सरते वर्ष

 

आज ३१ तारीख, वर्ष संपणार आणि नवे देखील येणार. मागच्या वर्षीही, त्या आधीही वर्षानुवर्ष हेच चाललेय. तरीही येणाऱ्या वर्षाकडे बघण्याचा उत्साह टिकून आहे आणि जाणाऱ्या वर्षाकडे बघत, जमाखर्च मांडायची सवयही.

माणसानेच दिवस रात्री, चंद्र सूर्याकडे बघत आठवडा, महिना, वर्ष या संकल्पना तयार केल्या आणि त्या मानून त्या बरहुकूम आयुष्य बेतले. ते बदलले कि अस्वस्थता, वैताग, निराशा सगळे पटकन येते. गेली दोन वर्षे हे सगळे जास्तच जाणवतेय. जवळच्यांना भेटायला सुद्धा इतका विचार, इतका प्लांनिंग आणि त्यानंतरही निर्णय आपल्या हातात नाही याची हतबलता. भौगोलिक अंतर किती लांब असते याची जाणीव, ते पार करावेच लागते वेळेला मनात अंतर नसले तरी याची बोच रोजच होत होती. गृहीत धरलेल्या घटना, वस्तू, प्रसंग या कडे विचारपूर्वक पाहायलाही याच वर्षाने शिकवले. किती प्लॅन ठरले आणि मोडले. काही वेळा दिवस, आठवडे संपत संपले नाहीत तर काहीवेळा, वेळ भुर्रकन उडून गेला. 'I trust you are well.' किंवा 'I'm fine hope the same at your end' हि formality अगदी formally लिहितानाही या वर्षीच हात थरथरले. आजचा क्षण महत्वाचा, आजचा आनंद महत्वाचा, या क्षणात राहणे म्हणजे काय याचे हि महत्व याच वर्षाने समजावले. गृहीत धरलेल्या असंख्य गोष्टींबद्दलची आणि माणसांबद्दलची कृतज्ञता आत्ताच कळली, न्हवे मनातून पटली.

प्रत्येक क्षणाचे नियोजन आपल्याकडे तयार असते,वेळेवर, प्रसंगावर कंट्रोल करायला उपायही माहित असतात. ते केलेकी आनंद आणि सामर्थ्याची जाणीव होते. हे सगळे किती फुसके आहे ते घरात बसून दिवसेंदिवस घालवताना कळले. रस्त्यावरच्या गर्दीला, आवाजाला नवे ठेवतानाच भकास रस्त्यांकडे पाहूनही नकोसे झाले.

पण या सगळ्याने महत्वाची गोष्ट साधली. आपण किती समाजप्रिय आहोत हे उमजले. ज्या टेकनॉलॉजिने  माणसांमध्ये अंतर निर्माण केले असे म्हणतात तिनेच लांब अंतरावरच्याना बघण्याचे,ऐकण्याचे सुख दिले. बरेच काही नवे करावे वाटू लागले आणि केलेही गेले. घराचा कानाकोपरा ओळखीचा झाला आणि घरातला प्रत्येकजण नव्याने भेटला.

परिस्थिती कोणतीही द्या माणूस त्यावर मात करायला शिकतोच, फक्त थोडा वेळ जावा लागतो. तेवढा धीर धरावा लागतो. वर्षाने आपल्याला काय दिले या बरोबरच मी या वर्षाला काय दिले, त्यातल्या ३६५ दिवसांना काय दिले याचाच जमाखर्च मांडावा हे तरी निदान या वर्षाने नक्कीच शिकवले.

मेंदू आणि तोही प्रगल्भ असल्याने प्रत्येक परिस्थिती ताब्यात ठेवावी हि मानवी मनाची अपेक्षा असतेच, गेल्या दोन वर्षात आपल्या पानाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य गेल्यावर उडालेला गोंधळ त्यामुळेच होता. पण परिस्थीतीवर मात करण्याचा चिवटपणा अंगी असल्याने हळूहळू का होईना पुन्हा पूर्वीसारखे न्हवे पूर्वीपेक्षा चांगले सुरळीत होणारच. या दोन वर्षांनी मेंदूला, मनाला आणखीन तयार केलय अनपेक्षिताची अपेक्षा करायला. आणि मग नवा दिवस, नवा महिना, नवे वर्ष आनंदाने येणार आणि आनंदातच जाणार!

- श्रुतकिर्ती

३१/१२/२०२१



 

समुद्रादार्णवादधि

संवत्सरो अजायत |

अहोरात्रणी विदधद

विश्वस्य मिपतो वशॊ ||

From the ocean and its waves

Then the year was generated -

Appointer of the days and nights.

Comments

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान