बदल

निघाल्या पासून, मन मेंदू ज्या कोणाकडे आठवणींचे department दिलय ते फक्त खुणाच शोधतेय.

हे इथे नव्हते पुर्वी आणि इथे होतो ते गेले कुठे? सारखा मेंदू कुरतडून कुरतडून जुन्या images आत्ता दिसणार्या frame शी किती जुळतात हाच खेळ सतत चालूय.

जिथे जे हवे होते, ते मिळाले, दिसले नाही की उगीचच अस्वस्थपणा… ते तीथे असण्याचा, नसण्याचा माझ्या रोजच्या आयुष्यावर काडीमात्र परिणाम होत नसतानांही.

आता घर जवळ येतेय, सगळं डोळ्यांसमोर रोजच दिसणारे, विसरायचा प्रश्नच नसलेले. समोर बघताना मात्र अडीच वर्ष पुढे गेलेले.. जुळत नसलेले. राग, वैताग, हे का असे? असला वेडा विचार, पोचण्यातला आनंदच घालवतोय. कळतय बदल होणारच, बरेच काय बदललेय तेही माहीत आहे . तरीही शोध काही संपेना.

वस्तू, ठिकाणे, रस्ते, दुकाने इथपर्यंत ठिक आहे, पण आता समोर येणारी माणसे, त्यांच्यातले बदल नकोसे झालेत.

त्यांची वाढलेली वयं, सुरकुतलेले हात, मंदावलेली गती सगळं नकोसे झालंय. माहीत होते सगळे, मनाला बजावलेलेही होते सगळे पण तरीही, अपेक्षा सगळे पुर्वीसारखेच असण्याची.

मी रोज बदलत होते पण यातल्या कुणालाही बदलण्याची परवानगी नव्हती, खिडकी समोरच्या झाडाने पानेही गाळायची नव्हती. 

क्षणार्धात मनाने हे असेच freeze  करायचे ठरवले. कुणाीही आता बदलायचे नाही, माणसांनी, वस्तूंनी सगळ्यांनी याक्षणात गोठून, थिजून जायचेय.

म्हणजे कितीही काळ गेलातरी माझ्या आठवणी आणि वर्तमान एकच राहणार, बदल नाहीच. पुढच्या क्षणात जादूची कांडी फिरली सगळं गोठलं…

पण त्या थिजलेल्या डोळ्यातलं चैतन्यच गेलं, जिवंतपणाच हरवला. मेंदू मन खडबडून जागे झाले. मला हे असले जग माझे वाटणार होते? हात सुरकुतले तरी स्पर्शात फरक नव्हताच ना, मग का हरकत होती त्या हातांच्या सुरकुतण्यात.मलाच बदल झेपत नव्हता, बाकी जग त्याच्या गतीने पुढे जात होते. माझ्या आठवणींचे ओझे माझीच गती मंदावून टाकत होते.

जाग्याझालेल्या मनाने ते ओझे छान मखमलीत गुंडाळून लांब कोपर्यात ठेवून दिले, अडगळ नाही, तरीही रोज न लागणारे म्हणून .

आता वर्तमानच होता फक्त, डोळे भरून अनूभवायला, मनात मेंदूत साठवायला.

पुढच्यावेळी काय बदलले, हे तपासून पाहायला. भविष्यासाठी नव्या आठवणी तयार करायला.

- श्रुतकिर्ती

०६/०५/२०२२



मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते। अकस्मात होणार होऊनि जाते॥

घडें भोगणे सर्वही कर्मयोगे। मतीमंद तें खेद मानी वियोगें॥१७॥

समर्थ रामदास

Comments

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान