फोटोतला आनंद

 

एखाद्या वर्किंग डे ला डब्यातले जेवण संपवून फोन उघडला की सोशल मीडियावर कोणी ना कोणी छान छान पदार्थांचे फोटो टाकलेले असतात, आणि पाच मिनिटात यातले काय काय करावे? जमेल का? कच्चे सामान आहे का? असले सगळे प्रश्न डब्यात जर काही बोरिंग काही असेल तर ते विसरायला लावतात.

काल असेच झाले. व्हाट्सअँपच्या ग्रुपवर कोणीतरी अप्पे, चटणी सांबार असा सुंदर दिसणारा ब्रेकफास्ट पोस्टला होता. फोटोतुनच पदार्थ झक्कास जमला हे  जाणवत होते. फोटोतून हातात येणार नसला तरी चित्रातल्या अप्प्याची चटणीत बुडवून खाल्लेली चव मेंदूने साठवलेली होतीच ती चटकन मनाला फॉरवर्ड झाली आणि तोंडाला पाणी सुटले. म्हणजेच जिभेने दाद दिली. झाले दोन मिनिटात पक्के ठरले, आता हा पदार्थ झालाच पाहिजे. पण...

या अशा पदार्थाना पूर्वतयारी हवी ना. आले मनात वाढले ताटात कसे शक्य? मग कोणीतरी सुचवले, इंस्टंटवाले कर ना, मी रेसिपि सांगते. कोणी म्हणाले रेडी बॅटर वापर. एकाने तर ऑर्डर करण्याचे ठिकाणही कळवले. हे ऑपशन्स काही वाईट नसतात. वेळेला सगळेच कामाला येते, पण आज नाही. फोटोने पद्धतशीरपणेच पदार्थ करायला भाग पडले होते. डाळ-तांदूळ भिजण्याचा, वाटलेले पीठ फुगण्याचा वेळ जाऊ द्यावाच लागणारच होता. मनाला तेवढा धीर होताच. रात्री पीठ झाकून ठेवताना आज हवा दमट आहे. पीठ फुगेल न फुगेल असल्या शंका मनात नाचून गेल्याच. तरी होणार होणार असेही वाटतच होते.

आता वाट उद्याची होती. पीठ तयार झाले का नाही? पदार्थ कसा झाला? हा भाग अलाहिदा पण कोणा ओळखीच्याने मी आज हे खाल्ले, ते मला आवडले, मी किंवा माझ्या घराच्या सदस्याने ते माझ्यासाठी केले या कौतुकात सामील करून घेण्यासाठी ते फोटोरूपात पुढे पाठवले होते. स्वतःचा आनंद वाटला होता. पोट भरलेले असतानाही त्या आनंदाने मनातली भूक जागी केली होती. पेशन्स ठेवून तो तयार करण्याची वाट बघण्याची संधी दिली होती. शेवटी मी केलेला पदार्थ फोटो काढून परत त्या व्यक्तीला किंवा कुणालाही पाठ्वण्यालायक झाला का नाही ते महत्वाचे उरलेच न्हवते. त्या दीडदीवसात मनात जे काही येऊन गेले तो प्रवासच महत्वाचा ठरला होता. हे छोटे छोटे प्रवासाचं तर जगण्याच्या मोठ्या प्रवासाला मजेशीर बनवत होते समृद्ध करत होते.

समोरचा त्याच्या मनात काहीतरी योजून एखादी कृती करतो. आपले मन स्पंज सारखे त्यातून बरेच काही शोषून घेते अर्थात आपल्याला हवे तेच उरते बाकी निथळून जाते. शेकडो फोटो बघून सोडून देणाऱ्या मेंदूला किंवा मनाला हाच का आवडला हे अनाकलनीय आहे. बहुदा तो पदार्थ करणाऱ्याच्या मनातला आनंद दुसऱ्या आनंद शोधणाऱ्या मनापर्यंत थेट येऊन पोचला होता.

 


- श्रुतकिर्ती

०४/०२/२०२२

 

Comments

  1. किती वेगवेगळ्या यात्रा घडवतेस ग Miss ख्वाबिदा. नदी काठचा प्रवास, मन स्वच्छ करण्याचा प्रवास ,आयुष्यातील निरनिराळ्या टप्प्यातील प्रवास आणि आता हा दिड दिवसाचा खाऊचा प्रवास. आता जेव्हा मी कुठला फोटो बघून पदार्थ कारेन ना तेव्हा मी हि विचारांची journey नक्की एन्जॉय कारेन. :)

    ReplyDelete
    Replies
    1. निघालोच आहोत प्रवासाला तर सगळ्याच प्रकारचे करून बघूया😁 मलाही कधी माहीत नव्हते हे पदार्थांचेफोटो इतके फिरून आणतात ते.
      Glad you enjoyed itDRG😍

      Delete
  2. शेकडो पोस्ट वाचून सोडून देणाऱ्या मेंदूला किंवा मनाला हीच पोस्ट का आवडली हे अनाकलनीय आहे असं मी अजिबात म्हणणार नाही कारण मी खवैया आहे ☺️ .
    बाकी हा ब्लॉग उत्तम जमलाय
    साहित्य, कृती, पदार्थ आणि त्याला असलेलं तुझ्या विचारांचं ड्रेसिंग
    नक्कीच तो पदार्थ करणाऱ्याच्या मनातला आनंद दुसऱ्या आनंद शोधणाऱ्या मनापर्यंत थेट पोचवतोय.

    तळटीप- पुढच्या वेळी कुणीतरी सीफूड चा फोटो टाका रे , स्वर्ग आहे तो

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you,वाचल्याबद्दल आणि आवडल्याचे कळवल्याबद्दल धन्यवाद.
      ता. क. बघून आनंद वाटेल,नंतर तो फोटो डिलीट होईल.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान