टच वूड

 

वेगवेगळ्या ठिकाणाहून निघून, भर गर्दीतून चार जण एकत्र आले की पार्किंग मिळाले का? हा हमखास निघणारा विषय . दोन दिवसापूर्वी असेच झाले. आणि त्यातलीच एक जण, “मला नेहमी छान पार्किंग मिळते. तेही पटकन!” असे म्हणाली आणि पुढच्या क्षणाला तो उत्साह थांबवत, “टच वुड, टच वुड” म्हणत लाकूड न सापडल्याने डोक्यावर दोन टिचक्या मारूनच शांत झाली. माझ्यासारख्याच एक दोघांना हसू आवरेना. पण ती मात्र अगदी सिरियसली, “ Don’t jinx me.” यावर ठाम होती. श्रद्धा? अंधश्रद्धा? काय म्हणू? काहीच नाही. छान चालू असलेली तिच्या आयुष्यातील एक गोष्ट,  वारंवार घडत असलेली,थांबावी असे तिला वाटत नव्हते एवढेच. आणि तिला तसे वाटण्यात कोणाचे काही नुकसानही तर होत नव्हते.

  चांगले चालू असलेले, काहीच तर थांबू नये. संपू नये. असे कायमच तर वाटते प्रत्येकालाच. म्हणून तर मागच्या पिढीतले , म्हातारे कोतारे ‘बोलून दाखवू नये’ असे म्हणताना आढळतातच की.

मग हसू का आले मला तिच्या कृतीचे? डोक्याला लाकडी खोके समजल्याने?कोण जाणे .

झाडांवर गार्डियन एंजेल्स राहतात. झाडावर टिचकी मारल्याने ते जागे होतात आणि मग आपले रक्षण करतात. या जुन्या समजुतीत अठराव्या शतकात रूढ झालेली “नॉकिंग द वुड “ ही संकल्पना हळूहळू बदलली पण मनातल्या चांगल्या गोष्टी जपून ठेवण्याचा भाव मात्र तसाच राहिला. मनात आले की बोलून व्यक्त करून टाकण्याची इच्छाही आदिम काळापासून चालत आली आणि चालूच राहिली. शब्दात बांधले की विचाराला महत्त्व येते. ठामपणा येतो म्हणून तर पटकन बोलले जाते. तिचे लक रन होऊ नये इच्छा नुसती मनातल्यामनातच अव्यक्त राहू नये म्हणून, बोलून, कृती करून त्याला मूर्त रूप देण्याचा तिच्या मनाचा प्रयत्नच होता तो.

हे मनात आले आणि डोक्यात रामदास स्वामी आले. ते म्हणतात: 

उन्मेष परा ध्वनि। पश्यंती नाद मध्यमा, शब्द चौथी। वैखरी पासून उमटतीI  नाना शब्द रत्ने।।

म्हणजेच, वायुरूप जाणिवेतून  स्फुरते ती परा वाचा, तिचे ध्वनी रूप होते ती पश्यंती , नाद रूप ती मध्यमा आणि शब्द रूपात प्रकट होते तेव्हा वैखरी. विचार सुरू होण्यापासून ते शब्द रूपात प्रकट होतात ते वाणीच्या या चार प्रकारातून जाऊन. माझ्या मैत्रिणीच्या मनात आलेली पार्किंग मिळत राहण्याची इच्छा असाच सगळा ध्वनि, घोष, नाद आणि अक्षर असा प्रवास करून आली होती. ही जाणीव झाल्यानंतर या मागची तीव्रता जाणवली. छोट्या छोट्या गोष्टींना आपल्या मनात असलेले महत्त्वही जाणवले. आणि मग ही अंधश्रद्धा आहे का? असे खुळचट प्रश्नच पडायचं बंद झाले.

-श्रुतकिर्ती

१५/०४/२०२२



Comments

Popular posts from this blog

कंटाळा

पद्धत

अवरग्लास