दिवस असेही/तसेही

कधीकधी,

मनाला हवी असते विश्रांती

तर मेंदूला असतो मुलखाचा उत्साह,

मनाला  माझ्या कधी आवडते शांतता, एकांत

तर माझ्याच मेंदूला  तेंव्हा हवा गर्दी, गोंगाट माणसांचा जमाव,

मनाला प्रिय असतो घरातला कोपरा

तर माझाच मेंदू मागत असतो मोकळे शिवार,

मनाला बरे वाटते सवयीचे जगणे

तेंव्हाच मेंदू म्हणतो करूया काहीतरी नवे,

मग

मन आणि मेंदू एकत्र येतात,

मिळून एक तह करतात

आता असाही - तसाही जाणारा दिवस बोलायला लागतो,

मनाला मेंदूचा सल्ला पटायला लागतो

मन आणि मेंदू होतात एक मग,

हळूच बदलते माझे जग

आता,

स्वप्न लागतात व्हायला मोठी

अपयशाची सावली भासू लागते छोटी

आधीचे राखून राखून जगणे बदलायला लागते,

लाजतबुजत वागणे संपलेलेच असते

जगण्याला हवा असतो बदल,

मन-मेंदू सांगतात सापडलीय दिशा लवकर चल

असेच असतात माझे रोजचे दिवस

कधी मनाप्रमाणे,तर कधी मेंदूप्रमाणे

क्वचित जेंव्हा दोघे होतात एक,

तेंव्हा दोघांप्रमाणे

त्रिशंकू लटकलेला कधी आनंदात तर कधी दुःखांत,

चकचकीत स्वच्छ तर कधी पार धुळ खात

कालचे, आजचे आणि कधी उद्याचे,

वाचून न झालेल्या; का लिहून न संपलेल्या पुस्तकासारखे

अस्ताव्यस्त, गोंधळलेले पण

त्याचवेळी खुप सुंदर असणारे

 

- श्रुतकिर्ती

२९/०४/२०२२




Comments

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान