संततधार

 

 मागच्या शुक्रवारी ख्वाबिदा लिहताना तीव्र उन्हाळा त्रास देत होता. घरी-दारी प्रत्येक जण ऊन कमी होण्याची वाट पाहत होते. सोमवार पर्यंत घामेजूननच सगळी कामे चालू होती. हवामान खात्याने भरपूर पाऊस सांगितलेलाही होता पण त्या दिवशी मात्र भरपूर काय याचा अंदाज अंधुकहि येत नव्हता. मंगळवार उजाडला आणि पावसाला सुरूवात झाली. आठवडा पुढे सरला आणि पाऊसही . गुरुवारपासून तो संततधार झाला, जनजीवन विस्कळीतमथळे बातम्यात आले. अजूनही रोजचे व्यवहार चालू होते व्यवस्थित. फक्त ओल्या कपड्यांची, बूट मोजे यांची, निथळणारा छत्र्यांची, आणि दारातल्या पाय पुसण्यावर चिखलाच्या ठशांची  संख्या वाढली होती. पाच मिनिटाचे अंतर रांगत्या ट्रॅफिक ने दहा-बारा मिनिटे केले होते. आता तीव्रता जाणवायला लागली होती. नद्यांचे, धरणाचे पाणी वाढल्याची नोटिफिकेशन्स  कॅन्टिन्यूअस झाली.  रस्ते बंद, पॉवर फेल्युअर,रस्ता वाहून गेला, हे टीव्ही आणि रेडिओवर धोक्याच्या  एकामागोमाग येणाऱ्या सूचनांमध्ये सारखे कळत होते. रोजच्या वेळेला घरी परत येताना रस्त्यातले शॉपिंग सेंटरचे पार्किंग भरून वाहताना पाहिले आणि वास्तव पुन्हा समोर आले. लोक, पाणी आणि अन्न साठा करू लागले म्हणजे नक्कीच धोका वाढला होता. या गर्दीचा भाग होऊन मीही साठेबाजीत भर टाकली. यादीत उगीचच चार गोष्टी लागतीलची भर टाकून, पिशव्या जड जड भरून घरी आले.

 आता पावसाने मनावर घेतलेले होते पण तरीही सीरियसनेस असा काही नव्हता. आपण सुरक्षित जागी राहतो. बांधीव, बंदिस्त घरात राहतो, हा एक भ्रमाचा भोपळा मनात फुगलेला असतोच. तो बऱ्याचदा, आपण जात्यात नसलो तरी सुपात आहोतच हे विसरायला लावतो.

 पूर ही दोन अक्षरे खूप गंभीरच असतात हे आपल्याला जाणवायला वेळ लागतो. पाणी वाढते म्हणजे काय? फ्लॅश फ्लडिंग होते आणि गाड्या माणसे वाहून जातात तरी कशी? हे ऐकून पाहून माहीत होतेच कायम, पण रात्री जेव्हा वॉर्निंग वाढायला लागतात, तेव्हा तीव्रता जाणवायला लागते. त्यातच एक मैत्रीण कौन्सिलची वॉर्निंग आलीये, ’पाणी साठतय, वेळप्रसंगी evacuation, म्हणजे घर सोडण्याची तयारी ठेवा हे सांगते तेव्हा सगळे काळे-पांढरे चित्र दिसू लागते.

 निसर्गाचा निर्णय सगळ्यात शेवटचा, अंतिम. त्या कोर्टात अपील नाही हे लक्षात आले. आत्तापर्यंतची वाचलेली वर्णने, पॉपकॉन खात पाहिलेले सिनेमे, पूरग्रस्त निधीला केलेली मदत यापेक्षा जास्त जवळून आपण हे अनुभवलेलेच नाही, हे जाणवून डोळे उघडतात. Evacuation, किती भयंकर कल्पना. जीव तर वाचवायचा आहे, स्वतःबरोबर जवळच्यांचाही. पण घरदार, त्यातले सामान, रोजचे आयुष्य, परत येऊ तेव्हा कसे असेल? हे माहीत नसण्याच्या परिस्थितीत सोडून जायचे आहे. बरोबर काय न्यायचे? जीवनावश्यक म्हणजे नक्की? काय बी प्रिपेअर्ड हे हजार वेळा ऐकूनही प्रिपेअर्ड नसणे काय असते, हे सगळे मेंदुला बधिर करते.

 काल शॉपिंग सेंटर मध्ये गर्दीत घेतलेले, अगदी लागणारच आहे वाले त्या बरोबर  ठेवण्याच्याया दीत काहीच नसते. बरोबर जे असते त्यापेक्षा सोडून जायच्या गोष्टींमध्ये आज पर्यंत किती जीव अडकवलेला असतो. आत्ताही मन या चार भिंतीतच राहणार असते.

 विश्वास पाटलांची झाडाझडती ही धरणग्रस्तांवरची कादंबरी, वाचताना जेवढी सुन्न करून गेली होती: तितकीच सुन्न आज तिची आठवण करून जात होती. काल, युक्रेन मधल्या रस्त्यावर बाहेर पडणारे आपल्यासारखेच लोक: ज्यांना आपण थोड्याच दिवसात निर्वासित म्हणणार होतो त्यांच्या मनाशी क्षणार्धात नाळ जोडली गेली. पाऊस कमी होईल , आज-उद्या-परवा पुन्हा रोजचे आयुष्य सुरू होईल. पण नैसर्गिक आपत्ती कडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र, या पावसाने आधी स्वच्छ धुतला आहे आणि आता गढूळ करून टाकलाय.

-श्रुतकिर्ती

२६/०२/२०२२


पाऊस कोसळे हा

अंधारले दिसे

डोळे भरून आले

माझे असे कसे?

मंगेश पाडगांवकर

Comments

  1. तू लिहिलेल वर्णन अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं. एकदम live telecast. आणि तुझे प्रत्येक शब्द मला live commentary वाटत होती.
    काळजी घे आणि देवावर विश्वास ठेव. सर्व काही पूर्वपदावर येईल.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you.नक्कीच सर्व लवकरच मूळ पदावर येईल.

      Delete
  2. संवेदनशील मनाचे स्पंदन असे तुझे हे लिखाण, आजूबाजूला जे घडते आहे त्याचे टिपण आणि तुझ्या मनात उमटलेले पडसाद अस्वस्थ करून गेले
    पाडगावकरांच्या समर्पक ओळींनी हे लिखाण अधिक गहिरे झाले आहे,
    हजारो किमी वरून काळजी घ्या हे सांगणे सोपे पण हताश ही करणारे आहे , त्यातल्या त्यात तुम्हाला लाभलेले
    उत्तम आणि सजग प्रशासन ही एक silver lining च

    ReplyDelete
    Replies
    1. हजारो किमी वरून काळजी करणारी माणसे असली की असले प्रसंग सोपे होतात… thank you

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान