स्वप्न

 

टोमॅटोच्या झाडाला फुले येऊ लागली आणि मला रोज छोटा टोमॅटो शोधायचे खूळ लागले. एक दिवस त्या पानांनी, फांद्यांनी, हिरव्यागार झालेल्या वाफ्यात दोन इटुकले टोमॅटो दिसले. म्हणजे मला एकटीलाच दिसले. आनंद पोटात माझ्यामाईना या गतीने घरादाराला बातमी पोचली. दोन प्रेक्षक कुतूहलाने बागेत आले. छ्या! ते टोमॅटो गुल. शोधाशोध झाली थोडीफार आणि निष्कर्ष निघाला, तुला स्वप्नात दिसले असणार. चोविस तास डोक्यात तेच चालू होते ना तुझ्या.

टोमॅटो होते का नव्हते, तो भाग वेगळा. पण मी माझ्याच स्वप्नांकडे पुन्हा बघायला लागले. मानसशास्त्राचा अभ्यास शून्य. त्यामुळे माझे लॉजिक माझ्यापुरते लागू होणारे. विचारच जर स्वप्नात दिसत असतील तर फरक काय विचारात आणि स्वप्नात? तसेही स्वप्नातले सत्यात आणि सत्यातले स्वप्नात आणायला विचारांचे माध्यम लागतेच. सर्वसाधारणपणे स्वप्न पडतातही कोणती? जवळची माणसे, आवडत्या घटना, वस्तू, जागा किंवा याच सगळ्या गोष्टी, पण नावडत्या. कधी घाबरवणारी स्वप्ने तर कधी रडवणारी, कधी आठवुन नंतरही हसू उमटवणारी. कधी तुटक तर कधी लांबलचक, ब्लॅक अँड व्हाईट कधी तर मल्टी कलर कधी. हेच सगळे विचारांच्या बाबतही घडतेच कि. बंद डोळ्यांनी नकळत पाहिलेली तर कधी लख्ख उघड्या डोळ्यांनी दिवसाढवळ्या मनात साठवलेली. प्रत्यक्षात सहजपणे रोज घडणाऱ्या घटना दाखवणारी तर कधीही न घडणाऱ्या गोष्टी केल्याचा भास निर्माण करून, आनंद वा दुःख पदरात टाकणारी. बंद डोळ्या आडची वर्चुअल रियालिटी नुसत्या डोळ्यांआडचीच नव्हे, तर काही वेळा गच्च दार लावून कुलूप ठोकलेल्या बंदिस्त मनाआडची  देखील.

 काय करावे, कसे वागावे, कसे जगावे याला जगाचे नियम असतात. कधी पाळायचे तर कधी झुगारायचेही असतात. हे जमतेहि किंवा नाहीही. पण स्वप्नांना मात्र बंधन नाहीत. बघायची का नाही हे बऱ्याचदा बघणाऱ्याच्या हातातही नाही. पण कित्येकदा ठरवून बघता येतात, माझ्या छोट्या टोमॅटो सारखी. फुले आली होती एखादा तरी टोमॅटो येणारच होता. पण मनातल्या विचारांनी स्वप्नांनी माझ्यापुरती ती प्रोसेस फास्ट केली होती. ख्वाबिदा म्हणजे तरी काय? स्वप्न बघणारी. पण नुसती दिवास्वप्ने नाहीतर डोक्यात चालणार्या  असंख्य विचारांच्या साहाय्याने प्रत्यक्षात न जमणारा प्रवास चुटकीत पार पाडणारी स्वप्न बघणारी.

 कोणते स्वप्न पडणार हे ठरविण्याचा अधिकार अजून तरी माणसाला मिळाला नाही. पण विचार करून कोणते स्वप्न उघड्या डोळ्यांनी बघायचे हा तर नक्कीच मिळाला आहे. मेंदूला सारासार विचार करण्याची ताकद तेवढ्यासाठीच तर दिली आहे. स्वप्ने तर पाहिली पाहिजेत, तिही  खूप भरभरून नाहीतर उद्याचा दिवस कशासाठी? फक्त ती बघताना शेखचिल्ली व्हायचे का ख्वाबिदा,  मात्र ठरवायला हवे!

 

-श्रुतकिर्ती

११/०२/२०२२


 

 

स्वप्न पाहणं, फारच

फायद्याचं असतं नाही?

तुम्हाला ‘ज्या’ हव्या आहेत,

जशा’ हव्या आहेत,

तशाच पाहता येतात गोष्टी

स्पृहा जोशी.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान