कोण कुठले...

 

काल अनिल अवचट गेले आणि माझ्यासारख्या असंख्याना, ज्यांनी त्यांना नुसतेच चित्रात पहिले होते, पुस्तकात वाचले होते, खरंच मनापासून वाईट वाटले.

कितीतरी जण असतात असे. कुठेतरी वाचून, ऐकून, बघून आपलेसे वाटायला लागलेले. जवळच्यांहुही जवळचे झालेले. ते कधी ओळखणारही नसतात. पण ती अपेक्षाही नसतेच ना. पहिल्यांदा कधीतरी त्यांचे लिहलेले, बोललेले वाचतो ऐकतो आणि भारावल्यासारखे सगळेच वाचायला ऐकायला लागतो. काही जणांच्या बाबतीत हे भारावलेपण क्षणिक असते तर काहींचे जन्मभर पुरते. कां एवढे भारून जातो? अगदी फॅन क्लबचे मेंबर होतो? बऱ्याचदा आवडणारे, करावेसे वाटणारे पण न जमणारे, न झेपणारे ते करत असतात. त्या वाटेवरचा एखादा तरी पाडाव चालायची इच्छा असते मग जमो किंवा न जमो. तर काही वेळा या सगळ्याच्या पलीकडे मनाला काहीतरी क्लिक झालेले असते जे मेंदूला उलगडून दाखवताही येत नाही.

हे सगळे लोक काय खातात पितात? कुठे राहतात? रोज काय करतात? घरच्यांशी कसे वागतात? या सगळ्याशी काही देणे घेणे नसते. किंबहुना ते असूच नये. ते असेल तरच अनैसर्गिक. आपल्याला आवडतो तो एखादा गुण, एखादी कला. त्या क्षेत्रातले नाणे खणखणीत असेल तर पदरी कधी निराशा येत नाही नाहीतर या जगात अनेकांचे पाय मातीचे निघतातच.

हे भारावलेपण करते काय? जगण्यातला आनंद शोधून देते, काहीतरी करायला निमित्त होते, रोजच्या चार भिंतीबाहेरचे जग दाखवते. दुःखात, संकटात, एकटेपणात सगळ्यात काहींना काही, कोणीना कोणी बरोबर असल्याची जाणीव करून देते. पाहिजे तेंव्हा साथीला सोबतीला येते. न शिकवताही बरंच काही शिकवते. कायमस्वरूपी बरोबर राहते.

जगरहाटीप्रमाणे एक दिवस शेवटचा असतोच. मनुष्यस्वभावाप्रमाणे दुःख होतेच. काळ पुढे चालत राहतो. पुन्हा कधीतरी आपण पुस्तक उघडतो, गाणे ऐकतो, चित्र पाहतो. हरवून जातो. पार विसर पडतो, ते कोणीतरी या जगात आहे का नाही याचा. मुळात त्या अस्तित्वाशी नाते  जोडले गेलेलेच नसते. भारावलेपण असेच असते. कोण कुठले कोणीतरी जन्मभर सोबतीला देते, असतानाही नसतानाही. 

 

- श्रुतकिर्ती

२८/०१/२०२२



Comments

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान