सूर्यफूल

 

काल इव्हेंट्स मध्ये, फ्लॉवर फेस्टिवलची जाहिरात पाहिली आणि कधी, काय, कुठे, कधी जायला जमेल, कुणाबरोबर जायचे, सगळे प्लॅन्स झटपट तयार झाले. कितीतरी एकर जागेवर रांगेने फुललेली सूर्यफुले.

 नजर फिरेल तेवढा, सगळा भाग व्यापून टाकणारे ते झुलणारे, डुलणारे पिवळे शेत. दिवसाच्या कोणत्या वेळेला पोहोचू त्यावर बदलणारे दृश्य. या सगळ्या विचारांनी डोक्यात आणि डोळ्यापुढे एकच गर्दी केली.

मराठीत आणि इंग्रजीत एकच अर्थ सांगणारे नाव ल्यायलेले, छोट्या ताटली एवढे फुल. बघताक्षणी उत्साहाने,  चैतन्याने भारून टाकते एवढे नक्की. ठराविक लयीत चक्राकार फिरत आहेत असा आभास निर्माण करणाऱ्या त्या पाकळ्या, बघतच रहावे अशाच असतात. लहानपणापासून सूर्यफूल; सूर्याकडे बघते,पूर्वेकडून पश्चिमेकडे वळते, इत्यादी इत्यादी…सरधोपट माहिती आणि बियांचे तेल काढतात या उपयोगा पलीकडे मन लावून या फुला कडे बघायला भाग पाडले ते व्हॅन गॉग ने. प्रचंड गाजलेले ते सनफ्लॉवर कधी पाहिले ते आता आठवत नाही. पण दर  वेळेला तेवढाच उत्साह, आनंद आणि प्रत्येक फूल वेगळे असल्याचा आभास ते चित्र निर्माण करते. प्रत्येक फुलाला, आपल्यातल्या प्रत्येकासारखे एक वेगळे व्यक्तिमत्व असावे असे वाटत राहते. प्रत्येकाचा आकार, उंची वेगवेगळी. काही उमलणारी तर काहींच्या गळणाऱ्या पाकळ्या. एकत्रितपणे जाणवणारा उत्साह, ऊर्जा प्रत्येकाकडे पाहिल्यावर ही जाणवते. समूहातल्या माणसांसारखी. स्वतः  व्हॅन गॉग प्रचंड गतीने ही चित्रे पूर्ण करायचा,  असे कुठेसे वाचले.  ती गतीही यात जाणवते. का उगीचच माहिती असल्याने, मेंदूतले विचार वडाची साल पिंपळाला लावतात का काय माहित? आपल्या अठरा पुराणात जशा असंख्य कथा तसेच ग्रीक मायथॉलॉजीचेही असते. सूर्य देवता अपोलोच्या शापामुळे, क्लाईटचे सूर्यफूल बनते. तरीही ते प्रेमाने सूर्याकडे दिवसभर बघत राहते. हे अगदी खरे वाटायला लागते.  सूर्यफूल नंतर असे प्रत्येक वळणावर भेटतच राहते. फिब्बोनाची सिक्वेन्स शिकतांना सुर्यफुलाचे उदाहरण कळल्यापासून हे फुल फारच हुशारही वाटायला लागले. अंगणात सूर्यफुलांचा ताटवा लावणारी आणि फ्लॉवर पॅाटमध्ये सूर्यफुले  असणारी माणसे, मग उगाचच जवळची आणि स्पेशल वाटायला लागतात.  एखादी गोष्ट आवडली की अनुषंगाने येणारे सगळेच आवडते तसे. हा सगळा विचारांचा घोळ, बाजूला सारून दुरवर पसरणारी सूर्य फुलांची शेती पाहिली की पिवळा आणि विविध छटांमधला पिवळा प्रकाश, डोळे आणि मन भरून टाकतो. व्हॅन गॉगच्या भाषेत 'Light on light' सगळीकडे साठवुन राहतो. हे सोनसळी, सूर्याला पृथ्वीवर आणि काही वेळा हातात आणणारे फुल, निसर्ग  भरभरून म्हणजे किती भरभरून देतो याची जाणीव करून देते. आणि हे फुल कशा कशाचे प्रतिक आहे याची यादी पार दूर सारून मन फक्त कृतज्ञतेने भरून जाते. असंख्य जाणिवांबाबतची कृतज्ञता सूर्यापासून ते व्हॅन गॅाग पर्यंत आणि  हे सगळे बघायला वाचायला शिकवले त्या माणसानं पर्यंत येऊन पोचते.  मग प्रत्येक  फुलाजागी जणू आपल्याच जगण्यातले एक न एक माणूस दिसायला लागते.  न मागताही भरभरून काहीना काही देत राहणारे, पार नजर थकेपर्यत दूरवर पसरलेले हे सगळेजण, जगण्याचा भाग आहेत म्हणून तर ही सूर्यफुले उत्साह, आनंद देत आहेत. आणि एवढ्या मोठ्या ताटव्याचा भाग असूनही स्वतःचे वेगळेपणही जपत आहेत, तुमच्या माझ्यासारखी.



- श्रुतकिर्ती

०८/०४/२०२२

Comments

  1. वाचायला सुरुवात केली तेव्हा van गॉग च आठवला, वाटलं हिने त्याचा उल्लेख करायला हवा आणि पुढे त्याचा उल्लेख आलाच, happiness is... च्या सिरीज मध्ये शोभावा असा आनंद झाला...
    ने प्र छान लिहिलं आहेसच
    पण आपल्या अनुभूतीला सोप्या भाषेत शब्दबद्ध करून समोरच्यालाही तोच आणि तसाच अनुभव देणं ही तुझी कला कुशलता
    तेव्हा
    लिहीत रहा, शेयरतही रहा 😅

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you, सूर्यफुले आणि वॅन गॉग एकत्रच आठवतात ना

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान