अंबाडीची भाजी.

 

रोज घरी मीही भाजी पोळीच खाते,

तीही…

ती नेहमी तशीच भाजी करते,

आम्ही दोघी ही… तिच्याच सारखी.

तीच्या हाताची चव, तशीच असते कायम

आमची, कधी कधी.

एरवी मात्र, आठवणी मनात जागवतात तीच चव न चुकता नेहमी.

आताशा, बर्याच वर्षात तीने केलीच नाहीय भाजी

पण आम्हा दोघीत भर पडलीय, एका तीसरीची;

 तीच्या चवीची आठवण काढत भाजी खाणारीची.

तीनेच शिकवलीय, लक्षात ठेवून आवडी जपण्याची पध्दत.

न सांगताच  शिकवलीय, त्याच बरोबर भाजीचीही आम्हा सगळ्यांच्या आवडीचीही पध्दत.

 तीच्यामुळेच,

वर्षभर दरवेळी, त्या सगळ्या भाज्यांकडे बघत आठवणी काढत, आनंदाने जेवताना आठवणींचा एक आवंढा हळूच गिळताना,

पुढच्या फोन कॅालवर तीच ती भाजी निवांतपणे चर्चा करायला विषयतरी असतात, असे विषय नाही निघाले तर काही तरी गडबडलेय हे न सांगताच एकमेकानां सांगतात.

कोणत्याही बाजारात जावो, भाजी दिसली की ती दिसतेच,

निवडायचा, करायचा कितीही आळस आला तरी पिशवीत बसतेच.

व्हिडीओ कॅाल करून पुन्हा कशी करू म्हणत म्हणत सगळी उजळणी करणेही आलेच.

सगळे म्हणतात आठवणी काढू नयेत, फार मन कशात गुंतवूच नये

पण काढायला आठवणी, जगणे तीच्यापासून वेगळे करणे तर जमायला हवे.

तीचेच असलेले मन तीच्या पासून दूर कसे करायचे हे कोणालातरी विचारायलाच हवे.

रोज प्रयत्न केलातरी, उद्या पुन्हा जेवायला लागणारच, भाजी करायला घेतली की तीच पुढ्यात उभी राहणार

नकोच मग तो वेडा प्रयत्न, आठवण साठवत पुढेच चालत राहणच एकदम रास्त.

तीच्याशी बोलायला कारण तर हवे, ताजी भाजी मिळालीय सांगत, तीच्याही मनाला, मेंदूला खाद्य द्यायला हवे.

आपल्याला आनंद तिच्याशी बोलल्याचा, तीचा आनंद लेकरं छान जेवल्याचा.

कशाला हवी detachment असली, मनात आले असे आणि ताटातली भाजीपण खुदकन हसली.

-श्रुतकिर्ती

१३/०५/२०२२




Comments

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान