विसर

 


दिवस संपत आला. उन्हाळ्यामुळे अंधार उशिराच झाला. विजेच्या दिव्याबरोबरच सवयीने देवापाशी दिवा लावला. अगदी सवयीने हात जोडले गेले. आणि रोजचीच रामरक्षा म्हणताना मेंदूची सुई अडकली. काही केल्या पुढचा शब्द आठवेना. हजारो शब्द, चित्र डोळ्यापुढे नाचत होती पण योग्य तो काही पुढे येईना. त्याचा पार विसर पडला होता. यथावकाश तो सापडला पण काही क्षणासाठी अगदी रोज वापरातला तो शब्द पार विसरला गेला होता.

कारण काही नाही म्हणजे असेलही पण कळण्यापलीकडे आत्तातरी. सध्या सोप्या भाषेत मला आठवत न्हवते. विचार केला तर नुकसान काय झाले, काहीच नाही पण एखादी गोष्ट आठवत नाहीय यानेच ती आठवेपर्यंत मन कुरतडले होते. मनाला गोष्टी विसरायची सवय असते, न आवडणारे ते बरोबर विसरते सतरा आणि एकोणिसच्या पाढ्यासारखे. पण लक्षात ठेवायचे कामही ते तेवढ्याच तत्परतेने करते. शंभर वेळा हे विसर ते विसर सांगूनही खडा न खडा लक्षात ठेवते. गडबड होते मेंदू विसरायला लागला की.

मध्ये कुठेतरी वाचले होते, नदीने कितीही वाटा बदलल्या तरी तिच्या जुन्या वाटा तिला पाठ असतात. ' Memories of rivers run deep.'आपलेही असेच असेल का? वरवर खपली धरलेल्या जखमा आत भळभळत असतातच. साफ विसरले/विसरलो हे पूर्ण सत्यासारखेच खोटे वाटते. विसरणे म्हणजे नजरेआड करणे, मनात वेगळ्या कप्प्यात ठेवणे, माहीतच नाही किंवा न्हवते अशी मनाची समजूत घालणे. कधी कधी ती समजूत इतकी छान पटते कि आपल्याला हे विसरत विसरत लक्षात ठेवायचे होते याचाच विसर पडतो. एखादी गोष्ट वारंवार सांगितली कि तिचा परिणाम बोथट होतो, निकाल अपेक्षित लागत नाही. मेंदूने मनाला सारख्या सूचना दिल्या कि ते गोंधळते आणि मग सुरु होतो आठवणींचा लपंडाव. कालचे आठवत नाही पण अठराशे सत्तावनच्या घटना ताज्या असतात. दोष मनाचा नसतोच, मेंदू जरा जास्तच हुकूमशाह बनलेला असतो.

भान हरपून सभोवतालाचा विसर पडावा असे कित्येक अनुभव असतात. हात, कान, जीभ, डोळे यांच्या जागरूकतेपलीकडचे मन एका विसरलेल्या जगात पोहचलेले असते आणि त्या वेळी रूढार्थाने जे लक्षात राहायला हवे त्या सगळ्याचा विसर पडलेला असतो. हि अशी तंद्री लागणे हेच तर मेडिटेशन ना. कोणत्या क्षणी, काय बघून, काय स्पर्शून कशाचा वास घेऊन जगाचा विसर पडेल हे कुणास ठावे. हे भान हरपण्याचे क्षणच भानावर असतानाच्या क्षणांना मोठे बळ देतात. विसरणे आणि विसरलेले आठवणे या खेळातच रोजचे जगणे पुढे जात राहते. असंख्य गोष्टी विसराव्यात याची रोज मनापासून इच्छा होत असताना आठवत मात्र राहतात आणि राहोतच; विठ्ठलाचा मनापासून आळव करणारे तुकोबा...

 " हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा" म्हणताना.



 

- श्रुतकिर्ती

०८/०१/२०२२

Comments

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान