भविष्य

 

आज रोजच्यासारखे कॅाफी ब्रेकमधे गप्पा मारतानां एकीने ड्रॅावरमधून पाच सहा प्रकारचे tarot card set काढले. जे आवडेल ते घ्या म्हणून प्रत्येकाला दिले, कारण काय तर तीच्या आईने ते ओळखीच्यांना वाट म्हणून दिलेले. बोलतां बोलतां ती म्हणाली की तीची आई spiritual healer आहे. आणि पुढच्या दोन मिनिटात आजूबाजूच्यांचे कुतूहल वाढतच गेले.

त्या दोन मिनिटा माझेही मन कुडमुड्या ज्योतिषापासून ते मोठे मोठे tv show करणार्यांपर्यंत फिरले. का एवढे महत्व पुढे काय होणार ते जाणून घ्यायला? काय वाढून ठेवलेय ते पहायला? भूतकाळाच्या आठवणित रमायला सगळ्यांनाच आवडते. वर्तमान त्रासदायक असेल तर संपण्याची घाई असते. भविष्यकाळात पोहचायचे आणि तिथे सगळे अलबेल आहे असे कोणीतरी सांगावे अशी तीव्र इच्छा असते. वर्तमान छान असेल तर ते संपूच नये. त्याला दुःखाची झालर लागू नये म्हणून खात्री देणारा कोणीतरी असावा असे वाटत असते.

भविष्य, ग्रहतारे दशा, कुंडली, रत्ने, खडे, tarot हे खरे का खोटे या वादात मला स्वारस्य नाही. तो आपला विषयही नाही. मनाचे खेळ आणि भविष्य जाणून घ्यायचा प्रयत्न करतानां मेंदू आणि मन काय विचार करतात याचेच महत्व जास्त.

अडचणीतला मेंदू कधी उत्तरे शोधतो तर कधी पळवाटा.त्यातून ज्या असंख्य वाटा त्याला दिसत असाव्यात त्यातलीच ही कोणाला तरी काहीतरी विचारण्याची असावी. अनंत काळापासून अज्ञाताचा शोध हेच तर मेंदूचे काम आहे आणि म्हणूनच तर माणूस इतर प्राण्यांहून वेगळा आहे.याच भविष्यात डोकावतांना मग बरीच साधने वापरली , पोपटापासून ते चंद्रताऱ्यांपर्यंत पण उद्देश हाच माहीत नसलेले जाणून घेण्याचा. भूतकाळातले खोदून बघण्याचा. या दोन्हीत त्या वर्तमानाचे बिचार्याचे सॅंडवीच होते. तो एकतर फार हवा असतो किंवा मुळीच नकोसा. भूतकाळ बदलता येत नाही, भविष्यकाळात पोहोचणे टाळतां येत नाही मग वर्तमानालाच का दुर्लक्षा? त्याला मनापासून आपले केले तरच पुढे काय आहे हे जाणून घेण्याची चिता दूर होईल कां? जे जे होईल ते घडू द्यावे इतका त्रयस्थपणा आल्यावर भविष्यात काय घडेल याचा परिणाम तेवढा तीव्र होईल काय?

या प्रश्नांची उत्तरे माहीत नाहीत म्हणूनच प्रश्न पडत राहतात. कधी मेंदू कोडी सोडवतो तर कधी ही अशी tarot card. प्रत्येकासाठी उत्तर शोधण्याचा मार्ग वेगळाच पण हे प्रश्न पडले, काळजी वाटली, दुःख झाले म्हणूनच तर जगण्यात मजा आहे. अकस्मात काहीतरी बदलते म्हणूनच plan करण्याची गंमत आहे आणि म्हणूनच तर रेल्वे स्टेशनवरच्या वजन काट्यावर वजनाच्या तिकीटामागचेही भविष्य वाचण्याचे आजही कुतुहल कायम आहे.

-श्रुतकिर्ती

१८/०२/२०२२



 

मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते। अकस्मात होणार होऊनि जाते॥ घडें भोगणे सर्वही कर्मयोगे। मतीमंद तें खेद मानी वियोगें॥

संत दासगणू

Comments

  1. खूपच छान मांडणी असते तुझ्या लेखाची, साधे सोपे पण अर्थपूर्ण... शेवट आणि दासगणू महाराजांच्या समर्पक ओळी तर चेरी ऑन द टॉप, लिहिते रहो...

    ReplyDelete
  2. Complex to Simple thoughts integrated well

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान