पाळंमुळं

 

रवींद्रनाथ टागोरांचे साहित्य  गीतांजली आणि रवींद्रसंगीत डोळ्यापुढे येते आणि हे इतके अवघड कधी आणि कसे वाचायचे आणि समजायचे म्हणून बाजूला टाकले जाते. काही दिवसांपूर्वी एक कविता सापडली. काहीतरी वेगळेच शोधताना, 'आमोदेर छोटो नदी' 'our little river' तिसरी चौथीला शिकविली जाणारी ही कविता उगीचच आवडली आणि विषय तिथेच संपला. त्यातली छोटीशी कोपोई नदी मात्र मनात मनात खोलवर दडून बसली.

ब्रिस्बेन शहर ज्या नदी काठी वसलंय ती ब्रिस्बेन नदी ओलांडायची वेळ जवळजवळ रोजच येते. पण तिचा विचार करायची वेळ कधी आलीच न्हवती. कोपोई बद्दल जेव्हा रवींद्रनाथ सांगतात, एका खऱ्या जिवंत नदीचे रोजचे जगणे दाखवतात तेव्हा डोळ्यापुढे एक चित्र रेखाटले जात असते. सतत बडबड करीत अवखळपणे धावणारी कोपोई त्यांना संथाल कन्येची आठवण करून देते. आटलेली असताना त्यात खेळणारी मुले तर पाणी असताना त्यात वाढणारे धान. सगळे शब्द डोळ्यापुढे काहीतरी आणतात. रवींद्रनाथांच्या कवितांत, गोष्टीत नद्यांचं नद्या गंगा, पद्मा, यमुना, इच्छामती, साबरमती आणि त्यांची लाडकी कोपोई. वर्णन वाचताना जे मनात येत होते त्यात या नद्या कुठेच न्हवत्या. कशा असणार? त्या मी पाहिलेल्याच न्हवत्या. कवीचे शब्दसामर्थ्य खूप मोठे पण डोळ्यापुढे येणारे चित्र अनुभव विश्वातलेच. डोळ्यापुढे येत होती असंख्यानी नावे ठेवलेली पुण्यातली मुळा-मुठा, वर्षातले अनेक महिने कोरडी असणारी भीमा, चंद्रकोरीचा आकार आणि नाव मिरवणारी चंद्रभागा (भीमा), रेल्वेतून जाताना विस्तीर्ण पात्र दिसणारी गिरणा आणि दरवर्षी पूर येणारी गोदावरी. कवितेच्या वर्णनात आणि माझ्या दृश्यात काही एक साम्य न्हवते पण मनावर याच कोरलेल्या होत्या आणि आहेत.

सुंदर स्वच्छ, वळणावळणाची ब्रिस्बेन नदी देखील रोज दिसत असूनही बंद डोळ्यांना दिसलीच नाही. कां?  रवींद्रनाथांची पाळेमुळे जिथे जिथे रुजली होती त्याचे वर्णन त्यांनी केले. त्यांना रोज तेच दिसत होते , तेच ते अनुभवत होते आणि ते त्यांनी लिहले होते. आजच्या जगात मुळगाव सोडून अनेक ठिकाणे पालथी घालणाऱ्या भटक्यांच्या मात्र रोजच्या दृश्यात आणि डोळे मिटल्यावरच्या जगात फरक असतो. ब्रिस्बेनच्या पात्रातून प्रवास करतांना शब्द कोपोईचे आणि मनात उमटणारे भाव मुळा-मुठेचे असतात. म्हणाल तर अनुभव विश्व समृद्ध झाले. विचार केला तर भावनांचा गुंता झाला. एवढे मात्र कळले, स्वप्नातली नदी ती, जिच्या काठांवर अनुभवाने जगणे समृद्ध केले होते, पाळेमुळे अनुभवांच्या मातीत रुजली होती. डोळे उघडून नव्या नदीबरोबरचे अनुभव मनात साठवले की मुळे तिथेही घट्ट रुजतातच. नदीची जमीन सुपिकच, मुळांनी मनावर घ्यायला मात्र हवे रुजायचे.








- श्रुतकिर्ती

१४/०१/२०२२

Comments

  1. मुळांचा स्वभाव रुजणे हाच आहे. सुपीक माती नि छान वातावरण मिळाले कि असं होताच नाही की ते रुजत नाहीत. पण हे रुजणं कधी नोटीस होत नाही .... फक्त आपण जेव्हा त्याची जागा बदलायला जातो तेव्हाच आपल्याला कळत कि किती घट्ट रुजली आहेत ती. जस एखादी गोष्ट सोडताना आपल्याला त्याची किंमत कळते ....

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरयं, मुळे सरळ साधी एकमार्गी.. आपणच लक्ष द्यायला चुकतो खरे..

      Delete
  2. मुळांचा स्वभाव रुजणे हाच आहे. सुपीक माती नि छान वातावरण मिळाले कि असं होताच नाही की ते रुजत नाहीत. पण हे रुजणं कधी नोटीस होत नाही .... फक्त आपण जेव्हा त्याची जागा बदलायला जातो तेव्हाच आपल्याला कळत कि किती घट्ट रुजली आहेत ती. जस एखादी गोष्ट सोडताना आपल्याला त्याची किंमत कळते ....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान