कोळ्याचे जाळे

 

 दोन तीन दिवसापूर्वी कोळ्याच्या जाळ्याचे छान छान आर्टिस्टिक फोटो पाहिले आणि मलाही जिकडेतिकडे अचानक कोळ्याची जाळी दिसायला लागली. ऊन-पावसाचा खेळ सुरू झाल्याने तसेही कोळी अंगणात दिसायला लागले होते. पण अंगणापेक्षा घराच्या एखाद्या चुकार कोपऱ्यात जाळे दिसले रे दिसले कि ते, सुंदर आहे का ते विणणारा कोळी कुठे आहे?  तो निरुपद्रवी का विषारी? तो इकोसिस्टीम मध्ये किती महत्त्वाचा त्याच्या असण्याने काय घडते?  नसण्याने काय घडणार?  यातला एकही विचार मनाला दुरूनही स्पर्श न करता कुंचा हातात घेतला जातो. ते जाळे काढून टाकून कोपरा कधी स्वच्छ करून लख्ख चमकवते, हेच विचार  मनात प्रकाशाच्या गती पेक्षा वेगाने येतात.

मनावर चिकटलेली कोळीष्टके काढावी असे कधी येते का मनात? जाऊदे तो विचार आज न केलेलाच बरा…

पण ही सुंदर जाळी दिसायला लागली आणि एक वेगळेच सुंदर, कोळ्याचे जग दिसले. नाजूक पण चिवट. मोजून मापून पण जलद गतीने भरभर परफेक्शन साधत केलेले काम, भल्याभल्या कलाकाराला आणि यंत्राला लाजवणारे होते.

आणि त्याच दिवशी उपनिषदातील एक ऋचा वाचायला मिळाली , in fact इंग्लिश ट्रान्सलेशन होते.

We are like the spider.

We weave our life

 and then move along in it.

We are like dreamer

Who dreams and then lives in the dream.

 This is is true about entire Universe.

आणि मग घायपाताच्या झाडावर जाळी विणणारा कोळी मीच झाले. तो जाळे विणतो आणि त्यात राहूनच ते वाढवतो. आपणही तेच करतोय पण त्याला त्यातले ओले सुके धागे लक्षात आहेत. झरझर चालताना सहातला एकही पाय त्या ओल्या धाग्यावर चिकटत नाही, भले कितीतरी कीटक त्यात  अडकत असू देत. तो मात्र सुक्या धाग्यांवरून अगदी बॅले करत निघून जातो. जाळे मोठे करायला.

मी मात्र हा ओला का सुका यावर पाय ठेवला की आडकेन का, पुढे जाईन या गोंधळातच पुढे जायचे विसरते का काय?

Move along in it हाच भाग सारखा घडतोय. त्याच त्या आवर्तनात फिरते का काय? एखादे स्वप्न पाहिल्यावर त्यातच अडकून ते पुर्ण करायला धडपडणे,  त्यालाच आणखी मोठे विणत जाणे आणि तिथेच फिरणे चालू राहते. नवा धागा घेऊन नवे जाळे कधी विणायचे?  छोटेसे स्वप्नं, छोटेसे जाळे पूर्ण झाले की ते सोडून नवे झाड नवा कोपरा कधी शोधायचा?  नव्याने जाळे विणायला कधी घ्यायचे?

 कोळ्याचे जाळे कितीही सुंदर असले तरी त्याची धडपड फक्त अन्न  मिळवायला.आयुष्य चालू ठेवायला. जीव वाचवायला. स्वप्न बघणार्‍या माणसाला याहूनही आणखीन काही हवे असते. बरेच काही करायचे असते. नुसती जगण्याची धडपड करायची, तर नक्की तो कोळीच मी.

हे जाणवल्यावर मेंदू आणि मन भानावर येते. माणूस असल्याने मेंदू वापरून ट्रान्सलेशन सोडून ती मूळची ऋचा शोधायला घेते. पण त्याही आधी झटकन कुंच्याने जाळे काढते. मनही  जरा स्वच्छ होते झाडा बरोबरच नव्याने पालवी फुटायला.



-श्रुतकिर्ती

२४/१२/२०२१

Comments

  1. कोळी आणि मानव यांतील साधर्म्य आणि तत्सम जाळ्यात मानवाने न अडकता जागृक राहण्याची गरज या दोन्ही बाबी उघडकीस आणवून देण्याची लेखनशैली, दोन्ही सुंदर. ~ कल्याणी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान