असेच काही

 

उद्या नवे वर्ष सुरु होणार, मनातले विचार चांगले असतील तर वर्ष छान नोट वर सुरु होईल असे सारखे वाटत होते. लिहायला लागल्यावर मात्र तसे होत  न्हवते. आयरिश लोक, 'I am sad' च्या ऐवजी 'Sadness is on me' असे म्हणतात तसे काहीसे होत होते. मजेशीर आहे ना हे, अनेक गोष्टी तात्पुरत्या मनात येतात तसाच हा sadness थोड्या काळासाठी आलाय, गेला कि मी पुन्हा पूर्वीची असणार हे सांगणारे. मला माझ्याच भावनांमुळे identify न करणारे. भावनांशिवाय मन असणार कसे? कधी थोड्याश्या उगाच चुकार येऊन जाणाऱ्या तर कधी टिकून राहणाऱ्या, तीव्र हाकलून दिल्या तरी न जाणाऱ्या.

मागच्या आठवड्यात रेडिओवर  prolonged grief disorder बद्दल काहीतरी बातमी चालू होती. अमेरिकन सायकॅट्रिस्ट असोसिएशन ने हा एक मानसिक आजार म्हणून मान्य केला अशी. मधेच रेडिओ लावल्याने आगापिछा, काही कल्पना न्हवतीच. कानात पडणारे शब्द फारसे रजिस्टर होत न्हवते. आता मात्र ते शब्द मनातून जाईनात.

भावना मनातून जाण्यासाठी वेळ घेतातच पण तो किती? कसे ठरणार दुःखाची तीव्रता किती काळ टिकावी ते? ती तेवढा काळ तीव्रच असावी ते? मन हळुवार म्हणून हे घडते का मनाला नवी भावना स्वतःला चिकटवून घेणे जमत नाही म्हणून? एक वर्षापेक्षा जास्त काळ दुःखाचा आवेग टिकला तर त्याचा परिणाम शारीरिक मानसिक स्थितीवर होतो असे त्यात म्हटलेय. एक वर्ष, बराच मोठा काळ. टिकते का तीव्रता इतका काळ? रोजचा दिनक्रम, शरीरधर्म चुकलेच नाहीत कुणाला तरी हि हि तीव्रता राहिली तर काय होईल त्या मनाचे, पर्यायाने माणसाचे.  साध्या साध्या  घटना, अप्रिय प्रसंग, माणसे आपण विसरू शकत नाही वर्षानुवर्षे.  मग मनाला झालेले अतीव दुःख एका वर्षात जाईल तरी कसे. जखम भरेल का?

कधी तरी त्यावर खपली येते, त्याखालची त्वचा नॉर्मल व्हायला लागते. डोळ्याला लागणाऱ्या धारा, थेंबाच्या रूपात पापणीच्या कडेवर येऊन थबकतात, ओघळत नाहीत. अचानक एकदिवस त्रयस्थपणे बघताही येते, बोलताही येते पण  कधी होते हे ? वेळ गेला कि. अति तीव्र भावना मग ती कोणतीही असली तरी उद्रेक झाल्यावर नैसर्गिक पणे वेळ घेऊन शांत होणार. ते नाही झाले कि मात्र सगळे बिघडणार, इथे तोच काळ ठरवला होता. तो हि एक वर्षाचा.

माझ्या मनाला तर थोडीशी अस्वस्थता होती. मी ती बाजूला करून,  मनात एरव्ही असणारा आनंद व्यक्त करू शकत न्हवते. तीव्र दुःखात, काळजीत असणाऱ्याला, लाग रोजच्या सुरळीत आयुष्याला म्हणणे किती अवघड.  एक वर्ष लागणारच त्याला. पण हीच तर टाइमलाईन, त्याहून जास्त टिकले तर त्यातून बाहेर पडायला मदत पाहिजे. चालढकल करायला तसेही आवडतेच आपल्याला.  भावनांचा मग तो दुःख, राग, तिरस्कार काहीही असला तरी एकदा का कंफर्ट झोन सापडला कि मग तो सोडणे मुश्किल. वास्तवापासून दूर निघून जायला होते. आणि मग त्याचाच होतो डिसऑर्डर.

एरवी घड्याळाच्या काट्याकडे  बघत जगणारे आपण कॅलेंडरही विसरतो.  कारणपरत्वे येणारे भावनांचे उद्रेक शमले कि बाजूला सारून,'grief was on me, but I am not sad' हे स्वतःला सांगायचा प्रयत्न करूया का? मनात निदान हा शेवटचा विचार पॉझिटिव्ह आल्याने पुढील वर्षाची सुरवात छान होतीय मग वर्षही चांगले जाईलच ना.

 

- श्रुतकिर्ती

०१/०४/२०२२

 

अशी झालीय हवा कि काहीच कळत नाही,

सुटत नाहीय ऊन आणि मिटतसुद्धा नाही

उन्ह- सावली चौकोनाचा पडला आहे पट

कळत नाहीय खेळीयाच्या मनामधला कट

संदीप खरे

Comments

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान