चाफा फुलला

 


गेली चार-पाच वर्षे माझ्याकडे एक चाफ्याचे झाड आहे. मला भेट मिळालेले. त्यानंतरही झाडे लावली, त्याआधीही. पण हा चाफा काही फुलेना. आधी कुंडीत, मग मातीत. सगळे झाले. खत पाणी घाल, घालू नको, सल्ले मिळाले-ऐकले. दर उन्हाळ्यात फुलेल फुलेल करत त्याने ऐनवेळी घोटाळा केलाच. बागेतला एक छानसा कोपरा त्याने कधीचा आडवलाय, असे आता उगाचच मला वाटायला लागले. मनापासून आवडणारे ते झाड हळूहळू दुर्लक्षिले जायला लागले. त्यातच दुसऱ्या जेमतेम सहा महिन्याच्या रोपाला फुल आल्यावर मन जरा खट्टू झाले.

 माझी एक मैत्रीण आहे फुलपान वेडी. तिच्या हातात जादू आहे. ग्रीन थंब नाहीतर अख्खा ग्रीन हॅन्डच आहे तिचा. बोलता बोलता माझा संपलेला पेशन्स तिला जाणवला. थांब थांब सांगूनही मी ते झाड काढणार असे वाटल्यावर तिने मी येईस्तोवर थांब, असा अल्टिमेटम दिला. आठ दहा दिवसांनी ती आली, तोवर मी त्या झाडाकडे साफ दुर्लक्ष केले होते. ती आली, अंगणात गेली आणि अगं येणार फुल त्याला, काढू नको, करतच परत आली. खरंच आठवड्यात कळी दिसली आणि फूल उमलले. काय जादू केली तिने काय माहित. नक्की  चाफ्यावर केली का माझ्यावर काय माहित. पण माझा लाडका चाफा मला परत मिळाला.

 फुलला आणि असंख्य आठवणीं सगट फुलला. तो भेट देणारे चेहरे, भेट देतानाचा - घेतानाचा आनंद, लावल्यानंतरचे फुटलेले प्रत्येक नवे पान, कुंडीतून जमिनीत लावतानाची धाकधुक. नव्या जागेत रुजावे, फुलावे म्हणून मनाने घेतलेला ध्यास. त्यासाठीचे सगळे उपाय आणि नंतर आलेली थोडीशी निराशा. सगळेच झरझर डोळ्यापुढून गेले. छोट्या छोट्या घटनांशी ही मन किती आणि कसे घट्ट जोडलेले असते त्याची जाणीवही  चाफ्याने करून दिली.

 एक साधेसे छोटे रोप, पण चार-पाच वर्षे किती घटनांचे साक्ष होते. मनाच्या किती घडामोडींचे कारण होते. फुल पाहिले आणि पुन्हा मनाचा तळ चाचपडला. मी खरंच ते रोप उपटले असते? प्रामाणिकपणे विचार केला तर नसते. त्याला फुल आले नाही म्हणून नाराज झाले होते खरे, पण तोंडाने म्हटले तरी भेट मिळालेले झाड उपटून टाकण्याचा दुष्टपणा करवला नसताच बहुदा. तो मनात आला होता खरा, पण योग्य वेळी तो विचार थांबवायला ही कोणीतरी मिळाले होतेच.

 भेट देणारेही मैत्रच होते, अयोग्य करण्यापासून थांबवणारे ही मैत्रच. फायदा दोन्ही वेळी माझाच झाला होता. यावेळी तर जन्मभरासाठी, माझा चाफा नुसता अंगणात नाही तर मनातही भरभरून मैत्रीच्या फुलांनी फुलला होता.

 -श्रुतकीर्ती

२१/०१/२०२२




चाफा बोलेना, चाफा चालेना

चाफा खंत करी, काही केल्या फुलेना

चाफा बोलेना, चाफा चालेना

चाफा खंत करी, काही केल्या फुलेना…

-कवी बी

Comments

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान