघताक्षणी तर काहीवेळा प्रयत्नपूर्वक कष्टाने ओढून ताणून.

 सगळ्याच वेळी त्यातल्या दोन्ही बाजूंच्या प्रयत्नांवर ते अवलंबून होते. रेडिओ स्टेशनचे ब्रॉडकास्टिंग बंद असताना मी कितीही प्रयत्न करून स्टेशन लागणार थोडीच होते.  समोर दुसरी वेव्हलेंग्थ  असणारा मनुष्य असेल तर त्यालाही हे प्रतिबिंब शोधायचेच असणार. त्याची ही वेव्हलेंग्थ सदैव बदलत असणार. मग या दोन बदलणाऱ्या वेव्हलेंग्थ कधीतरी काही काळापुरत्या जुळू शकतातच की. काही बाबतीत शंभर टक्के पटणार्याशी देखील इतर वेळी दुमत होतेच. कारण मानवी मेंदूचे सदैव बदल करत राहणे. मग हे कळूनही agree to disagree’ वळायला वेळ  का लागतो?

सदैव प्रतिबिंब शोधण्याच्या खेळामुळेच. मनाचे प्रत्येक क्षणाला स्वतःला शोधत असण्याच्या स्वभावामुळेच. साम्य शोधणे आणि शोधले, सापडले कि ते घट्ट पकडून ठेवणे या सवयी मुळे. ‘समानशीलेशू मित्रता’ म्हटलेले खरे असले तरी काय हरकत तसे न घडायला?

 आपल्यातले बिंब, मन आणि बुद्धी यांचा सदैव वापर करत प्रतिबिंब शोधत असते. सापडले की त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करते.  घनदाट जंगलात,  शांत समुद्रकिनारी, पर्वताच्या टोकावर हेच तर मिळते.

 मग त्यात हरवून गेले कि बिंबाचा, प्रतिबिंबा चा शोध संपतो. मग उरते केवळ एक अवकाश. नाव नसलेले. आपल्या भाषेत वेव्हलेंग्थ जुळलेले. इतके हरवून गेलेले की वेगळे अस्तित्वच न उरलेले. एक्झॅक्ट फ्रिक्वेन्सी मॅच झालेले हे अवकाश म्हणजेच अद्वैत का?

हा प्रश्न पडला कि ते हरवलेपण, हरवून जाते. जुळलेली वेव्हलेंग्थ तुटते. त्यापेक्षा  जोवर वेव्हलेंग्थ जुळली आहे तोवर गाणे ऐकावे. स्टेशन हलले कि पुन्हा जुळवाजुळवी. पुन्हा बिंब-प्रतिबिंब आसा खेळ आणि पुन्हा द्वैतातून अद्वैताचा शोध चालूच.

- श्रुतकिर्ती

१७/१२/२०२१




माझ्या तुमच्या जुळता तारा

मधुर सुरांच्या बरसती धारा...

Comments

  1. Wavelength अद्वैतापर्यंत यात्रा and back!!!! हे तूच लिहू जाणे!! छान 👌😇💕 ~~ कल्याणी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान